सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सत्यनारायणाची पूजा कधी करावी?

Satyanarayan Puja
Satyanarayan Puja सत्यनारायण हे एक काम्य पौराणिक व्रत आहे. हे व्रत महाराष्ट्रासह इतर काही प्रांतात फार लोकप्रिय आहे. या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात, रेवा कांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषींनी केला आहे. साधरणत: कमळावर बसलेल्या नारायणाचे चित्र ठेवून हा विधी करतात.
 
सत्यनारायणाची पूजा कधी करावी?
ही पूजा सामान्यत: प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, एकादशीला किंवा अन्य शुभ दिवशी केली जाते. तसेच विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, एखादे मंगल कार्य निर्विघ्न पार पडल्यावर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील ही पूजा केली जाते. या प्रसंगांमध्ये विवाह, मौंज, पदवी प्राप्त झाल्यास, नवीन नोकरीची सुरुवात, नोकरीत प्रगती, नवीन घर खरेदी, काही विशेष प्रसंग समाविष्ट असू शकतात. 
 
श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे. काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण, पूजन करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे. या पूजेने मनात श्रद्धा भक्ती निर्माण होणे, प्रसन्न वाटणे, उपासना करण्याची प्रेरणा जागृत होणे असे स्वरूप असले पाहिजे.
 
खरं तर सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी करता येऊ शकते. ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादीत नाही तरी पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ असल्याचे मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीप्रमाणे ही पूजा केली जाते.
मनातील सर्व फले सत्यनारायण व्रताने प्राप्त होतात
एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदि ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला, "हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा." यावर सूत सांगतात, "मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत आले. आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले.

सत्यनारायण कथा मराठी

त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला." नारद म्हणाले, "ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो." नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, "मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन." नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत." नारद म्हणाले, "हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे." भगवान् म्हणतात, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. या खेरीज अनेक प्रांतात सत्यनारायणाच्या विविध कथा प्रचलित आहेत. ते व्रत म्हणजेच सत्यनारायण पूजा व व्रत कथा.