1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (08:51 IST)

लॅटिन अमेरिकेतील असा देश, जिथली प्रत्येक 10 पैकी 4 माणसं भारतीय वंशाची आहेत

गायाना हा दक्षिण अमेरिकेतला एकमेव इंग्रजी भाषिक देश आहे, त्यांच्यावर बराच काळ ब्रिटिशांनी राज्य केलं. पण या देशाच्या लोकसंख्येत भारतीय वंशाच्या लोकांचं प्रमाण बरंच मोठं आहे.
हा देश खरंतर 1 लाख 60 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला म्हणजे अंदाजे आकारानं भारतातल्या आंध्र प्रदेशाएवढा किंवा महाराष्ट्राच्या निम्म्याहून थोडा जास्त आहे.
 
मग एवढ्या लहानशा आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या या देशात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या एवढी का जास्त आहे?
 
गुलामगिरीच्या निर्मूलनानंतर तत्कालीन ब्रिटिश वसाहतींच्या तुलनेत गायानामध्ये स्थलांतरीत झालेल्या भारतीयांची संख्या सर्वात जास्त होती.
 
परिणामी आज गायानातील दहापैकी चार नागरिकांच्या वंशाची मुळं भारतीय उपखंडात, प्रामुख्यानं भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात सापडतात.
 
तुम्ही क्रिकेट चाहते असाल, तर वेस्ट इंडीज संघाकडून खेळलेले महान क्रिकेटर रोहन कन्हाय यांचं नावही तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल.
 
हे रोहन कन्हाय गायाना देशाचे नागरीक होते आणि मूळचे भारतीय वंशाचे होते. (वेस्ट इंडीजमध्ये गायानासह कॅरिबियन प्रदेशातल्या इतर इंग्रजी भाषिक देशांचा समावेश आहे.)
 
कन्हाय यांच्या प्रमाणेच शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान अशा नावाजलेल्या गायानीज क्रिकेटर्सचे पूर्वजही भारतीय वंशाचे होते.
 
इथे भारतीय उपखंडातून आलेल्या लोकांचा प्रभाव एवढा मोठा आहे, की गायानाचे सध्याचे (2023) राष्ट्रपती इरफान अली हेही त्यांच्यापैकीच एक आहेत. 2020 साली सत्तेत आलेले इरफान अली हे गायानाचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती आहेत.
 
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार गायानातील उर्वरित नागरिकांमध्ये 30% जण आफ्रिकन वंशाचे, 17 % जण मिश्र वंशाचे आणि 9% जण अमेरिंडियन वंशाचे आहेत.
 
खरं तर गायानाच्या शेजारी ब्राझिलमध्ये पोर्तुगीज बोलली जाते, तर व्हेनेझुएलामध्ये स्पॅनिश ही मुख्य भाषा आहे.
 
साहजिकच गायाना आणि तिथले भारतीय वंशाचे लोक हा या प्रदेशातला एक वेगळेपणा आणि उत्सुकतेचा विषय ठरतो.
 
गुलामगिरीचं निर्मुलन आणि भारतीयांचं आगमन
1814 मध्ये नेपोलियनिक युद्धांदरम्यान युनायटेड किंगडमनं गायानावर ताबा मिळवला. नंतर त्याचं ब्रिटिश गायाना वसाहतीत रुपांतर केलं. त्याआधी गायानामध्ये पूर्वी फ्रान्स आणि डच यांचं वर्चस्व होतं.
 
वीस वर्षांनंतर 1834 मध्ये जगभरातील इतर ब्रिटिश राजवटींप्रमाणे गायानामध्येही गुलामगिरी प्रथेचं निर्मुलन करण्यात आलं, ज्यामुळे आफ्रिकन वंशाच्या लोकांची गुलामीतून मुक्तता झाली.
 
गायानामध्ये गुलामगिरी निर्मुलनानंतर लगेच भारतीय निर्वासितांचं आगमन व्हायला सुरुवात झाली होती. मजुरांची मागणी वाढल्यामुळं भारतातून मजूर आणावे लागले.
 
या स्थलांतरीत भारतीयांचं प्रमाण गायानामध्ये खूपच जास्त होतं, पण जमैका, त्रिनिदाद, केनिया आणि युगांडासारख्या इतर तत्कालीन ब्रिटीश वसाहतींमध्येही भारतीय लोक स्थलांतरीत झाले.
 
तेव्हा भारताची फाळणी झालेली नव्हती त्यामुळे भारतीय असा उल्लेख असला तरी यातले काहीजण आजच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातून आले होते.
 
सुरुवातीचे प्रामुख्यानं 396 भारतीय स्थलांतरीत मजूर हे ‘ग्लॅडस्टन कुलीज’ या नावानं प्रसिद्ध झाले. या मजूरांना ब्रिटिश गायानामध्ये आणणाऱ्या जॉन ग्लॅडस्टन यांच्यावरून त्यांना हे नाव मिळालं. जॉन ग्लॅडस्टन ब्रिटिश गायानातले एक साखर उत्पादक तसंच वेस्ट इंडिज असोसिएशनचे प्रतिनिधी होते.
 
तर ‘कुली’ या शब्दाचा वापर 19 व्या शतकात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आशियातील आणि प्रामुख्यानं चीन आणि भारतातील मजुरांसाठी केला जात असे.
 
सध्या इंग्रजी भाषिक देशांमध्ये हा शब्द आशिया खंडातील लोकांसाठी अपमानास्पद आणि वर्णभेदी उल्लेखासारखा – शिवी किंवा अपशब्द म्हणून वापरला जातो.
 
तर हे निर्वासित सुरुवातीला एम.व्ही. व्हिटबी आणि एम.व्ही. हेस्परस या दोन जहाजांमधून आले होते.
 
ते सगळेजण हिंद महासागर आणि अटलांटिक महासागर पार करून गायानाला पोहोचले होते. भाडोत्री मजूर म्हणून त्यांनी एक करार केला होता ज्यानुसार त्यांनी अगदी कमी मोबदल्यामध्ये अनेक वर्षे शेतात काम करण्याचं मान्य केलं होतं.
 
गायानाच्या शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार ही पद्धत 75 वर्षे चालली आणि त्यातल्या काही गोष्टी 'गुलामगिरी'ची आठवण करून देणाऱ्या म्हणजे जाचक होत्या.
 
जवळपास एका दशकाच्या काळात या भारतीय स्थलांतरीतांमुळेच गायानातला साखर उद्योग भरभराटीला आला आणि इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त झाली.
 
हा करार संपल्यानंतर काहीजण भारतात परतले. तर काही त्यावेळच्या ब्रिटिश गायानामध्येच स्थायिक झाले.
 
नोंदींवरून लक्षात येतं की, 1838 आणि 1917 च्या दरम्यान 2 लाख 38 हजार 909 भारतीय जवळपास 500 जहाजांवरून मजूर म्हणून ब्रिटिश गायानाला गेले होते.
 
तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखालील वसाहतींचा विचार करता, भारतातून स्थलांतरीत मजुरांची संख्या गायानामध्ये सर्वाधिक होती.
 
1966 मध्ये गायाना हा देश युनायटेड किंगडममधून स्वतंत्र झाला.
 
पण आजही गायानामध्ये पहिल्या भारतीयांच्या आगमनाचा दिवस म्हणजे 5 मे हा दिवस साजरा केला जातो आणि त्या दिवशी राष्ट्रीय सुटीही जाहीर केली जाते.
 
Published By- Priya Dixit