सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (09:41 IST)

गाझामधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळेवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात किमान 35 जणांचा मृत्यू

attack on gaza hospital
मध्य गाझामधील एका संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळेवर इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 35 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या शाळेत शेकडो पॅलेस्टिनी विस्थापित शरणार्थी राहत होते.
 
स्थानिक पत्रकारांनी बीबीसीला सांगितलं की नुसेरत शरणार्थी कॅम्पमधील शाळेच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील वर्गांवर इस्रायली लढाऊ विमानांनी दोन क्षेपणास्त्र डागली. व्हिडिओंमध्ये शाळेतील विध्वंस आणि मृतदेह दिसत आहे.
 
इस्रायली लष्करानं म्हटलं आहे की त्यांनी शाळेतील हमासच्या तळावर अचूक हल्ला केला आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांपैकी 20 ते 30 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
 
गाझामध्ये हमासद्वारा संचालित सरकारी मीडिया कार्यालयानं इस्रायलचा दावा फेटाळून लावला आहे आणि इस्रायलवर भीषण हत्याकांड घडवल्याचा आरोप केला आहे.
 
जवळच्या दिर अल-बलाह शहरातील अल-अक्सा शहीद हॉस्पिटलमध्ये मृत आणि जखमींना नेण्यात आलं आहे. या आठवड्यात इस्रायली सैन्यानं हमास विरोधात मध्य गाझामध्ये सुरू केलेल्या नव्या कारवाईनंतर या हॉस्पिटलवरील ताण वाढला आहे.
 
नुसेरतवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतरची परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे आणि जी माहिती समोर येते आहे तिची खातरजमा करून घेण्यावर बीबीसी काम करतं आहे.
 
स्थानिक पत्रकार आणि रहिवाशांनी सांगितलं की गुरुवारी पहाटे अल सार्दी शाळेत हा हल्ला झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका संघटनेद्वारे पॅलेस्टिनी शरणार्थींसाठी ही शाळा चालवली जाते आणि ती कित्येक दशकं जुन्या कॅम्पच्या आग्नेय भागातील ब्लॉक 2 परिसरातील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात आहे.
 
रहिवाशांच्या माहितीनुसार या शाळेत गाझाच्या विविध भागातून विस्थापित झालेल्या शेकडो लोकांनी आश्रय घेतलेला होता.
 
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शाळेतील असंख्य वर्गांचा झालेला विध्वंस आणि कफन आणि ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेले असंख्य मृतदेह दिसत आहेत.
 
"पुरे झालं युद्ध! आम्ही डझनावारी वेळा विस्थापित झालो आहोत. आमची मुलं झोपलेली असताना त्यांनी आमच्या मुलांना मारलं आहे," असा आक्रोश या हल्ल्यात जखमी झालेली एका महिला करत असल्याचं एका व्हिडिओत दिसतं आहे.
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शरणार्थी कॅम्प हे घरं, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा असलेले प्रदीर्घ विस्तार असलेले परिसर आहेत.
 
रहिवाशांनी सुरूवातीला सांगितलं की या हल्ल्यात 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
नंतर अल-अक्सा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीसाठी काम करणाऱ्या एका फ्रीलान्स पत्रकाराला सांगितलं की त्यांना शाळेतून 40 मृतदेह मिळाले आहेत.
 
संयक्तु राष्ट्रसंघाच्या शाळा चालवणाऱ्या संघटनेचे (UNRWA) प्रवक्ते जुलियट टॉमा यांनी रॉयटर्सला सांगितलं की मारले गेलेल्यांची संख्या 35 ते 45 आहे.
 
मात्र त्यांनी सांगितलं की या क्षणी त्या आकड्यांबद्दल निश्चितपणं सांगू शकत नाहीत.
 
रॉयटर्सनं देखील हमासद्वारा संचालित सरकारी मीडिया कार्यालय, इस्माईल अल-थावाब्टा आणि हमासद्वारा संचालित आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्यानं म्हटलं आहे की 40 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 14 मुलांचा आणि 9 महिलांचा समावेश आहे.
 
इस्रायली सैन्यानं (IDF)एका वक्तव्यात म्हटलं आहे की लढाऊ विमानांनी नुसेरतमधील संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे संचालित (UNRWA)शाळेमध्ये हमासच्या तळावर अचूक हल्ला केला आहे.
 
एक हवाई फोटोमध्ये शाळेच्या इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांवरील वर्गांना अधोरेखित करण्यात आलं आहे. इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की ही दहशतवाद्यांची ठिकाणं होतं.
 
इस्रायली सैन्यानं म्हटलं आहे की 7 ऑक्टोबर दक्षिण इस्रायलमध्ये हल्ला करणारे हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे सदस्य या इमारतीमधून कारवाया करत होते. इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यात जवळपास 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 251 जणांना ओलिस ठेवण्यात आलं होतं.
 
"हल्ला करण्यापूर्वी निरपराध नागरिकांना नुकसान पोचवणारी जोखीम कमी करण्यासाठी पावलं उचलण्यात आली होती. यात हवाई निगराणी करणं आणि हेरगिरीद्वारे मिळालेल्या अतिरिक्त माहितीचा समावेश होता." असं इस्रायली सैन्यानं सांगितलं.
 
नंतर इस्रायली सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल पीटर लर्नर यांनी पत्रकारांना सांगितलं की साधारण 20 ते 30 दहशतवादी या शाळेचा वापर हल्ल्याचं नियोजन करण्यासाठी आणि हल्ला घडवून आणण्यासाठी करत होते आणि त्यातील बहुतांश या हल्ल्यात मारले गेले आहेत.
 
ते पुढे असंदेखील म्हणाले की, त्यांना कोणत्याही मनुष्यहानीबद्दल कल्पना नाही आणि हमासद्वारे संचालिक यंत्रणेनं दिलेल्या आकडेवारी बद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
 
थावाब्टा यांनी इस्रायली सैन्यांचे दावे फेटाळले आहेत. ते म्हणाले, "विस्थापित झालेल्या शेकडो लोकांविरोधात केलेल्या क्रूर गुन्ह्यांना योग्य ठरवण्यासाठी इस्रायल लोकांसमोर खोट्या बनावट कथा सादर करत असतं."
 
7 ऑक्टोबर हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनं सुरू केलेल्या लष्करी कारवाईमध्ये गाझामध्ये आतापर्यत किमान 36,580 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती हमासद्वारा संचालित आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या आकडेवारीत किती नागरिक होते आणि किती हमासचे सदस्य होते याची वर्गवारी करण्यात आलेली नाही.
 
बुधवारी इस्रायली सैन्यानं सांगितलं की बुरीज शरणार्थी कॅम्प च्या पूर्वेकडील भागामध्ये त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. हा भाग नुसेरतच्या पश्चिमेला आणि दीर अल बलाहच्या पूर्वेला आहे.
 
रहिवाशांनी तीव्र बॉम्बहल्ले झाल्याची माहिती दिली आहे आणि मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्स (MSF)या स्वयंसेवी संस्थेने म्हटलं आहे की मागील 24 तासांमध्ये अल-अक्सा हॉस्पिटलमध्ये किमान 70 मृतदेह आणण्यात आले आहेत, ज्यात बहुसंख्य महिला आणि मुलांचा समावेश आहे.
 
Published By- Priya Dixit