शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (08:42 IST)

Quit India Movement Day: स्वातंत्र्याचा अखेरचा लढा सुरू झाला आणि महात्मा गांधींनी सच्चा साथीदार गमावला...

nehru gandhi
नामदेव काटकर
8 ऑगस्ट 1942 ची संध्याकाळ. मुंबईतील गवालिया टँक मैदानात लाखोंच्या संख्येत जनसमुदाय जमला होता.
 
स्वातंत्र्यापूर्वीच्या शेवटच्या सर्वांत मोठ्या लढ्याची घोषणा इथून होणार होती.
 
मैदानभर स्वातंत्र्याच्या ध्येयानं भारावलेला जनसमुदाय होता. त्यांच्यासमोर 73 वर्षांचा एक वृद्ध उभा राहिला. समोरचा जनसमुदाय कानात जीव आणून ऐकू लागला.
 
या वृद्धानं इशारा देण्याची कृती करून हात उंचावत 'करेंगे या मरेंगे'च्या निर्धारानं घोषणा दिली आणि या घोषणेनं ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेचा शेवटचा अंक सुरू झाला.
 
ती घोषणा होती - 'Quit India'
 
आणि घोषणा देणारे वृद्ध होते - मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी
 
चले जाव (Quit India) च्या घोषणेनं जमलेल्या जनसमुदायात विजेची लहर पसरली.
 
ब्रिटिशांविरोधातल्या घोषणांनी निनादणाऱ्या मुंबईच्या अवकाशातला सूर्य स्वातंत्र्याची पहाट उगवण्याचं स्वप्न दाखवत मावळतीकडे झुकू लागला.
 
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं सर्वांत मोठं आंदोलन म्हणून 'चले जाव'ची नोंद होते. या आंदोलनात असंख्य भारतीयांनी सहभाग नोंदवला. देशभरातील तुरुंगच्या तुरुंग भरले. भूमिगत आंदोलनांनी ब्रिटिशांना हैराण करून सोडलं.
 
तुरुंगात जाऊन नि भूमिगत राहून स्वातंत्र्याची मशाल धगधगत ठेवणाऱ्यांचे या आंदोलनादरम्यानचे काही प्रसंग आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहे.
 
तत्पूर्वी, भारत छोडोच्या नावापासून, नि या आंदोलनाच्या आवश्यकतेपासूनच सुरुवात करू.
 
'भारत छोडो'ची गोष्ट
14 जुलै 1942 रोजी वर्ध्यात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे' हा ठराव इथंच झाला.
 
यानंतर महिन्याभरातच म्हणजे 7 आणि 8 ऑगस्टला मुंबईत पार पडलेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीत ठराव मंजूर झाला. आणि या ठरावाची घोषणा गवालिया टँक मैदानातील ऐतिहासिक जाहीर सभेतून करण्यात आली.
 
संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेली ही सभा रात्री 10 वाजता संपली.
 
या सभेत चौघांची भाषणं झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांचं पहिलं भाषण झालं, मग पंडित नेहरूंनी काँग्रेस कार्यकारिणीचे ठराव वाचून दाखवले. नंतर नेहरूंनी मांडलेल्या ठरावांना अनुमोदन देणारं भाषण सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं.
 
चौथे वक्त होते महात्मा गांधी. या सभेत महात्मा गांधींनी एकूण तीन भाषणं केली. यातलं एक भाषण इंग्रजीत होतं आणि त्यातच त्यांनी 'Quit India' ही प्रसिद्ध घोषणा केली.
 
या 'Quit India'चे पुढे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले. जसं या घोषणेला हिंदीत 'भारत छोडो' आणि मराठीत 'चले जाव' म्हटलं गेलं.
 
या घोषणाच्या व्युत्पत्तीचीही एक रंजक गोष्ट आहे.
 
घोषणा तयार करणारा मुंबईचा महापौर
ब्रिटिशांना भारत सोडण्याचा अखेरचा इशारा देणारी घोषणाही खमकी हवी, म्हणून महात्मा गांधींनी निर्धार व्यक्त करणाऱ्या घोषणेच्या शोधासाठी अनेकांशी चर्चा केली. तेव्हा बरेच शब्दप्रयोग समोर आले.
 
त्यातील एक होतं 'Get Out'. पण या शब्दात उद्धटपणा अधिक दिसत होता. त्यामुळे गांधींनी हे शब्द नाकारले.
 
त्यानंतर सरदार पटेलांनी 'Retreat India' आणि 'Withdraw India' असे दोन शब्द सूचवले. मात्र, हे शब्दप्रयोगही फारसे आवडले नाहीत.
 
त्याचदरम्यान युसुफ मेहरअलींनी 'Quit India' हा शब्द सूचवला आणि महात्मा गांधींनी तो तात्काळ मान्य केला. यापूर्वी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन होतं, तेव्हाही 'सायमन गो बॅक' ही घोषणा युसुफ मेहरअलींनीच तयार केली होती.
 
या काळात युसुफ मेहरअली काँग्रेसमध्येच सक्रीय होते. काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या नेत्यांमधील ते प्रमुख नेते होते. तसंच, या ऐतिहासिक आंदोलनाची हाक जिथं दिली गेली, त्या मुंबई शहराचे ते विद्यमान महापौर होते.
 
ब्रिटिशांकडून धरपकड
क्वीट इंडिया (भारत छोडो किंवा चले जाव) या घोषणेनं अवघ्या भारताला जागं केलं आणि स्वातंत्र्यसंग्रामाच्या अखेरच्या लढाईत सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं.
 
एकतर महात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी आरपारच्या लढाईसाठी तयार झाले होते, तर दुसरकीडे भारतवासियांनीही अभूतपूर्व सहभाग या आंदोलनात नोंदवण्यास सुरुवात केली.
 
आंदोलनाची तीव्रता पाहता नेत्यांसह कार्यकर्त्यांना ब्रिटिश तुरुंगात टाकू लागले. याची सुरुवात गवालिया टँकवरून भाषण करणाऱ्या चौघांपासूनच म्हणजे गांधी, नेहरू, पटेल आणि आझादांना तुरुंगात टाकण्यापासूनच झाली. ऐतिहासिक सभेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी या चौघांना तुरुंगात टाकण्यात आलं.
 
गांधीजींना पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं, तर देशभरात स्वातंत्र्याच्या या अग्निकुंडात उड्या घेणाऱ्यांना विविध तुरुंगात डांबण्यात आलं.
 
काहीजण स्वातंत्र्यासाठी तुरुंगाचा मार्ग पत्कारला, तर काहींनी भूमिगत राहून आंदोलनाची ताकद वाढवली.
 
स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या लढवय्यांचे तुरुंगातील नि भूमिगत आंदोलनातील काही प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत, काही थरारक आहेत, काही भावनिक आहेत, तर काही रंजकही आहेत. आपण त्यातले निवडक प्रसंग या लेखात पाहू.
 
साने गुरुजी जेव्हा शेटजीच्या वेशात फिरत...
गांधींनी मुंबईतून ब्रिटिशांना उद्देशून 'चले जाव'ची घोषणा केली, तेव्हा साने गुरुजी खान्देशातल्या अंमळनेरमध्ये होते. देशातले समाजवादी भूमीगत राहून या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांना कळलं.
 
या काळात साने गुरुजींनी सातारा, खान्देशा भागांमध्ये फिरून कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेतल्या आणि लढ्यासाठी स्फूर्ती देणारं मार्गदर्शन केलं.
 
मुंबईत तर साने गुरुजी भूमीगतांसोबतच राहत. त्यांच्यासाठी स्वयंपाक करत.
 
भूमीगत कार्यकर्ते जिथं राहत, त्या ठिकाणांना संतवाडी, राजगड, हडळ हाऊस, मूषक महाल अशी खुणेची नावं देण्यात आली होती. भूमीगतांना भेटण्यासाठी जाताना साने गुरूजी वेशांतर करून जात.
 
कधी धोतर, कोट, उपरणं आणि पगडी असा एखाद्या शेटजीसारखा वेश असे, तर कधी पैरण-मुडांसे, घोंगडे घेऊन शेतकऱ्यचा वेश असे.
 
एकदा तर डॉक्टराच्या वेशात साने गुरुजींनी जयप्रकाश नारायण यांना जेवू घातले होते.
 
साने गुरुजींचं भूमीगत राहून सुरू असलेलं काम 18 एप्रिल 1943 ला थांबलं. कारण या दिवशी 'मूषक महाला'तून पोलिसांनी त्यांना अटक केली.
 
साने गुरुजींसह, शिरुभाऊ लिमये, ना. ग. गोरे असे एकूण 14 जण तिथं पकडण्यात आले. तिथून त्यांना येरवाडा तुरुंगात नेण्यात आले. तिथेही त्यांनी आधीपासूनच तुरुंगात असलेल्यांचं जीवन सुखकर होईल, असाच प्रयत्न केला. येरवाड्यातून नाशिकमध्ये ते दाखल झाले.
 
पुढे चले जाव आंदोलन ओसरलं, तेव्हा जळगाव शहरात साने गुरुजींची 46 बैलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती.
 
गांधींना भेटण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या अरुणाबाई
चले जाव आंदोलनाच्या नायिका म्हणून अरुणा असफ अलींकडे पाहिलं जातं. भूमीगत राहून स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या अरुणाबाईंच्या क्रांतीच्या निर्धाराला स्वत: महात्मा गांधीही बदलू शकले नाहीत. मात्र, गांधींची भेट घेण्यासाठी अरुणाबाईंनी केलेलं अद्वितीय धाडस इतिहासात नोंदवलं गेलंय.
 
अरुणाबाई विचारानं समाजवादी. चले जाव आंदोलनातील त्यांचे समाजवादी साथी एक एक करून गजाआड होत होते. त्यात जयप्रकाश नारायण यांना गुन्हा मान्य करण्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपवल्याची बातमी फुटली. संपूर्ण देश हादरला. यावेळी अरुणाबाईंची तर सरकारला खाऊ की गिळू अशी अवस्था झाली होती.
 
पायाला भिंगरी लावून अरुणाबाई तरुणांना चळवळीत आणण्यासाठी फिरत होत्या. हे सर्व भूमीगत कार्य असल्यानं त्यांची तब्येतही ढासळत जात होती.
 
अरुणाबाईंच्या तब्येतीच काळजी वाटत असल्याचं म्हणत गांधीजींनी त्यांना भेटण्यास बोलावले. या भेटीची जबाबदारी ग. प्र. प्रधान यांच्यावर होती.
 
पुण्याच्या पारसी सॅनिटोरियमच्या मागील बाजूस गांधीजींच्या निवासाची कुटी होती. सॅनिटोरियमचा भाग असल्यानं तिथं फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. याचाच फायदा घेत अरुणाबाई तिथं पोहोचल्या.
 
अरुणाबाई वेशांतर करून तिथं पोहोचल्या होत्या. पारशी महिलेचं वेशांतर अरुणाबाईंनी केलं होतं. गांधींना त्यांची ओळख पटावी म्हणून अरुणाबाईंनी गांधींना भेटल्यावर 'कापडिया' हा सांकेतिक शब्द उचारण्याचं ठरलं होतं.
 
अरुणाबाईंना पाहताच गांधींनी त्यांना घातपाती चळवळ बंद करून पोलिसांच्या स्वाधीन होण्याची विनंती केली.
 
मात्र, त्यावर अरुणाबाई म्हणाल्या, "मी तुमचा अत्यंत आदर करते. पण आपले विचार जुळणारे नाहीत. मी क्रांतीवादी आहे आणि क्रांतीवादी म्हणूनच काम करणार. आपल्याला शक्य असल्यास मला आशीर्वाद द्यावा."
 
आपले रस्ते वेगळे आहेत, हे सांगण्याचे धाडस अरुणाबाईंमध्ये होतं आणि गांधींनी भेटीसाठी बोलावलंय म्हटल्यावर जीवावर बेतणार असल्याचं कळूनही त्यांना भेटण्यासाठी जाण्याचं धाडसही त्यांच्यात होतं.
 
अरुणा असफअली मात्र अखेरपर्यंत इंग्रजांच्या हातात सापडल्या नाहीत. त्यांना पकडून देणाऱ्यास पाच हजारांचं बक्षीस इंग्रजांनी जाहीर केलं होतं.
 
युसुफ मेहरअलींनी अरुणाबाईंबद्दल म्हटलं होतं की, 'झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनंतर अरुणाताई याच स्वातंत्र्ययुद्धाच्या नायिका होत्या.'
 
लग्नाच्या दोन महिन्यांनी तुरुंगात गेलेले यशवंतराव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेसुद्धा 1942 च्या दरम्यान स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय होते. त्यामुळे 1942 च्या चले जाव आंदोलनात त्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
 
चले जाव आंदोलनातील सहभागामुळे यशंतरावांना तुरुंगात जावं लागण्याच्या दोन महिन्यांधीच त्यांचं लग्न झालं होतं.
 
'लग्न करीन तर देशभक्ताशीच' असं म्हणत 2 जून 1942 रोजी वेणूताईंनी यशवंतरावांशी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर त्यांना सुरुवातीच्या काही वर्षातच प्रचंड खास्ता खाव्या लागल्या. मात्र, त्या डगमगल्या नाहीत.
 
या आंदोलनात यशवंतराव सक्रीय असल्यनं वेणूताईंनाही अटक करण्यात आली. संक्रातीचे दिवस होते. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीत आपल्यामुळे पत्नीला तुरुंगात जावं लागल्याची खंत यशवंतराव पुढे अनेकदा बोलून दाखवत. मात्र, वेणूताई मोठ्या धीटानं या सगळ्या प्रसंगाला सामोरं गेल्या.
 
गांधीजींची 'सावली' महादेवभाई देसाईंचं निधन
1917 मध्ये महादेवभाई देसाईंनी महात्मा गांधीजींसोबत काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मृत्यूपर्यंत म्हणजे 25 वर्षं ते गांधीजींची 'सावली' बनून वावरले.
 
सचिव, लेखनिक, अनुवादक, समुपदेशक, संवादक... अशा कित्येक भूमिका त्यांनी गांधींसाठी पार पाडल्या. अगदी गांधींसाठी ते स्वयंपाकही करायचे. महादेवभाईंनी बनवलेली खिचडी गांधींना खास आवडायची, असं गांधींचे चरित्रकार रामचंद्र गृहा यांनी नोंदवलंय.
 
गांधींनी 'चले जाव'ची हाक दिल्यानंतर त्यांना अटक करून पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं. तिथं कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांनाही डांबून ठेवण्यात आलं.
 
तिथेच महादेवभाई देसाईंचं 15 ऑगस्ट 1947 रोजी हृदयविकारानं निधन झालं. महादेवभाईंचं मृत्यूसमयी वय 50 वर्षं होतं.
 
महादेवभाईंच्या मृत्यूनं महात्मा गांधींना मोठा धक्का बसला होता. स्वातंत्र्यापूर्वीच्या या (चले जाव आंदोलन) सर्वांत मोठ्या लढ्यावेळीच महादेवभाई गांधीसोबत नसणार होते.
 
रामचंद्र गृहा लिहितात, महादेवभाईंच्या मृत्यूनंतर त्यांना पदोपदी त्यांची आठवण येत होती. गांधीजींच्या हत्येच्या एका आठवडा आधीपर्यंत ते अनेक गोष्टींमध्ये व्यग्र होते.
 
देशात जेव्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी गांधी फिरत होते, त्यावेळी आपली मोठी भाची मनू हिला गांधी म्हणाले, "कधी नव्हे इतकी आता महादेवची आठवण येते आहे. तो असता तर आताची ही परिस्थिती इतकी विकोपाला गेली नसती."
 
महादेवभाईंचं निधन हे गांधींना 1942 च्या आंदोलनादरम्यान दु:खाच्या खाईत लोटणारा प्रसंग होता.
 
आसामची कनकलता ते प्रति सरकारच्या काशीबाई हणवर
रोहिणी गवाणकरांनी 'साधना'च्या 1997 च्या अंकात भारतीय लढ्यातील स्त्रियांच्या सहभागाबाबत माहिती दिलीय. त्यात त्यांनी 1942 सालच्या आंदोलनातील महिलांच्या सहभागावर विशेष लिहिलं आहे आणि या आंदोलनातील हृदयद्रावकताही यातून दिसून येते.
 
आसाममधील कनकलता बारुया या 16 वर्षांच्या तरुणीचं शौर्य अजरामर झालं. 1942 च्या लढ्यात कनकलतानं उडी घेतली. पोलीस ठाण्यासमोर झेंडावंदन करण्यासाठी तिनं तरुण-तरुणींना जमवलं. तिथं पोलीस ठाण्यासमोरच कनकलतानं भाषण केलं.
 
तेव्हा झेंडावंदन होण्यापूर्वीच पोलिसांनी जमलेल्या तरुण-तरुणींवर गोळीबार करण्यास सुरुवात झाली. त्यातच कनकलताचा अंत झाला. स्वातंत्र्यासाठी हुतात्मा होणारी पहिली तरुणी म्हणून तिची नोंद इतिहासानं घेतली, असं गवाणकर लिहितात.
 
भूमीगत रेडिओ स्टेशन चालवणाऱ्या गांधीवादी डॉ. उषा मेहता आज अनेकांना परिचित आहेत. उषा मेहता 1942 मध्ये कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यांनी मुंबईमध्ये भूमीगत रेडिओ स्टेशन चालवलं होतं. या रेडिओवरून त्या दुसऱ्या महायुद्धासह देशातल्या चळवळीची माहिती देत असत.
 
हे रेडिओकेंद्र नेहमी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवावं लागे. पोलिसांनी हे केंद्र शोधून काढण्याचा चंगच बांधला होता. उषाताईच्या कामाबद्दल माहिती असणाऱ्या एका फितुराने घात केला. परिणामी त्या रेडिओवर बातम्या देत असतानाच पकडल्या गेल्या, अशी माहिती गवणाकरांनी दिलीय.
 
यातला सगळ्यांत हृदयद्रावक आणि धक्कादायक प्रसंग म्हणजे प्रति सरकारमधील काशीबाई हणवरांचा.
 
सातारा जिल्ह्यातील नाना पाटलांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या महिला कार्यकर्त्यांचा इंग्रजांकडून खूप छळ होई.
 
काशीबाई हणवर नावाच्या एका महिलेच्या गुप्तांगात पोलिसांनी मिरची पावडर घातली. तिने हा अपमान, छळ आणि कौर्य सहन केलं. पण शेवटपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांचे नाव अगर पत्ता तिने सांगितला नाही.
 
संदर्भ :-
 
साने गुरुजी - राजा मंगळवेढेकर (चरित्र)
नाना पाटील - भारत पाटणकर (चरित्र)
गांधी-पर्व - त्र्यं. वि. पर्वते
कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
विरंगुळा : यशवंतरावांचे अंतरंग - रामभाऊ जोशी
क्रांतिपर्व - डॉ. उत्तमराव पाटील
चले जाव आंदोलनाची जननायिक - रोहिणी गवाणकर (साधना, ऑगस्ट अंक)
चले जाव विशेषांक (साधना, ऑगस्ट 2017)
Bapu's Right Hand - रामचंद्र गुहा (द टेलिग्राफ ऑनलाईन)
मराठी विश्वकोश