Afghanistan:बस आणि ऑईल टँकरमध्ये भीषण टक्कर; 21 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानातील हेलमंडमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हेरात-कंधार महामार्गावर रविवारी सकाळी बस आणि ऑइल टँकरमध्ये भीषण टक्कर झाली, यात 21 जणांचा मृत्यू झाला, तर 38 हून अधिक लोक जखमी झाले. अपघातातील जखमींपैकी 11 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेलमंड प्रांताच्या माहिती आणि संस्कृती संचालनालयाने सांगितले की, रविवारी सकाळी हेलमंड प्रांतातील ग्रीष्क जिल्ह्यातील याखचलमध्ये ही घटना घडली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मोटारसायकलला धडकली आणि नंतर तेलाच्या टँकरवर आदळल्याने हा अपघात झाला, त्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली.
या भीषण अपघातात बसमधील 16 प्रवासी, मोटारसायकलवरील 2 आणि टँकरमधील 3 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती देताना एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना तत्काळ ग्रिष्क जिल्हा आणि हेलमंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Edited By- Priya Dixit