Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १५

Published: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:46 IST)
 
नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले. ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला. परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई, म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले. ते पाहून कानिफनाथाने, कालिकास्त्र, अग्न्यस्त्र, वासवास्त्र, वाय्वास्त्र अशी वरच्यावर सोडिली. तेव्हा अग्न्यास्त्रास वाय्यास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडवून दिला. त्या वेळी मारुतीने सर्व इलाज केले, पण त्याचे काही चालले नाही. तो अगदी जेरीस येऊन गेला. मग, मी तुझा मुलगा असता, माझा तू प्राण घेऊ पाहात आहेस, तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय? अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायु त्याची बरीच स्तुति केली. तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले; तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिले. त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले. मग तो (समुद्र) मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती ह्यांचे युद्ध चाललेले दिसले. मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहात होता, परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही; उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्च्छना येऊन जमिनीवर पडला.
 
मग मूर्तिमंत वायु पुत्रमोहास्तव मारुतीजवळ गेला. इतक्यात मारुती सावध होऊन पुनः युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की, हे नाथ मोठे प्रबळ आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडिली होती ह्याची आठवण कर ! वाताकर्षणविद्या ह्यांच्या जवळ पक्क्या वसत आहेत. यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे. सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ति मलासुद्धा दिसत नाही, असा समुद्राचाहि अभिप्राय पडला. मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परम प्रीतीने भेटले. कानिफानेहि वायू व समुद्र यांस प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारिले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही, त्याला विचारले असता तो सांगेल. तेव्हा मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्रीराज्यात पाठविले. हे त्याचे जातवाले असल्यामुळे, युक्ति प्रयुक्तिने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली, दुसरा काही मतलब नव्हता. मच्छिंद्रनाथास ह्यांचा उपद्रव होणार नाही, असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणने कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले. मग अग्नि, वायु व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले.
 
मग प्रातःकाळी कानिफा आपल्या शिष्यांसहवर्तमान निघून स्त्रीराज्यात गेला. तेथे तीर्थे करीत राजधानीचे मुख्य शहर जे श्रृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले. तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला. तेव्हा द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले. ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा, असे वाटून त्यास फार वाईट वाटले. आता आपण ह्या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार ! हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला; तेणेकरून तो दिलगीर झाला. मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला. उभयतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या. भरजरी गालिचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली. मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूस झाली. त्या वेळेस खरा प्रकार बाहेर पडला. ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून मोठ्या थाटाने गावातून आणिले आणि एक महिना राहवून घेतले.

सर्व पहा

Hartalika Tritiya 2026 यंदा हरितालिका तृतीया २०२६ कधी? पूजा मुहूर्त, व्रत विधी आणि महत्त्व जाणून घ्या

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

गणपती सजावटीसाठी यंदाचे 7 भन्नाट ट्रेंड; घर दिसेल एकदम हटके!

Pithori Amavasya 2026 पिठोरी अमावस्या २०२६ कधी? तारीख, पूजा विधी, व्रत आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments