सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय २८

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमध्वांतर्गत रामचंद्राय नमः ॥
जयजय वेदवंद्या वेदसारा पद्म जनका भुवन सुंदरा सृष्टिपाळका सर्वेश्‍वरा अतिउदारा भक्तिप्रीय तूं ॥१॥
तूं उदार सर्वस्वें अससी परी घेतल्या वांचोनि कवणा न देसी निजभक्तासी सेवा घेसी, मग त्यांते देसी मोक्षपद ॥२॥
समुद्र मंथोनि सुरासुरीं चौदा रत्‍नें काढिलीं बाहेरी ते समयीं तूं मुरारी विभाग आपुला घेतला ॥३॥
लक्ष्मी कौस्तुभ पांच जन्य धनुष्यासहीत चारी रत्‍नें मग मोहिनी रुपें प्रयत्‍नें दैत्यांलागीं ठकविलें ॥४॥
आपुल्या भक्तांसी दिलें अमृत असुरां सुराचि लाभली निश्चित हें सगळें तुझें क्रीडित परी सर्वातीत तूं एकला ॥५॥
अमृत देऊनि अमरांतें स्थापिलें त्यांचिया पदातें लंकेची हरे बिभीषणातें पुसोनि आधीं घेतली ॥६॥
मग वधोनि दशानन बिभीषणा दिधलें लंकाभुवन सुदाम्याचे पोहे भक्षून हेमसदन मग दिधलें ॥७॥
द्रौपदीचें भाजी पान भक्षूनि दिधलें दूर्वासा अन्न एवं आधीं घेतल्यावांचोन कवणालागीं न देसी ॥८॥
मी तरी केवळ अनाथ तूतें द्यावया नसे सामर्थ्य तूझिये ठायीं न्यून पदार्थ कोणता तरी योजावा ॥९॥
रत्‍नाकरासारिखें भुवन तळीं तल्पक सहस्त्रवदन दक्षिणा अर्पावी तुजलागून तरी कांता लक्ष्मी ॥१०॥
तूं अनंत गुणी ऐश्‍वर्यवंत परी भक्तिभावाचा दुष्काळ बहुत यालागीं देवा शुद्ध भावार्थ तुज अर्पण केला असे ॥११॥
तरी करुणासागरा सर्वेशा सत्वर तोडीं भवबंधपाशा कथा कीर्तन पुराण पुरुषा निरंतर घडो मज ॥१२॥
अजात शत्रू राजाधर्म त्यातें कथा निवेदी भीष्म प्रचीत नामें द्विजोत्तम श्रीपरशुराम क्षेत्रीं असे ॥१३॥
ब्राह्मण सत्यवचनी दयाळ जितेंद्रिय सदा प्रेमळ कर्मनिष्ठ आचारशीळ उपासक विष्णूचा ॥१४॥
तुलसी वनाचें करी सेवन भक्तिभावें शालग्रामार्चन वेदवेदांताचें पठण विचारण करीतसे ॥१५॥
प्रपंच धंदा करुनि मन भगवच्चरणीं ठेविलें जाण स्त्री तयाची पतिव्रता रत्‍न सुळजा नाम तियेचें ॥१६॥
पतिभजनीं परायणी सुशीळ सुभगाप्रिय भाषिणी स्वरुप सुंदर रत्‍नखाणी भ्रतार सेवेसी सादर ॥१७॥
विपत्ति काळीं ओढवतो विघ्न प्राणांतीं न मोडी भ्रतारवचन एक प्राण पती वांचोन दैवत नेणे दुसरें ॥१८॥
ऐसी पतिव्रता पुण्यशीळ गुणवंती उदार अती प्रेमळ ते घरीं राहे तमाळ नीळ लक्ष्मीसहित सर्वदा ॥१९॥
ऐसी ये माउलीचे उदरीं जन्म व्हावया निर्धारीं जरी जन्मोजन्मीं श्रीहरी अर्चिला असेल सद्भावें ॥२०॥
मातापिता गुरु ब्राह्मण यांचें घडलें असेल पूजन तरी ते माउलीचे उदरीं जाण जन्म होईल निजभाग्यें ॥२१॥
स्त्री सुंदर आणि पतिव्रता लाहिजे विशेष पुण्य अर्चितां पुत्र सभाग्य सुरस वक्ता पाविजे विशेष सुकृतें ॥२२॥
दुष्ट स्त्री जे सदा करकर सिणवी भ्रताराचें अंतर तीचिया संगें संसार करितां दुःख उणे नसे ॥२३॥
जोंवरी भ्रतार भाग्यवंत तोंवरी मधुरोत्तरीं भाषित विपत्ती काळीं अव्हेरित भ्रताराचे वचनासी ॥२४॥
अंतःकरणीं सदा कपटी गृहामाजीं भलतें वटवटी सुखमानी पतीचे संकटीं तीतें त्यागितां दोष नसे ॥२५॥
आपुले पुत्रादिकांचा आश्रय धरुन पतीसी द्वेषी रात्रंदिन अमर्यादा बोले वचन तीतें त्यागितां दोष नसे ॥२६॥
उघडे टाकी वेणी पयोधर पुरुष पाहतां वोढवी पदर निर्‍या सरसावी वारंवार तीतें त्यागितां दोष नसे ॥२७॥
मोकळे सोडी केशजटी हस्त उभारोनि देत विरगुटी भलत्यासि करी एकांत दृष्टी तीतें त्यागितां दोष नसे ॥२८॥
कच्छ फेडी मागुत्या घाली द्वार वाढवी पुरुष न्याहाळी संतोषे रुसे वेळोवेळीं तीतें त्यागितां दोष नसे ॥२९॥
सक्रोध मुखें सदा कळवळी कूर्मदृष्टी करुनी न्याहळी पतीस नेदी असोनि जवळी ते घरीं लक्ष्मी न राहे ॥३०॥
तुळसी सेवा नित्य न करी गोष्टी सांगावया जाय घरोघरीं किंवां आज्ञेवीण पितृगृहीं ते घरीं लक्ष्मी न राहे ॥३१॥
गृहीं यथोक्त अन्नग्रासी बाहेर सांगे मी उपवासी विन्मुख दवडी ब्राह्मणासी ते घरीं लक्ष्मी न राहे ॥३२॥
असोत ऐशा कुलक्षणी स्त्रिया पतिव्रता ते प्रचीत भार्या भक्ती क्षमाशांती दया अखंड त्‍हृदयीं वसतसे ॥३३॥
उभय दंपत्य असतां जाण प्रथम प्रसवे पुत्ररत्‍न स्वरुपें सुंदर दैदीप्यमान भास्कर नाम तयाचें ॥३४॥
द्वितीयेपासोनि चढे चंद्र तैसा वाढे प्रचीत पुत्र विशाळ भाळ आकर्ण नेत्रदृष्टी न पुरे पाहतां ॥३५॥
एके दिवसीं कर्मानुसार शकट जुंपोनि तो द्विजवर काष्टें आणावया सत्वर घोर कांतारीं प्रवेशला ॥३६॥
काष्टें कवळितां वनस्थळीं तों अस्तमानातें पातलाहेळी प्रबळ यामिनी दाटली मार्ग कांहीं सुचेना ॥३७॥
कीं ब्रह्मांड करंडा माझारीं काजळ भरिले येक सरी कीं काळ पुरुषाची महाथोरी कां बळ काळी विस्तीर्ण ॥३८॥
निशा दाटली परम घोर श्‍वापदें उठलीं अतिक्रूर सर्प व्याघ्रादि कुंजर तरस तरळ लांडगे ॥३९॥
उठलीं नाना वन दैवतें चेडे मुंजेपिशाच तेथें धूमास घालिती जे ऐशातें पळती देखोनि शुचिवंता ॥४०॥
घोर रुद्र गणें अनिवार कलौ जेवीं पाषंडपूर तेवीं दुःशब्द होती भयंकर ऐशी निशा फार दाटली ॥४१॥
असो तो प्रचीत परम सुभट काष्ठें भरोनि हाकारी शकट मार्ग क्रमोनि अती दुर्घट आश्रमाजवळ पातला ॥४२॥
येरीकडे सुळजा सती गृहांत करुनि पाक निष्पत्ती अंतःकरणीं वाहें खंती नयनीं पती कधीं देखों ॥४३॥
ईशचक्रांक कवचें रक्षीत अंग असे जयाचें हरिनामामृत घेई वाचे आगमन त्याचें होईल कदा ॥४४॥
माझिया कुरळ केशें करुन कधीं झाडीन पतीचरण उदकें चरण क्षाळून तीर्थसेवन कधीं घडे ॥४५॥
वनीं उपवासें करुन व्याकूळ असतील पंचप्राण यालागीं निर्मिलें अंन्न स्वामी भोजना कधीं येती ॥४६॥
ऐशापरी पाकनिर्मितां ॥ अंतरीं वाहे पतीची चिंता तो भास्कर पुत्र रांगतां बाहेरी आला अंगणीं ॥४७॥
बाप हो कर्माचें विंदान कदां न चुके भोगिल्यावीण प्रचीत विप्र शकट घेऊन तिकडोनि आला अंगणीं ॥४८॥
न दिसे कांहीं दाटली रात्र वरुनि गेलें रथाचें चक्र षण्मासांचें बाळ पवित्र शकटातळीं चूर्ण जाहलें ॥४९॥
विप्रालागीं नेणवे जाण माता बाहेरी आली धावून बाळ पाहे विलोकून शतचूर्ण देह जाहला ॥५०॥
बीभत्सलें करुं पाहतां नयनीं अंतरी धडकला शोकाग्नी श्‍वासोश्‍वास धूम्रेंकरुनी उभय नेत्रीं जळ वाहे ॥५१॥
नारीचें त्‍हृदय धैर्यवंत शोक टाकोनी विचार करीत ह्मणे प्राणपती क्षुधाक्रांत वनांमाजीं श्रमलेती ॥५२॥
पुत्राचें मरण ऐकतां कानीं प्राण त्यागील ततक्षणीं मातें उभयपक्षीं हानी होईल ऐसें निर्धारें ॥५३॥
तरी गौप्य ठेवून आतां भोजन द्यावें प्राणनाथा मग ही सांगावी वार्ता ना तरीं अनर्थ होईल ॥५४॥
धन्य धन्य सुळजा सती पुत्राचा खेद न धरी चित्तीं मग ह्मणे वोप्राणपती क्षुधाक्रांत श्रमलां बहू ॥५५॥
आतां सत्वर करुनी स्नान भोजनें तोषवावा पंचप्राण वाट पाहतां शिणले नयन येव्हडा उशीर कां केला ॥५६॥
मग स्नानादि सत्कर्माचर करुनि संपादिलें भोजन यावरी प्राण पतीचरण वंदोनि सती विनवीतसे ॥५७॥
स्वामी शकट आणितां वाटे नेणतां कर्म घडलें वोखटें प्रारब्धींचें विधान मोठें कदां न सुटे भोगिल्याविण ॥५८॥
पुत्र आपुला अतीसुंदर भास्कर नामागुण गंभीर आजि तयाचा संहार जाला शकट चक्रातळीं ॥५९॥
एवं वाक्य ऐकतां कर्णीं प्रचीत खोंचला अंतःकरणीं धबधबां वक्षस्थळ बडवोनीं अंगणीं येवोनि पडियेला ॥६०॥
उचलोनि पुत्राचें मडें प्रचीत विप्र आक्रोशें रडे मूर्छा गत धरणी पडे उठे लोळे गडबडां ॥६१॥
बाहेरी फूटला समाचार मिळालीं सकळा नारीनर दुःखार्ण वाचा नलागे पार एकचि कल्होळ वर्तला ॥६२॥
आक्रोशें रए सुंळजा माता आहारे पुत्रा गुणवंता मज टाकोनि स्वर्ग पंथा त्वांचि गमन पुढें केलें ॥६३॥
बारे सुकुमारा राजसा सखया वद रे पाडसा अवलोकितां दाही दिशा वोस दिसती तुजवांचोनि ॥६४॥
गेलें हातींचें अनर्घ्य रत्‍न अहा जालें वंश खंडण तान्हया बाळा तुझें वदन आतां पुढतीं कैंचे देखों ॥६५॥
नवमास होतासी माझिया जठरीं स्तनपान केलें षण्मासवरी मज लोटून भवसागरीं गमन दूरी केलें तुवां ॥६६॥
पूर्वजन्मीं मी व्रत धरिलें पूर्ण न करितां मध्येंचि खंडिलें किंवां श्रीहरीतें निंदिलें कीं छळिलें महापुरुषा ॥६७॥
किंवां घडला गुरुद्वेष कीं संत महतांसीं लाविला दोष कीं कोणाचे मुखींचा ग्रास निर्दयपणें म्या काढिला ॥६८॥
किंवां केला पंक्तिभेद विन्मुखें दवडिला ब्रह्मवृंद कीं कुरंगी पाडसाचा वध पूर्वीं घडला मजलागीं ॥६९॥
ऐसे नाना परीचे दोष मजलागीं घडले विशेष यास्तव ये जन्मीं राजस अल्पवय निर्मिला ॥७०॥
आजी बुडालें माझें जहाज दुःखसागरीं ग्रासिलें मज धरणीवरी न पाहिलें तुज विऊनि वांझ मी जाहल्यें ॥७१॥
मज अंधळी याची काठी कोणी हरिली उठाउठी मज दरिद्री याची गांठी कोणी सोडिली निर्दयें ॥७२॥
कां रे बाळका न बोलसी तुज झोंप लागली कैसी पान्हा दाटोनि आला स्तनासीं केव्हां पिसी तान्हया ॥७३॥
पुर्वजन्मींची मी तुझी वैरीण यास्तव जासी दावा साधून आतां अबोला सांडोन बोल वचन एकदां ॥७४॥
अहारे सर्वेशा नारायणा यावरी काय पहावें नयना अरे ब्रह्मया माझें प्राक्तना काय लिहिलें वोखटें ॥७५॥
भडभडां शोकाचे उमाळे गडबडां भूमीवरी लोळे मस्तकींचे केश मोकळे धुळीनें मळे सर्वांग ॥७६॥
मातेचा शोक ऐकतां कानीं पशुपक्षी गहिंवरले मनीं तापलें समुद्राचें पाणीं मेदिनी उकलों पहातसे ॥७७॥
प्रचीत विप्र मोकली हांका अहारे पुत्रा कुळदीपका मातें सोडोनि स्वर्ग लोका पुण्यवंता गेलासी तूं ॥७८॥
माझिया हस्तें करुन पुत्रा तूतें जाहलें मरण बाळ ब्रह्महत्या लागली पूर्ण काळ तोंडया मी जालो ॥७९॥
मी तरी पापिष्ट अकर्मी हत्या न जाती जन्मोजन्मीं मजला रहावयातें भूमी ठाव नेदी सर्वदा ॥८०॥
मावळला पुत्र दिवाकर पडिला वंशीं अंधःकार दुष्टकर्माचा अतिदुस्तर कलंक वदनी बैसला ॥८१॥
पूर्वजन्मींचें कर्म गहन कदा न चुके भोगिल्यावीण अहा जालें वंशखंडन पापदारुण घडलें असे ॥८२॥
पाषाण प्रहारें प्रचीत विप्र धबधबां पिटी आपुलें उदर मूर्च्छा आली तेणें शरीर विकळ पडिलें धरणीवरी ॥८३
मूर्च्छा सांवरोनी प्रचीत दीर्घस्वरें आक्रोशें रडत पुत्रमुखीं मुख घालीत चुंबन देत करुणास्वरें ॥८४॥
प्रचीत विप्राचिया शोका पाहोनि गहिवर नाटोपे लोका ह्मणती गोविंदा वैकुंठ नायका काय दुःखा दाखविसी ॥८५॥
असो मिळोनी विद्वज्जन विप्रासी करिती बोधन कोणाचा पुत्र आणिला कोठून शोक किमर्थ करितोसी ॥८६॥
पंच महातत्वांचे अंश घेवोनि शरीर निर्मिलें डोळस शेवटीं जयाचें तयास देतां कासया सिणावें ॥८७॥
तें शरीर उदयभुवनीं जन्मतां प्राणी आपुलें मानी परी हे अशाश्वत मुळीं हूनी ऐसा विचार न पाहसी ॥८८॥
ऊष्णकाळीं वृक्ष छायेसी बैसतां आपुलीं ऐसें मानिसी परी ऊष्ण सरतां निश्चयेंसी छाया हरपे पाहतां ॥८९॥
मग त्या छायेचा शोक जाण करणें हें तो मूर्खपण नूतन वस्त्रें प्रावर्ण करितां आल्हाद मनुष्या ॥९०॥
त्या वस्त्राचा ऋणानुबंध होय तोंवरी आपुले जवळी राहाय संबंध सरतां चोरींत जाय फाटे जळे अग्नींत ॥९१॥
वृक्षावरी पक्षी बैसती प्रभात काळीं उडोनि जाती परी त्या पक्षियांचा शोकचित्तीं वृक्षें किमर्थ करावा ॥९२॥
ऋण हत्या आणि वैर अंगीं असतां जन्मती कुमर दावा साधोनि सत्वर निघोनि जाती आणीके स्थळीं ॥९३॥
अनंत जन्म होती जाती पुत्रपितयांची नसे गणति तूं एक जन्माचा सांगाती आपुलें मानिसी व्यर्थ हे ॥९४॥
तुझा पुत्र पावला मरण तूं काय होसी अमरासमान मृत्युलोकींची वस्ती जाण चिरायू कोण राहिला ॥९५॥
शरीर जें जें उत्पन्न जालें तें काळें आधींच अवंतीलें प्राणी तयासीं ह्मणती आपुलें परी न चाले शेवटीं ॥९६॥
तेव्हां टाकी तया प्राणी प्राणाचा स्वाधीन ह्मणोनि प्राणी तो वेगळा जडाहूनि ईश सत्तेनें वर्ततसे ॥९७॥
जीव अखंड शाश्‍वत कवणाचा नव्हे संबंधी सुत नाशिवंत पडिलें प्रेत याचा शोक कां करिसी ॥९८॥
आतां प्रचीता सावधान होवोनि करी पुत्राचें दहन प्रारब्धाची गती गहन भोगिल्यावीण चुकेना ॥९९॥
ह्मणोनि सांगती पुराणें सत्कर्म करा अभिमानाविणें अर्पावें तें इश्‍वरा कारणें संतुष्टमनें असावें ॥१००॥
दुःख हो किंवा सुख होय समजावा तो पाप पुण्य क्षय स्वधर्मासी करितां व्यत्यय सुटेल काय दुःखां तुनी हा ॥१॥
ऐसा प्रचीत विद्वज्जनीं प्रबोधिला शब्द रत्‍नीं मग पुत्राचें दहन करोनी शास्त्रोक्त क्रिया संपादिल्या ॥२॥
भीष्म सांगती धर्मासी काय दुःख त्या प्रचीतासी परी न चुके ईश्‍वर चिंतनासी सत्धर्मासी न सोडी कदा ॥३॥
आर्या ॥ लवनिमिष तरीही ॥ नढळे श्रीकृष्ण नाम वाचेतें ॥ ऐशा धर्मिष्ठ पवित्र ॥ त्‍हृदयीं परमेशमान वाचेतें ॥१॥
पुढिले अध्यायीं कथा सुरस आहे अमृताहूनि विशेष कर्णद्वारें श्रोतयांस प्राशना देईल पैं ॥४॥
स्वस्तिश्री परशुरामविजयकल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु अष्टविंशोऽध्याय गोड हा ॥२८॥ श्रीसमुद्रमदहारकार्पणमस्तु॥शुभंभवतु॥