सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:52 IST)

मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय

प्रिय भारतवासीयांनो,
मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.

यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला.

स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला.

माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल.

मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे.

माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा.

माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.