गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 जुलै 2024 (10:56 IST)

इस्रायलच्या हल्ल्यात 90 लोकांचा मृत्यू, हमास आरोग्य मंत्रालयाचा दावा

- रश्दी अबालौफ, टॉम मॅकआर्थर आणि लुसी क्लार्क-बिलिंग्ज
हमासतर्फे गाझामध्ये चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की गाझामधल्या आणखीन एका मानवतावादी क्षेत्रावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 90 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 300 लोक जखमी झाले आहेत.
 
इस्रायलने हमासचे वरिष्ठ नेते मोहम्मद देफ आणि राफा सलामा यांना लक्ष्य करून इस्रायलने हा हल्ला केल्याचा दावा केला आहे.
 
शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं की, या दोघांपैकी कुणीही ठार झाल्याची निश्चित माहिती त्यांच्याकडे नाही.
 
हा हल्ला खान युनिस जवळील अल-मवासी भागात झाला, ज्याला इस्रायली सैन्याने मानवतावादी क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे.
 
अल-मवासी येथील एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं की, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथे भूकंप झाल्यासारखं दिसत होतं.
 
हल्ल्यानंतर या घटनेचे काही व्हिडिओ प्रसारित झाले. त्यात असं दिसतंय की हल्ला झालेल्या ठिकाणी रक्ताने माखलेले मृतदेह पडले आणि धुराचे मोठमोठे लोट दिसत आहेत.
 
हवाई हल्ल्यानंतर लोक ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.
 
बीबीसी व्हेरिफाईने या हल्ल्याच्या व्हिडिओ फुटेजची तपासणी केली असून हा हल्ला इस्रायलच्या संरक्षण दलाने ज्या भागाला मानवतावादी क्षेत्र म्हणून जाहीर केलं आहे त्याच भागात झाल्याचं दिसतंय.
 
बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, त्यांनी त्यांच्या सामान्य सुरक्षा दलांनी माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्याचे आदेश दिले.
 
नेतन्याहू म्हणाले की, हा हल्ला करण्यापूर्वी त्यांना या परिसराच्या आसपास एकही ओलीस ठेवण्यात आलेला इस्रायली नागरिक नाही याची खात्री करायची होती आणि यासोबतच दोन्ही बाजूंचे किती नुकसान होईल? कोणकोणती शस्त्रास्त्रे यासाठी वापरली जातील याची माहितीही त्यांनी घेतलेली होती.
 
या पत्रकार परिषदेत बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या सगळ्या वरिष्ठ सदस्यांना संपवण्याचं आश्वासननही दिलं.
 
नेतन्याहू म्हणाले की, "कोणत्याही मार्गाने आम्ही हमासचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक नेत्यापर्यंत पोहोचू."
 
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांनी आरोप केला की, गाझात सुरु असलेल्या युद्धाच्या शस्त्रसंधीला रोखणारा हा हल्ला बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे. या युद्धात मोठा नरसंहार होत असल्याचंही ते म्हणाले.
 
हमासने म्हटले आहे की त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचा दावा खोटा आहे.
 
हमासने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, "पॅलेस्टिनी नेत्यांना लक्ष्य करण्याचा इस्रायलचा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही, हा दावा नंतर खोटा सिद्ध होईल."
 
इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं की हा हल्ला एका मोकळ्या जागेवर करण्यात आला जिथे एकही सामान्य नागरिक उपस्थित नव्हता.
 
मात्र 'सेफ झोन' म्हणून ठरवण्यात आलेल्या परिसरावर हा हल्ला करण्यात आला होता का? या प्रश्नावर मात्र ते शांत राहिले. पण हमासने नागरी वस्त्यांमध्ये अत्यंत क्रूरपणे त्यांचा तळ बनवला असल्याची टीकाही त्यांनी केली.
 
अधिकाऱ्याने असेही सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान कुणालाही ओलीस ठेवलं असल्याची माहिती त्यांना नव्हती. हा हल्ला करण्यापूर्वी अत्यंत अचूक माहिती घेऊन, नेमक्या ठिकाणी हल्ला करण्यात आला.
 
या हल्ल्यानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी धावपळ करणाऱ्या एका डॉक्टरने बीबीसीला सांगितलं की, "हा दिवस काळ्या दिवसांपैकी एक आहे."
 
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवर 'न्यूजआवर' या कार्यक्रमात बोलताना डॉ मोहम्मद अबू रैया म्हणाले की, "उपचारांसाठी घेऊन आलेले बहुतेक लोक आधीच मरण पावले होते आणि इतरांना बऱ्याच जखमा झाल्या आहेत."
 
डॉक्टर मोहम्मद अबू रैया म्हणाले की, "इथे काम करणं हे एखाद्या नरकात काम करण्यासारखं आहे. या हल्ल्यामुळे मृत पावलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलं आहेत. सामान्य नागरिकांची संख्या जास्त आहे."
 
आणखीन एक व्हिडिओ फुटेजमध्ये तिथून जवळच असणाऱ्या कुवेत फील्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जमिनीवर ठेऊन उपचार दिले जात असल्याचं दिसत होतं, त्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता.
 
'ब्रिटिश चॅरिटी मेडिकल एड फॉर पॅलेस्टिनियन्स' या संस्थेनी सांगितलं की खान युनिसमधील नासेर मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण भरले आहेत त्यामुळे आता हे हॉस्पिटल अधिक रुग्णांवर उपचार करू शकत नाही.
 
कोण आहे मोहम्मद देफ?
हमासची लष्करी शाखा असलेल्या अल-कसाम ब्रिगेडचा प्रमुख मोहम्मद देफ हा इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहे.
 
अनेकवेळा मोहम्मद डेफच्या हत्येचे प्रयत्न केले गेले. इस्रायलने पकडल्यानंतर तो त्यांच्या कैदेतून निसटला आणि आता गाझामध्ये एखाद्या दंतकथेचा दर्जा त्याला मिळाला आहे.
 
1989 मध्ये इस्रायली अधिकाऱ्यांनी त्याला तुरुंगात टाकले, त्यानंतर त्याने इस्रायली सैनिकांना पकडण्याच्या उद्देशाने ब्रिगेडची स्थापना केली. इस्रायलने त्याच्यावर 1996 मध्ये दहा इस्रायली ठार झालेल्या बस बॉम्बस्फोटांचे नियोजन आणि पर्यवेक्षण केल्याचा आणि 1990 च्या दशकाच्या मध्यात तीन इस्रायली सैनिकांना पकडण्यात आणि ठार मारल्याचा आरोप केला आहे.
 
7 ऑक्टोबरच्या हमासने केलेल्या हल्ल्याचा तो एक सूत्रधार असल्याचं मानलं जातं. या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली आणि परदेशी नागरिक मारले गेले होते आणि इतर 251 जणांना ओलिस म्हणून गाझाला नेण्यात आलं होतं.
 
यामुळे इस्रायलने गाझामध्ये मोठ्या लष्करी कारवाईची सुरुवात केली आणि आजपर्यंत त्या कारवाईत 38 हजार 400 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत असा दावा हमासच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
 
हमासच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला हे एक गंभीर पाऊल आहे आणि या हल्ल्यातून असं दिसतंय की इस्रायलला युद्धबंदीचा करार करायचा नाही.
 
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार कतार आणि इजिप्तमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाच्या वाटाघाटींमध्ये शुक्रवारी कोणतंही यश मिळू शकलं नाही.
 
गाझाच्या हमास-संचालित नागरी संरक्षण संस्थेने सांगितलं की, गाझा पश्चिमेकडे आणखीन एका वेगळ्या घटनेत इस्रायलच्या हल्ल्यात 17 लोक मारले गेले.
 
गाझा शहराच्या पश्चिमेला शाती शरणार्थी शिबिरातील प्रार्थनागृहाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायली लष्कराने अद्याप या दाव्यावर भाष्य केलेले नाही.