गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. प्रेरणादायक प्रसंग
Written By Author रोहन राजेंद्र बेनोडेकर|

हिंदू साम्राज्य दिवस - वर्ष ३५०

Chhatrapati Shivaji Maharaj 350th Rajyabhishek ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शालिवाहन शके १५९६, ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ६ जून १६७४ रोजी एक अपूर्व असा सोहळा घडला. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती जाहले. रायगडाच्या दरबारात डोळे दिपवणारा, रयतेच्या मनाला एक फार मोठे समाधान व आश्वासन देणारा, जगाला स्वातंत्र्याची ग्वाही देणारा असा हा वैभवसंपन्न उत्सव पार पडला ज्याने एक नवीन शक सुरु झाले. या युगप्रवर्तक दिनाचे हे तीनशे पन्नासावे वर्ष म्हणून शिवरायांच्या स्वराज्य कार्याची महती सांगण्यासाठी, त्यांची मूल्ये, तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी हे संपूर्ण वर्ष आपण हा सोहळा वेगळ्या वेगळ्या रूपात, विविध सामाजिक स्तरांवर साजरी करणार आहोत.  निश्चितच हा सोहळा फार मोठा होता आणि त्याची अनेक कारणे होती. त्यामुळे या सोहळ्याची आणि घटनेची महती समजण्यासाठी ही कारणमीमांसा जाणून घेणे आवश्यक ठरते.
 
परकीय आक्रमण
याच्यासाठीची पार्श्वभूमी राज्याभिषेकाच्या सुमारे हजार वर्षांपूर्वी सुरु होते. सुजलाम सुफलाम भारत देश संस्कृती आणि वैभवाच्या परम शिखरावर होता. महाभारत, युधिष्ठिरानंतर अनेक शतके लोटली आणि भारत पुन्हा वेगवेगळ्या राज्य, गणराज्य, प्रदेशांमध्ये विभागल्या गेला. सत्ता आणि संस्कृती मात्र मूळ जशी होती तशीच राहिली. या काळात चंद्रगुप्त, विक्रमादित्य, सम्राट अशोक, चोलराजे, राजा पोरस यांसारखे महान राज्यकर्ते आणि आचार्य चाणक्यांसारखे विद्वान होऊन गेले. आधुनिक, प्रगत जीवनमूल्ये आपल्या देशाच्या संपन्न जीवनपद्धतीत रुजू होत गेली. सोनियाच्या भारताची अजून भरभराट जाहली.
 
भारताच्या पश्चिमेकडे अरबस्तानात मात्र एक वादळ घोंगावत होते. एक अतिशय आक्रमक प्रवृत्ती उदयाला येत होती. आणि त्यातच तिथल्या अश्या एका आक्रमकांची नजर पडली भारतावर. दार-उल-हर्ब हिंदुस्थानवर. मुहम्मद-बिन-कासीम त्याचे नाव. अरबांचा तो सुलतान होता. भारतभूमीच्या वैभवाची वार्ता त्याच्या कानावर पडली आणि तो सैन्य घेऊन निघाला. खैबरखिंड ओलांडून सिंध प्रांतावर तो चालून आला. तेथील राजा दाहीरचे राज्य त्याने पार लुटून काढले. सुंदर मंदिरांचा विध्वंस केला. प्रजेला कैद करून गुलाम बनविले, त्यांच्या कत्तली केल्या. खुद्द दाहीरच्या राजकन्यांना जनानखान्यात कोंडले. येथील प्रचंड लूट आणि संपत्ती घेऊन तो अरबस्तानात परतला.
 
पुढे तीनशे वर्षे लोटली. सिंध प्रांताने पुन्हा एकदा कंबर कसून स्वतःला पूर्वरूप आणले. पण एव्हाना तुर्की जमातीच्या महमूद गझनीची नजर भारतावर पडली. भारताच्या वैभवाची बातमी कळताच हा तुर्की चाल करून आला. इथे येऊन त्याने प्रचंड लूट केली, कत्तली केल्या, निव्वळ विध्वंस केला आणि तो तुर्कस्तानात परतला. आता मात्र त्याला इथल्या वैभवाची चटक लागली होती. म्हणून त्याने दुसरी स्वारी केली, मग तिसरी, चौथी, अश्या त्याने भारतावर सतरा स्वाऱ्या केल्या! त्याच्या विध्वंसक आक्रमणापुढे युद्धात देखील धर्म पाळणारे हिंदू मातीच्या कणाप्रमाणे मोडून उधळून गेले.
 
या गझनीच्या डोळ्यावर धर्मांधतेची विकृत पट्टी होती. गुजराथ प्रांतातील सोरटी सोमनाथचे भव्य असे मंदिर, त्यावर त्याने आक्रमण केले. तेथील हजारो ब्राम्हणांनी नाना प्रकारे त्याला मूर्तीला हात न लावण्याच्या विनवण्या केल्या. मोबदल्यात सोन्याच्या अमाप राशी देण्याची तयारी दाखविली. परंतु या महमूदास स्वतःची कीर्ती 'बूत-फिरोश' म्हणजे मूर्ती विक्रेता अशी न गाजवता 'बूत-शिकन' म्हणजे मूर्तींचा संहारक अशी गाजवायची होती. ही मनिषा पूर्ण करण्यासाठी त्याने सोमनाथ आणि पुढे अनेक सुंदर मंदिरांवर सरसकट हल्ले करून विध्वंस केला.
 
'मोहम्मद गझनीने भारताचे वैभव समूळ नष्ट केले. अशी चाल तो चालला की, जेणेकरून हिंदू लोक मातीच्या परमाणूप्रमाणे मोडून उधळले गेले. त्याच्या मते हिंदू काफिर होते, त्यामुळे त्यांना नरकाच्या भट्टीत जाळणे आवश्यक होते. गझनीच्या स्वारीमुळे अनेक विद्वान पश्चिम प्रांताच्या सीमा सोडून काश्मीर आणि बनारस प्रांतात भयभीत होऊन पळून गेले.' - मोहम्मद गझनीच्या भारतावरील स्वारीचे अरबी लेखक अल-बिरुनी याने केलेले वर्णन.
 
पुढे महमूद गझनी मेला, पण त्याने पूर्वेकडील भारताचा रस्ता मात्र आक्रमकांना दाखवून दिला होता. तोच अवलंबून पुढे अनेक आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली आणि परिणामी हळूहळू भारतीय सत्ता परकीयांच्या हातात गेली..
 
महमूद गझनीच्या सतरा स्वाऱ्यांनंतर मात्र भारताला सावरायची संधीच मिळाली नाही. काहीच काळात गोमल खिंड ओलांडून मोहम्मद घोरी भारतात घुसला. मुहम्मद घोरीने भारताचा शेवटचा सम्राट पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला, त्यात घोरीला दुर्दैवाने इतर हिंदू राजांनीच राज्याच्या आमिषाने मदत केली आणि घोरीचा गुलाम सेनापती कुत्ब-उद्दीन ऐबक याने दिल्लीला गुलाम घराण्याच्या सल्तनतीची स्थापना करून परदेशी आक्रमकांची सत्ता दिल्लीला उभारली. हळूहळू त्यांनी संपूर्ण प्रदेश व्यापला. महाराष्ट्रातील यादवांच्या आणि पुढे दक्षिणेत विजयानगरच्या साम्राज्याचा पण त्यांनी नाश केला. संपूर्ण भारतात त्यांचे राज्य आले. भारत व्यापताना त्यांनी येथील संस्कृती, राहणीमान यांवर भयंकर आघात केले. क्रूरपणे जुलूम, कत्तली, मंदिरे-धर्मग्रंथांचा विध्वंस केला. येथील संस्कृतीच नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पश्चिम तटावर गोमंतकात हेच काम फिरंग्यांनी केले. भारतीय धर्म आणि संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. दडपशाही, कत्तली, बळजबरीचे धर्मांतर सुरु झाले. एतद्देशीयांना जगणे मुश्किल झाले.
 
वारेमाप कत्तली आणि त्यांनी एतद्देशीयांना घातलेली भीषण दहशत यांची उदाहरणे:
१. बल्बन - 'गाझी' म्हणजे काफ़िरांची नायनाट करणारा. सुलतान बनल्यावर 'गाझी'पद प्राप्त करून घेण्यासाठी बल्बनने दिल्ली व बंगाल मध्ये ओळीने वधस्तंभ उभारले आणि लाखो हिंदू व बौद्ध लोकांची निर्घृणपणे कत्तल केली. अनेक दिवस यमुनेचे पाणी लाल वाहिले. 
 
२. मुहम्मद बिन तुघलक - विरंगुळा म्हणून आपल्याच रियासतीत असलेल्या कनोज शहराला तुघलकाने वेढा घातला आणि एकूण एका माणसाची शिकार करविली. बर्फाळ हिमालयातून चीनवर स्वारी करण्याचा प्रयत्न याने केला आणि अर्धी फौज व सेवक म्हणून नेलेले भारतीय हिमालयात दफनवून बसला. त्याने दिल्लीची राजधानी देवगिरीला म्हणजेच दौलताबादेला हलविली. त्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हिंदूंवरील कर वीस पट वाढविले. शिवाय तांब्याच्या नाण्यांची किंमत अचानक वाढविली, त्यांना सोन्याच्या देखील वरचा दर्जा दिला. त्यामुळे अर्थव्यवस्थाच कोलमडली, महागाई वाढली. लोकांना कर भरणे शक्य होईना. अश्यावेळी मुहम्मद त्यांच्यावर फौजदारी अंमल करू लागला. फौज येताना दिसताच रयत शेती जाळून गावातून पसार होऊन जात. गावेच्या गावे ओसाड पडत. आपल्याच रयतेसोबत भांडणारा हा सुलतान होता.
 
३. तैमूरलंग - मुहम्मदाच्या मृत्यूच्या सुमारासच तुर्कीच्या बाजूला तैमूरलंग नावाचे एक भीषण वादळी व्यक्तिमत्त्व उदयाला येत होते. तैमूर चंगेझ खानच्या वंशजांचाच नातलग. पण तो चंगेझ खानचा वंशज नव्हता. त्यामुळे त्याची मंगोलिया मध्ये सत्ता प्रस्थापित होऊ शकली नाही. पण या सुमारास चंगेझ खानाची चघताई सल्तनत बुडायला आली होती. तेव्हा त्यांना नाममात्र सुलतान प्रस्थापित करून त्यांच्या साहाय्याने त्याने मध्य आशियातील प्रांतावर आक्रमण करून सत्ता प्रस्थापित करायला सुरुवात केली. पुढील पस्तीस वर्षे त्यानी केवळ युद्धे आणि आक्रमण करीत पर्शियाचा प्रत्येक प्रांत, बगदाद आणि इराक जिंकले. उझबेगांचे राज्य खारीज करून समरकंदला राजधानी स्थापली. अजून पूर्वेकडे आक्रमण करून आपले राज्य हिंदूकुश, काबुल, कंदाहारपर्यंत नेऊन पोहोचवले आणि त्यानी आता आपली नजर धनसंपन्न दिल्लीकडे वळविली. दिल्ली यावेळी जगातले सगळ्यात वैभवसंपन्न शहर होते. 'काफरांना बाटवून परलोक साधावा आणि त्यांची संपत्ती लुटून इहलोक साधून अल्लाहची सेवा करावी' या विचारांचा आडोसा घेऊन लूटमार करायला तैमूरलंग भारताकडे वळला. सिंधू नदी ओलांडून त्याने लक्षावधी भारतीयांना गुलाम म्हणून कैद केले व तो दिल्लीजवळ पोहोचला. त्याच्या प्रचंड आक्रमणापुढे तुघलकांचा निभाव लागला नाही. त्याचे आक्रमण इतके भीषण होते की राजपूत देखील तुघलकांसोबत आले आणि तैमूरचा सामना करू लागले. भटनेरला राजपूत व तुघलकांच्या फौजेसोबत तैमूरचे युद्ध झाले. ते युद्ध सहज जिंकून त्याने भटनेरच्या अगदी शेवटच्या जिवंत व्यक्तीची कत्तल करविली. भटनेर जळून बेचिराख होईपर्यंत त्याने लूट सुरु ठेवली. शहर नाहीसे करून तैमूर दिल्लीकडे वळला. तैमूरपुढे दिल्लीचाही निभाव लागला नाही. दिल्ली जिंकून त्याने तिथे एक लक्ष लोकांची कत्तल केली. किल्ल्याच्या भिंतीपेक्षाही उंच असे प्रेतांचे ढीग जमा होऊ लागले. यमुनेचे पाणी देखील कित्येक दिवस लाल वाहिले. असा प्रचंड विध्वंस करून दिल्ली जिंकल्याची ग्वाही तैमूरने दिली. अनेक विध्वंस पाहिलेल्या भारताने पाहिलेली ही स्वारी मात्र सगळ्यांत भीषण होती. इतकी भीषण की जगातील सगळ्यांत वैभवसंपन्न दिल्लीला देखील यातून सावरायला एक शतक जावे लागले.
 
४. अकबर - अकबराने राजपुताना ताब्यात घेण्यासाठी जेव्हा चितोडवर स्वारी केली, तेव्हा उदय सिंह (महाराणा प्रतापचे वडील) यांनी त्याला कडवी झुंज दिली. त्यामुळे अकबर चिडला आणि विजय मिळताच त्याने चितोडच्या लोकांच्या कत्तलीचे आदेश दिले. आपण किती लोकं मारले ह्याचा अंदाज घेण्यासाठी त्याने कत्तल केलेल्या समस्त ब्राम्हण आणि क्षत्रियांची जानवी तोडून आणण्यास सांगितली व त्यांचे वजन केले. नुसत्या जानव्यांचे वजन ७४।। (साडे चौऱ्याहत्तर) मण इतके आले. एक मण म्हणजे सुमारे सदतीस किलो.
 
अस्मानी सुलतानी 
सुलतानांच्या सततच्या मोहिमा, स्वाऱ्या, पिकांची व शेतजमिनींची नासाडी यांमुळे दख्खनेत वारंवार दुष्काळ पडत. अन्नाला मुकलेली जनता पाण्याच्या थेंबासाठी पण कासावीस होई. मुहम्मदाच्या वेळी असे दुष्काळ अनेकवेळा पडले आणि त्याच्या मृत्यूनंतर सुमारे पस्तीस वर्षांनी एक भीषण दुष्काळ महाराष्ट्रात आणि दख्खनेत पडला. 'दुर्गादेवीचा दुष्काळ'. हा दुष्काळ बारा वर्षे चालला.
shivaji maharaj
भारतीय संस्कृतीचे फारसीकरण
मुहम्मदाने दक्षिणेतला सुभा हसन गंगू जाफरखानकडे सोपविला पण मुहम्मदाचे निर्णय निस्तरताना त्याची पुरेवाट झाली होती. त्यामुळे त्याने काही सरदारांना विश्वासात घेऊन बंड करून सुभा संपूर्णपणे आपल्या अखत्यारीत घेतला आणि कलबर्ग्याला अजून एक सल्तनत स्थापन केली. कालबर्ग्याचे नाव 'अहसनाबाद' ठेऊन 'बहमनी' घराण्याच्या सल्तनतीची स्थापना झाली. हिंदुस्थानात एका ऐवजी दोन सल्तनती अस्तित्वात आल्या. या सल्तनतींचे व्यवहार मुख्यतः फारसीमध्ये चालत त्यामुळे भारतीयांच्या अस्मितेचे देखील 'फारसीकरण' होऊ लागले. एतद्देशीय कराच्या बोज्याखाली हतबल झाला असताना नोकरी मिळवण्यासाठी आता आपल्या भाषा सोडून फारसीकडे वळू लागला. शिवाय यवनांच्या स्वाऱ्यांमध्ये युद्धांबरोबर कत्तली, मंदिरांचे विध्वंस आणि धर्मग्रंथांची जाळपोळ देखील होई. त्यामुळे स्थानिक आपल्या संस्कृतीलाच मुकले. संस्कृत, अवधी, हिंदी अश्या भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर असतानाच महाराष्ट्रात देखील यवनांची धाड पडली आणि मराठीचे पण फारसीकरण झाले. मराठीत फारसी व उर्दू शब्द सर्रास घुसले. खाना, दरवाजा, महाल, दिवाणखाना, जनानखाना, कसम, बेलाशक, बेशक, वाहवा, शाब्बास, अफसोस असे अनेक शब्द ओळखू न येण्याइतके मराठीत घुसले. सर्जेराव, बाजीराव, मलंगोजीराव, साहेबराव, दर्याजीराव, शहाजी, शरीफजी, हैबतराव, जानराव, हिम्मतराव ही नावे ठेवल्या जाऊ लागली. पती आणि पत्नीचे देखील नवरा आणि बायको झाले!
 
'अर्जदारांच्या' 'फिर्यादी' 'काझी'पुढे जाऊन 'फैसला' सुनावल्या जाऊ लागला. 'इन्साफ' होऊ लागला. गडकरी 'किल्लेदार' झाले. नाईक, पाईक, पाटील 'हवालदार', 'शिलेदार' झाले, 'फौजेचा' 'अंमल' करू लागले. लोकांकडे 'मेजवानीच्या' वेळी 'आतषबाजी' होऊ लागली. आनंदाच्या प्रसंगी संबळ, पावा, टिमकी यांची जागा 'ताऊस', 'ढोल', 'ताशे', 'मर्फे' यांनी घेतली. 'विजार', 'कुर्ता', 'किमॉंश', मराठी पेहेरावात रूढ झाले. गुडगुडी, हुक्का, मद्य ही 'प्रतिष्ठित' व्यसने बनली. फारसी लेखन करणारे 'पारसनीस' उदयाला आले. स्त्रिया राजरोसपणे 'जनान्यात' पडू लागल्या. जागांची देखील नावे बदलण्यात येत होती. देवगिरी दौलताबाद झाली, कलबर्गा अहसनाबाद झाली, भागानगर हैदराबाद झाले. महाराष्ट्राचा आणि भारताचा तोंडवळा पाहता पाहता ओळखू न येण्याइतका बदलू लागला.
 
या गोष्टींचा आढावा घेतल्यावर आपल्याला लक्षात येते की कासीमच्या स्वारीपासून म्हणजे सुमारे आठव्या शतकापासून भारताच्या केवळ भूमीवर किंवा संपत्तीवर नव्हे तर येथील लोकांच्या मनावर, संस्कृतीवर, राहणीमानावर देखील प्रचंड मोठे आघात झालेत. त्याचमुळे जर शिवराय जन्माला आले नसते आणि छत्रपती झाले नसते तर हिंदू लोकं आणि हिंदू धर्म नामशेष झाला असता हे आपल्या लक्षात येते. म्हणूनच म्हटल्या जाते, 'हर मंदिर मस्जिद होता, प्रार्थना की जगह मन्नत होती अगर छत्रपती शिवराय ना होते, तो सबकी सुन्नत होती!'
रयतेचे राज्य, धर्माभिमान, धर्मसहिष्णुता, वास्तवाचे ज्ञान
भारताच्या ज्ञात इतिहासात सुमारे ५०० घराण्यांचे असंख्य राज्यकर्ते होऊन गेले. त्यांपैकीच एक शिवराय. पण प्रत्येक राज्यकर्ता यापूर्वी एक तर राजवंशामुळे गादीवर आला, किंवा पूर्वीचा राजा नालायक असल्यामुळे त्याला पदच्युत करून आला, किंवा राजकीय अंधाधुंदीचा फायदा घेऊन आला. या मंडळींना शाही सेना, अधिकारी वर्ग आयताच मिळाला. शिवरायांना आपले राज्य शून्यातून निर्माण करावे लागले. सुरुवातीपासूनच आदिलशाहीसारख्या बलाढ्य सल्तनतीच्या कुरघोडीला तोंड द्यावे लागले. मुघल सल्तनत तर वैभवाच्या परम शिखरावर होती. वीस वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी राज्य निर्माण केले. हेच राज्य वयाच्या ३५व्या वर्षी मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीत गमवावे लागले. तरी पण उमेद न हारता पुढील नऊ वर्षातच ते परत मिळवून राज्याभिषेक शिवरायांनी करविला. उभ्या इतिहासात हे करून दाखविणारा एक पण राजा नाही.  
धर्माभिमान असतांना धर्मसहिष्णूता सुद्धा त्यांच्याकडे पुरेपूर होती. अकबराने हिंदूंच्या बाबतीत औदार्याचे धोरण स्वीकारले याबाबतीत त्याचे अनेक लोकं कौतुक करतात. पण जिथे अकबराचे राज्य होते, तिथे बहुतांश प्रजा हिंदू होती. त्यांना संतुष्ट ठेवल्याशिवाय स्थिर राजवटीचा पाया उभारता येणार नाही, हे साधे व्यवहारज्ञान अकबराने दाखविले. शिवाय हेच हिंदू त्याच्या राज्याचे करदेयक पण होते. हिंदूंना आक्रमणाचा इतिहास नव्हता, आक्रमणाची भीती पण नव्हती, सक्तीचे धर्मांतर हिंदूंनी आजतायागत लादले नाही. त्यांना अकबराने औदार्याने वागविले. शिवरायांच्या प्रजेत बहुतांश मुस्लिम नव्हते, ते राज्याच्या कराचा आधार नव्हते, मुसलमानांच्या तलवारी राजांचे राज्य निर्माण करीत नव्हत्या, त्यांना आक्रमणाचा फार जुना आणि क्रूर इतिहास होता, पुन्हा आक्रमणाची भीती होती, मंदिरे फोडणे, संस्कृती नष्ट करणे ह्याचा इतिहास त्यांना होता, शेजारी आलमगीर पुन्हा हिंदूंवर जिझिया पट्टी लावत होता, हे केवळ स्वयंभू धर्मसहिष्णुतेमुळे!
 
समस्त भारतीय राजांप्रमाणे शिवराय पण कुशल युद्धतज्ञ होते. पण या तज्ञात त्यांनी नीतीचा देखील उपयोग केला. हिंदू राजांचे काही विशेष होते. त्यांचे विजय झाल्यावर पण सामर्थ्य कमी होत असे. पराभवात समूळ नाश. कारण शत्रूने सिद्धता करून आक्रमण करावे, हिंदू राजांनी त्यांना आपल्या प्रदेशात येऊ द्यावे, मग पराक्रम गाजवावा अथवा लढून मारावे हीच मालिका सुरु होती. शिवरायांनी हे बदलले. त्यासाठी बहिर्जी नाईकाखाली उत्तम हेरखाते त्यांनी तयार केले. लढण्याआधी सावधपणा, शत्रू बेसावध असताना त्याचा मुलुखात जाळपोळ, लुटालूट, हे तंत्र शिवरायांनी सुरु केले. विजयाने राज्य वाढावे, सामर्थ्य वाढावे, पराजय झाला तरी राज्य टिकावे, प्रदेश कमी झाला तरी सामर्थ्य व जिद्द टिकावे, हा इतिहास शिवरायांपासून सुरु होतो. तत्पूर्वी हिंदू राजांनी करार, तह करावे, शत्रूंनी दगे द्यावे, हा इतिहास पण शिवरायांनी बदलला. शिवरायांनी दगे द्यावे आणि शत्रूने थक्क व्हावे, ही मालिका सुरु झाले. अफझलवध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्यावरून पलायन हे त्यातलेच प्रकार. पण मित्रांना त्यांनी कधीच दगा दिला नाही. खाफीखानसारख्या अनेक लोकांनी या दगाबाजीमुळे म्हटले, शिवराय नरकात गेले. पण जर त्या दृष्टीने राज्य शिल्लक ठेवण्यापेक्षा वीरमरण पत्करणारे वीरपुरुष, सेना वाढविण्यापेक्षा यज्ञ करणारे पुण्यपुरुष जर स्वर्गात होते, तर स्वर्गात शिवरायांना करमलेच नसते.
 
शिवराय एक कठोर राज्यकर्ते होते, पण क्रूर नव्हते. रांझ्याच्या पाटलाला बलात्कारासाठी त्यांनी दोन्ही हात व दोन्ही पाय तोंडून जिवंत ठेवण्याची भीषण शिक्षा दिली. पण ती गुन्हेगारांमध्ये वचक बसवायला, रयतेमध्ये दहशत बसवायला नव्हे. शिवराय व्यवहारी होते, पण ध्येयशून्य नव्हते. आपली शक्ती कमी आहे, हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक मोहीम आपल्या शक्ती आणि कुवतीप्रमाणेच केली. छत्रपती झाल्यानंतरच त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम डामडौलात केली. त्यापूर्वी सगळ्या मोहिमा आपली शक्ती ओळखून आणि त्यांचा पुरेपूर वापर करूनच त्यांनी लढल्या आणि जिंकल्या. हे वास्तव माहिती असतांना त्यांनी स्वप्न बघणं मात्र सोडले नाही. बळ वाढवून, मुघलांना देशातून हुसकावून लावून अखंड भारत स्वतंत्र करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. तो निश्चय केला. आणि त्या निश्चयासाठी हा महामेरू आपले आयुष्य जगला. 
शिवराय धार्मिक होते, पण धर्मभोळे नव्हते. धर्माची त्यांना पुरेपूर जाण होती. त्याचमुळे भवानीची विटंबना करणाऱ्या अफझलखानाचे पारिपत्य करणे हे त्यांना परम कर्तव्य वाटले. बळजबरीने मुसलमान केलेल्या बांधवांना मात्र परत स्वधर्म आचारण्याची मुभा धर्मात नव्हती. इथे त्यांनी धर्मभोळेपणा न दाखविता शुद्धीकरणाचा विधीसुद्धा घडविला. बजाजी निंबाळकर, नेतोजी पालकर यांसमवेत अनेक धर्माला मुकलेले स्वकीय यामुळे स्वधर्मात परंतु शकले.
 
बरेच फिरस्ते आणि बखरकार पूर्वी म्हणत, शिवराय रसिक नव्हते. निश्चितच नव्हते. दुष्काळात लाखो लोक अन्नान्न करीत मरत असताना, वेठबिगार आणि कोरडे यांच्या जोरावर वीस कोटी रुपये खर्च करून ताजमहाल बांधण्याची रसिकता निश्चितच त्यांच्याकडे नव्हती. भारत इंग्रजांच्या आहारी जातो आहे, ही बाब गौण नसून महत्वाची आहे. हे फिरंगी भारतात येऊ नये म्हणून आरमार उभे न करता सुबक मनोरे, खूबसूरत इमारती बांधण्याची 'रसिकता' त्यांच्याकडे नव्हती. यापेक्षा जनतेच्या इहलौकिक कल्याणाची जबाबदारी राजा म्हणून माझी आहे, हे ते म्हणत. अशोकाची तीक्ष्यरक्षिता, अकबराचा मीनाबाजार यासारखे जनानखाने त्यांनी भरविले नाही. त्यांनी वासना कधीच मोकाट सोडली नाही. परस्रीचा उपभोग याला ते पाप समजत. राज्यकारभार करताना मद्यपान करून नृत्य शृंगाराचा आस्वाद घ्यावा असा 'रसिक' विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही. चित्र, शिल्प, मंदिरे, दर्गे, पीर, कला यांना उत्तेजन देण्यासाठी योजना मात्र त्यांनी राबविल्या. यांच्या उत्पन्नाची व्यवस्था देखील त्यांनी करून दिली. सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार, चिंचवडच्या मोरया गोसावींच्या मंदिराचे उत्पन्न लावून देणे, पाषाणजवळ सोमेश्वरवाडीला सुंदर मंदिर बांधून घेणे, सज्जनगडी समर्थांच्या वास्तव्याची तरतूद करून देणे हे त्यांनी आपले कर्तव्य समजले. यातून त्यांनी प्रजेच्या मनात संस्कृतीविषयी आणि धर्माविषयी निर्माण झालेला दुरावा नष्ट करण्यासाठी, भारत भूमीत धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले कार्य दिसून येते. शिवाय रयतेविषयी असलेली आस्था देखील दिसून येते. याच समस्त कारणांमुळे त्यांना रयतेचा राजा म्हटल्या जाते.
युद्धतज्ञाबरोबरच शिवराय मुलकी कारभाराचे देखील तज्ञ होते. कौल देऊन गावे बसविणे, शेतसारा निश्चित करणे, किल्ल्याची धान्यकोठारे भरून ठेवणे, शेतकऱ्यांना बी-बियाणे, नांगर, बैल यासाठी कर्जाची सोया उपलब्ध करून देणे, प्रतापगड, सिंधुदुर्ग यांसारखे किल्ले बांधणे, दळणवळणासाठी रस्ते बांधणे, युद्धातही जनतेवर कराचा बोजा न होऊ देता करनिश्चिती करणे, हे अष्टावधानी चौरस उद्योग शिवरायांनी यथार्थ चालविले.
 
शिवरायांच्या वास्तविकतेचे भान दाखवणारी देखील अनेक उदाहरणे आहेत. विनाकारण शूरता त्यांनी कधीच गाजविली नाही. युद्धांचे नियोजन करून योग्य व्यक्तीला त्यांनी मोहीम सोपविली. अफझलखानासारखा मातब्बर शत्रू किंवा शाहिस्तेखानावर छापा घालणे, यासारखे त्यांखेरीज कोणीही न करू शकणाऱ्या गोष्टीच त्यांनी अंगावर घेतल्या. अन्यथा विनाकारण जीव धोक्यात न घालण्याची विवेकबुद्धी त्यांच्याकडे होती. आपण लाखोंचे पोशिंदे आहोत, तेव्हा विनाकारण दगदग आणि अनाठायी साहसापासून दूर राहणे योग्य, हे त्यांना पुरेपूर माहिती होते. पण गरज असतांना त्यांनी प्रचंड शौर्य गाजविले. ते शौर्य गाजवून स्थिर यश देखील मिळविले. अफझलखान वध हे प्रचंड शौर्य. त्यानंतर पंधरा दिवसातच पन्हाळ्यापर्यंत मजल मारणे हे स्थिर यश. ज्याप्रमाणे शिवराय पराभवात खचले नाही, त्याचप्रमाणे विजयात वाहवत देखील गेले नाही.
 
यावरून लक्षात येते की केवळ भूमीच्या स्वातंत्र्यासाठी नाही तर शिवरायांनी रयतेच्या स्वातंत्र्यासाठी, गुलामगिरीला झुगारून देण्यासाठी, हरवलेल्या धर्मासोबत, संस्कृतीसोबत संधान बांधण्यासाठी, भरभराटीसाठी शिवरायांनी राज्य उभारले. म्हणूनच ते त्याला 'स्वराज्य - श्रींचे राज्य' असे म्हणत. यात त्यांनी कधीही 'माझे राज्य' ही अहंभावना ठेवली नाही. म्हणूनच पारख्या झालेल्या संस्कृतीसोबत शिवरायांना देशाची नाळ जोडता आली.
 
राज्याभिषेक
नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतेच की शिवरायांचा काळ हा धार्मिक प्रभाव आणि धार्मिक वर्चस्व गाजविण्याचा होता. अनेक आक्रमक त्यासाठी लढत होते, झुंजत होते. राजा म्हणजे दिल्लीचा बादशाह ही धारणा त्यावेळी लोकमानसात निर्माण झाली होती. पूर्वी अकबराने हिंदू रूढी आणि परंपरा उचलून धरून धूर्तपणे आपली पकड हिंदुस्थानावर मजबूत करविली होती. ते करताना मात्र स्वतःला ज्या फायद्याच्या असतील, त्याच परंपरा त्याने अवलंबल्या. एव्हाना अनेक विद्वान पंडितांना पण त्याने आश्रय दिला होता. त्यांच्यातलाच काही 'अल्लोपनिषद' लिहू लागले. 'भारतात आता कोणीही क्षत्रिय उरला नसून माझी इच्छा केवळ दिल्लीश्वर अथवा जगदीश्वराचे पूर्ण करू शकतात. दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा' असे उद्गार हिंदू विद्वान काढू लागले. यावरूनच 'मीच आता जगदीश्वर आहे आणि भारताचा एकमेव सम्राट आहे' अशी ग्वाही अकबर देऊ लागला. भारतात सम्राटाला विष्णूचा अंश मानल्या जातो हे सुद्धा अकबराने पुरेपूर हेरले आणि स्वतःला पूजेला पात्र ठरविले. सकाळी कपाळावर टिळा, गंध लावून त्याने सकाळी झरोक्यातून लोकांना दर्शन देणे सुरु केले. 'बादशाह नवसाला पावतो', अशी अफवा पसरवून तो लोकांना आपल्या पायाचे पाणी तीर्थ म्हणून वाटू लागला. लोकंही लाचार झाले होते. ते तुर्काचे उष्टे 'प्रसाद' म्हणून खाऊ लागले. आता खुद्द औरंगझेब जिझिया पट्टी लावून दख्खन गिळंकृत करून हिंदुस्थानाला संपूर्ण मुघल सल्तनत बनवून स्वतःचे आणि त्याच्या धर्माचे अधिराज्य इथे गाजवू पाहत होता.
 
अश्यावेळी शिवरायांनी ह्या दूषित झालेल्या गोष्टींना परत आणले हे किती मोठे कार्य झाले, हे आपोआपच लक्षात येते. राज्याभिषेक हा एक धार्मिक विधी पृथ्वीराज चौहान नंतर भारतातून लुप्तच झाला. विजयनगर साम्राज्याच्या पहिल्या राजाला, हरिहराला विद्यारण्यस्वामींच्या हाताने राज्याभिषेक घडला, पण तो गुपचूपपणे तुंगभद्रेच्या तीरी झाला. शिवरायांनी गागाभट्टांकडून केलेला हा राज्याभिषेक हा राजरोस होता. एक कोटी होन खर्च करून शिवरायांनी हा राज्याभिषेक करविला तो केवळ स्वतःला 'अभिषिक्त राजा' किंवा 'छत्रपती' म्हणून मिरवायला नव्हे, तर त्यात अनेक पदर होते. राज्यातून फारसी या विदेशी भाषेला हद्दपार केले गेले. मराठी आणि संस्कृतचे महत्त्व महाराजांनी वाढविले. भाषा सुधारण्यासाठी राज्य व्यवहारकोश, पंचांग सुधारण्यासाठी करणकौस्तुभ हे गागाभट्टांकडून सिद्ध करवून घेतले. शिवाय आपल्या नंतरही मुघलांना आणि समस्त यवनांना आव्हान देण्यासाठी एक कायमस्वरूपी सिंहासन उभे केले. म्हणूनच खुद्द औरंगझेब देखील राज्याभिषेकामुळे धास्तावला होता. महाराजांच्या राज्याभिषेकामुळे छत्रसाल बुंदेला आणि गुरु गोबिंद सिंग यांनी औरंगझेबाविरुद्ध तलवार काढली. त्यांनी महाराजांसोबत संधान बांधण्याचे प्रयत्न देखील केले. तेव्हा महाराज त्यांचे राज्य गिळंकृत देखील करू शकले असते, पण त्यांनी परकीय शत्रूसोबत लढण्याऱ्या हिंदूंची राज्ये कधीच गिळंकृत केली नाही कारण ते राज्यकर्ते केवळ उपभोगासाठी नव्हते तर 'श्रीमंत योगी' होते. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या नावाने नाही तर राज्याभिषेक विधीच्या नावाने 'राज्याभिषेक शक' सुरु केले. रायगडाच्या महालाबाहेर जगदीश्वराचे प्रासाद बांधले आणि अकबराने हिंदूंच्या मनावर घातलेली 'दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा' ह्या धारणेचा खंड करून 'आमचा जगदीश्वर आमच्या सोबत असून तोच आमच्या राज्याचा सूत्रधार आहे', ही धारणा लोकमानसात उतरवली. 
 
छत्रपती शिवरायांना पुन्हा एकवार त्रिवार मुजरा करून आपले शब्द संपवितो. 
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
 
टीप: या लेखात व्यक्त केलेली मते/विश्लेषण लेखकाचे वैयक्तिक अनुभव/विचार आहेत.