रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 मार्च 2024 (13:05 IST)

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा असा होतोय चुराडा

कॅनडाला येण्याचं माझं स्वप्न सहावेळा भंगलं, सातव्या प्रयत्नात कॅनडात पोहोचलो. मात्र मध्येच अडकलो," असं सहजप्रीत सिंग सांगत होता.सहजप्रीत सिंग कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून आला होता. पण एजंट आणि महाविद्यालयाच्या कथित फसवणुकीचा तो बळी ठरलाय.
 
खरंतर सहजप्रीत सिंगचा स्टुडंट व्हिसा दूतावासाने सहा वेळा नाकारला होता. सहजप्रीतच्या म्हणण्यानुसार, चंदीगडच्या एजंटने त्याला एका खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मात्र त्याला भविष्यात वर्क परमिट मिळणार नव्हतं. कॅनडामध्ये आल्यानंतर त्याला याची माहिती मिळाली.
सहजप्रीतच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयातून त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाहीये.सहजप्रीत सिंग सांगतो की, एजंटने त्याचे फोन उचलणं बंद केलंय तर महाविद्यालयातून त्याला कोणतंही ठोस उत्तर मिळत नाहीये.
सहजप्रीतने कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, कुठला कोर्स करायचा हे सगळं चंदीगडस्थित एजंटने स्वतःच्या मनाने ठरवलं होतं. शिवाय, व्हिसाची काळजी करू नका असंही सांगितलं होतं.
 
सहजप्रीतचा व्हिसा आल्यावर संबंधित एजंटने त्याच्या प्रसिद्धीसाठी एक व्हिडिओ बनवला. यात त्याने (एजंट) सहावेळा व्हिसा नाकारल्यानंतर कॅनडाच्या दूतावासातून व्हिसा कसा मिळवून दिला हे सांगितलं. हा व्हिडिओ संबंधित एजंटच्या सोशल मीडियावर अजूनही उपलब्ध आहे.सहजप्रीत सिंगचा दावा आहे की, एजंटने त्याच्याकडून 12 लाख रुपये घेतले. यात 14,000 डॉलर महाविद्यालयाची फी तसेच जी आयसी आणि इतर खर्चाचा समावेश होता. सहजप्रीत सिंगच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयाची फी 8000 डॉलर होती. मात्र, एजंटने फसवणूक करत जास्तीचे पैसे उकळले आणि उर्वरित पैसे स्वतःकडे ठेवले. या प्रकरणी बीबीसीने सहजप्रीत सिंगच्या चंदीगड येथील एजंटशी फोनवर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते याविषयावर आमच्याशी बोलले नाहीत.
 
शिक्षण तर कॅनडामध्ये येण्याचा एक मार्ग आहे
23 वर्षीय सहजप्रीत सिंग पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील रहिवासी आहे. 19 लाख रुपये खर्च करून तो एजंटच्या मदतीने नोव्हेंबर 2023 मध्ये कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता. त्याने इथे हॉस्पिटल आणि मॅनेजमेंटच्या दोन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. एकुलता एक मुलगा असलेला सहजप्रीत सिंग सांगतो की, गेल्या तीन महिन्यांत तो एकदाही महाविद्यालयात गेलेला नाही. त्याचं महाविद्यालय सरेमध्ये आहे आणि तो ब्रॅम्प्टनमध्ये राहतो. एकदा तो त्याच्या मित्रांसोबत महाविद्यालय पाहायला गेला होता, पण तिथे पोहोचल्यावर त्याने जे पाहिलं, त्यामुळे त्याला धक्काच बसला. सहजप्रीत सिंगच्या म्हणण्यानुसार, तिथे एक सार्वजनिक पार्किंग होतं आणि महाविद्यालयाच्या इमारतीत दोन रिकाम्या खोल्या होत्या. आत रिसेप्शनवर दोन महिला होत्या. तिथे एकही वर्ग किंवा कर्मचारी नव्हता. महाविद्यालयात अभ्यासाचे तास कसे घेतले जातात? यावर सहजप्रीत सिंग सांगतो की, सर्व काही ऑनलाइन आहे त्यामुळे महाविद्यालयात जाण्याची गरज नाही. किंबहुना उपस्थिती आणि परीक्षा देखील ऑनलाइन होते. सहजप्रीत सिंगने माझ्यासमोर लॅपटॉप सुरू केला आणि त्याची 97 टक्के उपस्थिती दाखवली. त्याने महाविद्यालयाचं पोर्टलही मला दाखवलं. तो म्हणतो की तो असाइनमेंट्स स्वत: तयार करत नाही तर 500 रुपये देऊन भारतातून तयार करून घेतो आणि नंतर त्याच पोर्टलवर अपलोड करतो. दर महिन्याला त्याची परीक्षा होतात, ज्यात त्याने 80 टक्के गुण मिळवले होते.
 
सहजप्रीत सिंग उत्साहाने सांगतो की, त्याच्या वर्गात 40 मुलं असून ती सर्व पंजाब आणि हरियाणा या राज्यातील आहेत. त्याने सांगितलं की, या 3 महिन्यांत त्याला वर्गात इंग्रजी बोलण्याची गरजच पडली नाही, उलट सर्व संभाषण हिंदी आणि पंजाबीमध्येच सुरू होतं. सहजप्रीत सिंग सांगतो की, आयईएलटीएस परीक्षेत त्याला 10 पैकी 6 गुण मिळाले होते. माझ्यासमोरच सहजप्रीत सिंगने फोनवरून क्लास सुरू केला. ऑनलाईन क्लासचा मायक्रोफोन बंद करून आपलं काम सुरू केलं. सहजप्रीत सिंग सध्या एका कार वर्कशॉपमध्ये काम करतो आणि इथूनच तो ऑनलाइन शिक्षण घेतोय. बीबीसीच्या टीमने सहजप्रीत सिंगसोबत सुमारे दोन तास घालवले आणि या वेळी ऑनलाइन क्लास सुरूच होता. शिक्षक ऑनलाईन क्लास मध्ये शिकवतच होते, शेवटी वेळ पूर्ण झाल्यावर ते थँक यु म्हणून निघून गेले. दरम्यान, सहजप्रीत सिंगला शिक्षकाने काय शिकवलं याबद्दल काहीही माहिती नाही किंवा त्याने काहीच ऐकलं नाही. त्यांची हजेरी केवळ ऑनलाइन कॉलच्या आधारे घेतली जाते. सहजप्रीत सिंग सांगतो की, इथे अभ्यास फक्त नावालाच आहे, शिक्षकांना भेटणं सोडा, मला अजून एकही प्रॅक्टिकल मिळालेलं नाही. सहजप्रीत सिंगचे वर्ग आठवड्यातून तीन दिवस भरतात.
 
सहजप्रीतसोबत झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण?
एजंट आणि महाविद्यालय या दोघांनी आपली फसवणूक केल्याचं सहजप्रीत सिंगचं म्हणणं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं असूनही त्याला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही. यावर तो सांगतो की, त्याला कसंही करून कॅनडामध्ये यायचं होतं. त्याचं ते उद्दिष्ट पूर्ण झालंय. त्यामुळे कोणतीही कारवाई करून काहीही मिळणार नाही.
 
कॅनडामध्ये त्याचं भविष्य काय असणार याबद्दल तो सध्या अनिश्चित आहे. सहजप्रीत सिंग सांगतो की, तो दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला कॅनडामध्ये वर्क परमिट मिळू शकेल. पैसे आणि एक वर्ष वाया गेलेल्याबद्दल सहजप्रीत सिंग म्हणतो की, कॅनडाला जायचं खूळ त्याच्या डोक्यात इतकं बसलं होतं की त्याला कोणत्याही मार्गाने इथवर यायचं होतं. "मित्रांनी आणि इतर ओळखीच्या लोकांनी मला कॅनडात येऊ नये म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचं ऐकलं नाही. इथे येऊन बघतो तर गोष्टी फारच वेगळ्या होत्या."
 
नेपाळच्या सुमन रॉयचा संघर्ष
नेपाळचा रहिवासी असलेला सुमन रॉय सप्टेंबर 2023 मध्ये स्टुडंट व्हिसावर पत्नीसोबत कॅनडाला आला होता. गेल्या काही वर्षांत कॅनडात नेपाळी विद्यार्थ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. सुमन रॉय आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे नेपाळी वंशाचे इतरही विद्यार्थी होते.तळघरात जमिनीवर पाच गाद्या पसरल्या होत्या. घर आणि स्वयंपाकघरात विखुरलेलं सामान पाहून त्यांच्या राहणीमानाचा अंदाज येत होता.
 
कॅनडातील शिक्षणाविषयी बोलताना सुमन रॉय सांगतो की, त्याच्या वर्गातील 95 टक्के विद्यार्थी भारतीय आहेत आणि येथील खाजगी महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षण नाहीये.
कॅनडातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सुमन रॉय सांगतो की, "मी खूप घाई गडबडीत इथे येण्याचा निर्णय घेतला. भविष्याचा विचार करताना सुमन रॉय सांगतो की, सध्या या देशाची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला भविष्यात काय करायचं हे समजत नाहीये.त्याने सांगितलं की, नोकरी, घरं आणि वाढती महागाई या कॅनडामधील सर्वात मोठ्या समस्या आहेत.
 
नेपाळच्या काठमांडू शहरात राहणारा सुमन रॉय सांगतो की, आमच्याकडेही मोठ्या प्रमाणावर एजंट आहेत, त्यामुळे अलीकडील काळात नेपाळी विद्यार्थी मोठ्या संख्येने कॅनडामध्ये आलेत. तो म्हणतो की, कॅनडाला येण्यापूर्वी इथल्या परिस्थितीची माहिती घेणं गरजेचं आहे. एजंटच्या म्हणण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, कारण त्यांना केवळ पैशांशी देणंघेणं असतं.
 
पूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे का?
ब्रॅम्प्टनमध्ये स्वतःचा व्यवसाय करणारे दीप हाजरा 12 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून कॅनडामध्ये आले होते.
दीप यांच्या मते, पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक आहे. पूर्वी बहुतेक विद्यार्थी पदवीनंतर कॅनडामध्ये येत आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेत. स्वतःचं उदाहरण देताना दीप हाजरा म्हणाले की, त्यांच्या महाविद्यालयाचा परिसर खूप मोठा होता. शिक्षक नियमित येत असत, परंतु आता केवळ ऑनलाइन क्लासेसद्वारेच शिकवणं सुरू आहे. दीप यांच्या मते, गेल्या काही वर्षांत कॅनडाने पोस्ट-डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केल्यापासून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे. ते म्हणाले की, इथे विद्यार्थ्यांचं खूप शोषण होतं. सर्वप्रथम भारतातील एजंट त्रास देतात. इथे आल्यानंतर काही खाजगी महाविद्यालयात आणि नंतर कामाच्या ठिकाणी त्रास दिला जातो.
त्यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी बरेच भारतीय विद्यार्थी स्टुडंट व्हिसावर कॅनडामध्ये आले होते. पंजाबमधील एजंटने कॅनडातील महाविद्यालयांच्या बनावट ऑफर लेटरच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली होती.
 
फसव्या कागदपत्रांवर प्रवेश केल्यामुळे कॅनेडियन बॉर्डर एजन्सीने शेकडो विद्यार्थ्यांना हद्दपार करण्याची तयारी केली. यावर विद्यार्थ्यांनी अनेक दिवस टोरंटो विमानतळाजवळ निषेध केला होता. त्यानंतर कॅनडाच्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपावरून कथित ट्रॅव्हल एजंट ब्रिजेश मिश्राला अटक केली. त्यानंतर हे विद्यार्थी व्हिसावर कॅनडाला पोहोचले. त्यावेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत या मुद्द्यावर म्हटलं होतं की, फसवणूक झालेल्यांना शिक्षा करणं हा आमचा उद्देश नव्हता. तर गुन्हेगाराची ओळख पटवणं हा आमचा मूळ हेतू होता.
 
विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचं शोषण होतं का?
या वर्षी जानेवारीमध्ये कॅनडातील अल्गोमा विद्यापीठाच्या ब्रॅम्प्टन कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. सुमारे 130 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (पंजाबी आणि गुजराती) एका विषयात अनुत्तीर्ण झाले होते. यानंतर कडाक्याच्या थंडीत कित्येक दिवस आणि कित्येक रात्री विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. एका शिक्षकाने जाणूनबुजून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नापास केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या आंदोलकांमध्ये सिमरनजीत कौर या विद्यार्थिनीचाही समावेश होता. बीबीसीशी बोलताना सिमरनजीत कौरने सांगितलं की, ती मे 2022 मध्ये कॅनडामध्ये आली होती. तिने 2 वर्षाच्या मानव संसाधन आणि व्यवसाय व्यवस्थापनाच्या अभयासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
 
एका भारतीय एजंटने तिला अल्गोमा विद्यापीठात प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.
सिमरनजीत कौर सांगते की, तिच्या विद्यापीठातील बहुतेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भारतीय वंशाचे आहेत. विद्यापीठांमध्ये स्थानिक कॅनेडियन विद्यार्थी खूप कमी आहेत. मूळची हरिद्वार, उत्तराखंडची रहिवासी असलेली सिमरनजीत कौर सांगते की, तिला विद्यापीठात शिष्यवृत्तीही मिळाली होती. पण या वर्षी जानेवारी महिन्यात एका विषयात नापास झाल्याने ती खूप अस्वस्थ आहे. तिने संबंधित विषयाच्या प्राध्यापकाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणालाही भेटण्यास नकार दिला. त्यानंतर विद्यापीठाच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडल्याचं तिने सांगितलं.आंदोलनानंतर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत काहींना उत्तीर्ण केलं तर काहींना दुसरी संधी दिली.सिमरनजीत कौरच्या मते, विद्यापीठे आणि महाविद्यालये पैसे कमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा वापर करतात. महाविद्यालयाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना संघटित व्हावं लागत आहे.
 
कॅनडामधील भारतीय विद्यार्थी संघटना
कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विशेषतः भारतीयांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी यापूर्वी अनेक विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक 'युथ सपोर्ट नेटवर्क' नावाची संघटना सुमारे दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. ही संघटना ग्रेटर टोरंटो मध्ये असून विशेषतः भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मदत पुरवते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कामगारांचे शोषण रोखण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या या संघटनेतील बिक्रमजीत सिंग बीबीसीशी बोलताना सांगतात, त्यांची संस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करते. पण ही संघटना कॅनडामध्ये नोंदणीकृत नाही.
 
बिक्रमजीत सिंग यांनी सांगितलं की, सुरुवातीला हॉटेल, बेकरी मालक आणि ट्रकिंग कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे शोषण व्हायचं. अशा तक्रारी आल्यावर त्याचं निवारण करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला. ते स्वतः विद्यार्थी म्हणून आले होते. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातून आलेले बिक्रमजीत सिंग सांगतात की, जर तोडगा निघालाच नाही तर त्यांच्या घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उभं राहून निदर्शने केली जातात
संघटनेच्या ट्विटर हँडलवर नजर टाकली तर अशा निदर्शनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बिक्रमजीत सिंग सांगतात, आम्ही विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांची माहिती देतो. या संघटनेने विद्यार्थ्यांना निर्वासित होण्यापासून आणि अल्गोमा विद्यापीठ व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे.
बिक्रमजीत सिंग म्हणाले की, मानसिक शोषणाव्यतिरिक्त कॅनडातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.त्यांच्या संघटनेकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या सातत्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या गैरव्यवहाराविरुद्ध कायदेशीर कारवाई का करत नाहीत, या प्रश्नावर बिक्रमजीत सिंग सांगतात की, ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे. आणि कॅनडासारख्या देशात यासाठी वेळ नाही.
 
अलिकडच्या वर्षांत विद्यार्थ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, भारतातील केंद्र आणि राज्य सरकारे वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवत आहेत. 2022 मध्ये, कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी देखील एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, शैक्षणिक संस्थांची फी भरण्यापूर्वी त्यांची माहिती घेतली पाहिजे.
 
कॅनेडियन शैक्षणिक संस्थांमध्ये हेराफेरी
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनीही मान्य केलं होतं की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी फसवणुकीला बळी पडत आहेत. यानंतर, अशा फसवणुकीपासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावं यासाठी त्यांनी महाविद्यालये/विद्यापीठांकडून प्राप्त झालेल्या स्वीकृती पत्रांसाठी आयआरसीसी कडून मान्यता घेणं अनिवार्य केलं आहे. इमिग्रेशन मंत्र्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना विशिष्ट फ्रेमवर्क तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

कॅनडाच्या सरकारनेही हे मान्य केलंय की, गेल्या काही वर्षांत अनेक शैक्षणिक संस्थांनी पैसे कमावण्याच्या उद्देशाने आवश्यकतेपेक्षा जास्त परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.परिणामी, या महाविद्यालयांमध्ये आणि संस्थांमध्ये शिकण्यासाठी बरेच विद्यार्थी कॅनडामध्ये येत आहेत. कॅनडामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि देशातील पायाभूत सुविधांवरील भार पाहता या वर्षी जानेवारीपासून दोन वर्षांसाठी परदेशी विद्यार्थ्यांची संख्या 35 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्या कमी करण्यासाठी कॅनडा सरकारने 2024 पर्यंत अंदाजे 360,000 विद्यार्थी परवाने देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय सरकारने आणखी एक मोठा बदल केला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयांमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून कामाचे परवाने दिले जाणार नाहीत. सहजप्रीत सिंग ज्या महाविद्यालयात शिकत आहे ते सार्वजनिक - खाजगी भागीदारी अंतर्गत येते.
 
कॅनडातील शिक्षण प्रांतीय सरकारच्या अखत्यारीत येतं. यानंतर, कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया सरकारने नवीन विद्यापीठं, महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नवीन प्रवेशावर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. शिक्षण क्षेत्रातील संस्थांकडून होत असलेले घोटाळे पाहता ब्रिटिश कोलंबिया सरकारने हे पाऊल उचललं आहे. माध्यमिक शिक्षण मंत्री सेलिना रॉबिन्सन यांनी कबूल केलंय की, त्यांच्या विभागाने गेल्या वर्षी मार्चमध्ये या व्यवस्थेवर बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना असं आढळून आलंय की निकृष्ट दर्जाचे शिक्षण, शिक्षकांची कमतरता असतानाही काही खाजगी संस्था विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल करू नये यासाठी त्यांना धमकवत आहेत. सीबीसी नुसार, ब्रिटिश कोलंबियामध्ये 150 पेक्षा जास्त देशांतील 175,000 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 54 टक्के विद्यार्थी खाजगी संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत. राज्यात 280 महाविद्यालये आहेत. त्यापैकी 80 टक्के लोअर मेनलँड म्हणजेच कमी लोकसंख्या असलेल्या भागात आहेत.
 
जाणकारांचं काय म्हणणं आहे?
बऱ्याच काळापासून ब्रॅम्प्टनमध्ये कायद्याची प्रॅक्टिस करत असलेले हरमिंदर ढिल्लों सांगतात की, इथे अशी महाविद्यालयं सुरू आहेत ज्यांच्या पदवीला काहीच किंमत नाही. त्याच्या आधारावर नोकरी मिळणं तर दूरची गोष्ट आहे. ढिल्लों यांच्या म्हणण्यानुसार अनेक महाविद्यालयं शॉपिंग मॉल्समध्ये सुरू आहेत. काही तर एकाच खोलीत सुरू असून त्यांच्याही विद्यार्थ्यांना व्हिसा मिळालाय. हरमिंदर सिंग यांच्या मते, एजंट आणि महाविद्यालयांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागू शकतो. हा आकडा खूप जास्त असू शकतो. त्यांनी सांगितलं की, स्टुडंट व्हिसावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा नागरिकत्वाची कोणतीही हमी देत ​​नाही.
सरकारी नियमांनुसार, जर तुम्ही अटी पूर्ण केल्या तर तुम्ही पीआरसाठी अर्ज करू शकता. ते म्हणाले की, कॅनडाला कुशल कामगारांची गरज आहे, परंतु मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येत असतानाही कुशल कामगारांची कमतरता भरून निघत नाहीये, कारण विद्यार्थी शिक्षणानंतर इतर कामं करू लागतात.
 
टोरंटोमधील पत्रकार जसवीर सिंग शमील सांगतात की, इथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं शोषण होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना कॅनडाच्या कायद्यांची माहिती नसते. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही तक्रार करण्यास घाबरतात कारण त्यांना वाटतं की त्यांना भारतात परत पाठवलं जाईल. शमिल सांगतात की, भारतात बसलेल्या पालकांना आपल्या मुला-मुलींना इथे किती अडचणी येतात हे माहीत नसतं. जर त्यांना हे सत्य कळलं तर ते त्यांना इथे कधीच पाठवणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी कॅनडामध्ये पोहोचताच त्यांचं शोषण सुरू होतं. विद्यार्थ्यांना लेबर मार्केट इम्पॅक्ट असेसमेंट (एलएमआयए) साठी हजारो डॉलर्स आकारले जातात. कॅनडामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर नोकरी करायची असेल तर त्यांना एलएमआयए सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक असतं.
 
Published By- Priya Dixit