Earthquake: रशियाच्या किनारपट्टी भागात 8.8 तीव्रतेचा भूकंप,त्सुनामीचा इशारा जारी
रशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील कामचटका द्वीपकल्पाजवळ एक शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.8 इतकी नोंदवण्यात आली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने सांगितले की, हा भूकंप सकाळी 8:25 वाजता समुद्राखालील उथळ भागात झाला. यामुळे रशिया, जपान, ग्वाम, हवाई आणि अलास्कामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे पॅसिफिक किनाऱ्यावरील समुद्रात 1 ते 3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, असे इशाऱ्यात म्हटले आहे. सध्या तरी कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
भूकंप जपानच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात उत्तरेकडील होक्काइडोपासून सुमारे 250 किमी अंतरावर होता. भूकंपाचे केंद्र रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्कीच्या 133 किमी आग्नेयेस 74 किमी खोलीवर होते.
अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने अलास्का अलेउशियन बेटांच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. यासोबतच, कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि हवाईसह पश्चिम किनाऱ्यावरील काही भागांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Edited By - Priya Dixit