मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. धोका चिनी ड्रॅगनचा
Written By अभिनय कुलकर्णी|

भारत-चीन तुलना

चीन आणि भारत हे दोघेही अवाढव्य देश आहेत. आशियातल्या दोन मोठ्या शक्तीही आहेत. उद्याच्या महासत्तांमध्ये त्यांची गणनाही होते आणि दोघे परस्परांचे स्पर्धकही आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांमधली ही तुलना.

दोन्ही देशांत लोकसंख्येचा स्फोट झाला आहे. पण ती नियंत्रणात आणण्यासाठी कुणी काय केले? चीनमध्ये कुटुंब नियोजनाचा अवलंब १९७० पासून झाला, भारतात १९५२ पासून. पण २००१ मध्ये भारताचा जनन दर चीनच्या तिप्पट होता. भारतात दर वर्षी एक कोटी ८० लाख लोक जन्माला येतात, चीनमध्ये फक्त ९० लाख.

भारताचे प्रती माणशी वार्षिक उत्पन्न ४४० अमेरिकन डॉलर्स आहे, चीनमध्ये तेच ९९० आहे. जागतिक बॅंकेने निश्चित केलेल्या मानकानुसार भारतात २६ ते २९ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली रहातात. चीनमध्ये हेच प्रमाण अवघे तीन टक्के आहे.

चीनमध्ये दरवर्षी आठ कोटी ७० लाख पर्यटक बाहेरच्या देशातून येतात. भारतात हेच प्रमाण जेमतेम २५ लाख आहे. ही आकडेवारी २००२ ची असली तरी आपल्या बाजूने त्यात फार वाढ झालेली नाही. पर्यटनाचा व्यवसाय आपल्याकडे असलेल्या आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रा सात पट मोठा आहे. हा उद्योग चीनमध्ये ३७०० अब्ज डॉलरची उलाढाल करतो. पण मोठा इतिहास असणारा, वैविध्यपूर्ण संस्कृती, भाषा असणार्‍या आणि पहाण्यासारखे खूप काही असलेल्या भारतात मात्र हा व्यवसाय अजूनही नीट बहरू शकलेला नाही. परिणामी या बाबतीत आपण चीनच्या बर्‍याच मागे आहोत. एका पर्यटकामागे दोन ते चार नोकर्‍या निर्माण होतात.

परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत चीन व हॉंगकॉंग मिळून २००२ मध्ये १०६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली. भारतात हे प्रमाण अवघे ३.६ अब्ज डॉलर्स आहे. भारताच्या सातशे पट ही गुंतवणूक आहे. हॉंगकॉंग आणि मकाऊ पकडले तर चीनची निर्यात भारताच्या एक हजार टक्क्यांहून जास्त आहे.चीनच्या सकल उत्पन्नातील ५० टक्के भाग उत्पादन क्षेत्रातून येतो. भारतात हे प्रमाण जेमतेम २५ टक्के आहे.

शेतीच्या बाबतीतही चीन भारताच्या पुढे आहे. मुळातच एकरी उत्पन्नाच्या जागतिक मानकातच आपण मागे आहोत. चीन कमी क्षेत्र लागवडीखाली आणूनही आपल्यापेक्षा जास्त उत्पादन घेतो. चीनचे कृषी उत्पादन ४१५ दशलक्ष टन प्रती वर्ष आहे. भारताचा हाच आकडा २०८ दशलक्ष टन प्रती वर्ष असा आहे. वास्तविक कृषी उत्पन्नात भारताला चीनपेक्षा जास्त संधी आहे. कारण सूर्यप्रकाश, पाऊस, नद्या, तलाव, समुद्र किनारे आणि कष्टाळू नागरिक यांच्या सहाय्याने हे उत्पादन भरपूर वाढायला संधी आहे.


शिक्षण क्षेत्रात ९९.१ टक्के चीनी मुले किमान नऊ वर्षे तरी शाळेत जातात. त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अर्थातच मोठे आहे. त्या तुलनेत भारतात हेच प्रमाण जेमतेम ५० ते ६० टक्के आहे.

आपल्याकडचे सरकार, प्रशासन, निमसरकारी संस्था या विकासात कमी पडतात. अनेकदा तर अडथळाच ठरतात. परिणामी भारताला अनेक क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य असूनही प्रत्यक्ष कामगिरीत मात्र आपण कमी पडतो. म्हणूनच भारतीय लोक भारताबाहेर गेल्यानंतर मात्र चांगली कामगिरी करून दाखवतात. (संकलन-अभिनय कुलकर्णी)