मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १०

गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म, मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन
कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या; सकल अस्त्रात वाकब केले, साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले. असो बावन वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसविण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले.
 
एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनीमंत्र पाठ करीत बसला होता. जवळ मच्छिंद्रनाथ नव्हता. तो एकटाच त्या ठिकाणी बसला आहे अशा संधीस गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली. ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती. त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले आपणच करू लागली. त्यांनी चिखलाची गाडी तयार केली. त्या गाडीवर बसावयासाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु त्यांना साधेना, म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथाची प्रार्थना करू लागली. त्याने त्यांची ती विनवणी कबूल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला.
 
गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथाचा अवतार व्हावयाचा, वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता. त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धि उत्पन्न झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा, म्हणून गोरक्षास तशी बुद्धि होऊन त्याने पुतळा करावयास घेतला. त्या वेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधि पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थी, त्वचा, मांस, रक्त इत्यादि सर्व होऊन मनुष्याचा तेजःपुंज पुतळा बनला. मग तो रडू लागला. हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकिला. तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणिले. असा त्या मुलांनी बोभाटा केला व लागलेच सर्वजण भिऊन पळून गेले. पुढे मार्गात मच्छिंद्रनाथाशी भेट होताच, त्याने त्या मुलास भिण्याचे व ओरड करून लगबगीने धावण्याचे कारण विचारिले व तुम्ही भिऊ नका म्हणून सांगितले. तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी सांगितला.
 
मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडला व काय चमत्कार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असे त्याने मनात आणिले आणि मुलांस जवळ बसवून सर्व खाणाखुणा विचारून घेतल्या.
 
मच्छिंद्रनाथास मुलांनी दुरून ठिकाण दाखविले होतेच. तेथून एक मुलाचा शब्द त्यास ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला, असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले व तो मार्गाने चालू लागला. गोरक्षनाथाने पुतळा केला असूनहि तो जवळ दिसेना, म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता, गोरक्षनाथास हाका मारीत चालला. ती गुरूची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तेथून बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्यालाहि भीति वाटली. त्याची गुरूजवळ येण्यास हिंमत होईना. हे पाहून गोरक्षास भय वाटते असे मच्छिंद्रनाथ समजला. मग त्याने मुलास चिरगुटात गुंडाळून ठेविले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की. हा मनुष्य आहे व तो नवनारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षानेहि कसा काय प्रकार झाला होता तो सांगितला तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला जसा तू गोवरामध्ये झालास तसाच तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास. त्यात करभंजन नारायणाने संचार केला आहे; तो भूत नसून मनुष्य झाला आहे, अशी साद्यंत हकीगत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीति उडविली मग त्यासहवर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमास गेला तेथे त्याने गाईचे दूध आणून मुलास पाजिले व त्यास झोळीत घालून हालवून निजविले
 
याप्रमाणे प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली. तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करीत तेव्हा नाथहि सर्व वृत्तांत सांगत; तो ऐकून त्यांना नवल वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला ह्यास्तव ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथाची योग्यता विशेष होय, असे जो तो बोलू लागला
 
तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलासहि बरोबर नेणार असा मच्छिंद्राचा मानस पाहून, त्यामुळे मुलाची अनास्था होईल मुलाचे आईवाचून संरक्षण व्हावयाचे नाही, म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा, असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथास सुचविले. ते ऐकून, तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथाने उत्तर दिले. अशा तर्‍हेने मच्छिंद्रनाथाचा रुकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माथी मारावा असा गावकर्‍यांनी घाट घातला. मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहात होता. त्याची गंगा ह्या नावाची स्त्री महापतिव्रता होती. उभयता संतति नसल्याने नेहमी रंजीस असत व त्यास कोणत्याच गोष्टीची हौस नसे. ती ह्या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करतील असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राजवळ शिफारस केली. मग अशा जगन्मान्य स्त्रीपुरुषांच्या हातात गहिनीनाथासारखे रत्‍न देणे नाथासहि प्रशस्त वातले. त्याने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की, मातोश्री ! हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून जो नवनारायणांपैकी एक त्याचाच हा अवतार आहे. ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर. तेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल; हा पुढे कसा होईल हे मातोश्री, मी तुला आता काय सांगू? पण याचे सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपति उतरेल. ज्याचे नाव निवृत्ति असेल त्यास हा अनुग्रह करील. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस जातो. पुन्हा बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल, तेव्हा तो ह्यास अनुग्रह करील.
 
मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूति तिचे अंगावर टाकताच, तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेविले
 
पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला व गावकर्‍यांची रजा घेऊन गोरक्षासहवर्तमान तो तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्यास बदरिकेद्वार स्वामींच्या हवाली करून तपास लावावे असे मनात जाणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बदरिकाश्रमास गेले.