शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (16:29 IST)

कोरोनाच्या काळात अमेरिकेसह अनेक देश भारताच्या मदतीसाठी सरसावले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत आहे. आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असताना विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे.
 
ओडिशा आणि छत्तीसगडसारख्या अनेक राज्यांनी इतर राज्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विशेष गाड्या पाठवल्या आहेत. तर अनेक राज्यांनी इतर देशांकडूनही ऑक्सिजनची मागणी केली आहे.
 
या परिस्थितीत अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. विविध देशांकडून भारतात ऑक्सिजन आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यासाठी एअर इंडियासह खासगी कंपन्यांची विमानं आणि लष्कराच्या विमानांनाही या सेवेसाठी दाखल करण्यात आले आहे.
 
साथीच्या या कठीण काळात चीन भारतासोबत असल्याचं श्रीलंकेतील चिनी दूतावासाने म्हटलं आहे.
 
हाँगकाँगहून दिल्लीला 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवण्यात आले असून येत्या सात दिवसांत आणखी 10,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे.
 
तसंच फ्रान्सकडूनही आगामी काही दिवसांत ऑक्सिजन व्हेंटिलेटर पाठवण्यात येणार असल्याची माहिती फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली.
 
यापूर्वी युरोपियन कमिशनने म्हटलं की, भारताने मदतीची विनंती केल्यानंतर लवकरात लवकर भारताला आवश्यक औषधं आणि वैद्यकीय साहित्य पाठविण्याची तयारी केली जात आहे.
 
ब्रिटन आणि भारत सरकार एकत्र काम करत असून कोरोनाशी लढण्यासाठी 300 हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह 600 वैद्यकीय उपकरणे भारतात पाठवत असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
 
या पद्धतीने औषधं आणि वैद्यकीय माल नऊ टप्प्यात भारतात पाठवला जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील माल मंगळवारी (27 एप्रिल) दिल्लीत पोहचणार आहे.
 
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी रविवारी (25 एप्रिल) भारतातील कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. आमचे सरकार भारताला आपत्कालीन मदत मिळावी यासाठी व्यवस्था करत आहे असंही त्यांनी सांगितलं. ही माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन स्टेबर्ट यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय.
 
जर्मनी भारतात मोबाईल ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य पाठवण्याच्या तयारीत आहे.
 
सिंगापूरने भारताला 500 बायपॅप्स, 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य पाठविले आहे.
 
सर्व आवश्यक पुरवठ्याचा पहिला माल घेऊन जाणारे विमान रविवारी (25 एप्रिल) रात्री सिंगापूरच्या चांगी विमानतळाहून मुंबईत दाखल झाले.
संयुक्त अरब अमिरातीने भारताला मदत करण्यासाठी उच्च क्षमतेचे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर पाठवले आहेत.
 
संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांनी रविवारी सांगितलं की, कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असलेल्या भारताला मदत आणि पाठिंबा देण्यासाठी संयुक्त अरब अमिराती कटिबद्ध आहे.
 
तसंच भारताच्या परिस्थितीबद्दल त्यांनी एस जयशंखर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि या कठीण काळात ते भारतासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सौदी अरेबियाने म्हटलं आहे की ते भारताच्या आपत्कालीन गरजांसाठी चार क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर आणि 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पाठवणार आहेत.
 
सौदी गॅझेटनुसार अदानी ग्रुप आणि लिंडे कंपनीच्या सहकार्याने ऑक्सिजनचा पुरवठा भारतात पोहचवला जात आहे. याशिवाय लिंडे कंपनी भारतासाठी 5000 ऑक्सिजन सिलिंडरदेखील प्रदान करणार आहे. हा पुरवठा लवकरात लवकर भारतातील रुग्णालयांपर्यंत पोहचवला जाईल
 
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितलं की, "आणखी 12 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर भारतात पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यापैकी सहा टँकर सोमवारी (26 एप्रिल) विमानाने नेण्यात येतील. ऑक्सिजनचा पहिला पुरवठा सौदीच्या पूर्वेकडील दमम बंदरातून समुद्रामार्गे गुजरातमधील मुंद्राकडे रवाना झाला आहे."
दुसऱ्या बाजूला अमेरिकेने कोव्हिशील्ड लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आम्ही देऊ जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढेल असं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन अमेरिका भारताला मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.
 
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, "गेल्या सात दशकांपासून दोन्ही देश आरोग्य सेवेत भागीदार आहेत. एकमेकांना मदत करत आहेत, कोरोना साथीच्या सुरुवातीला भारताने ज्यापद्धतीने अमेरिकेला वैद्यकीय मदत केली त्याचप्रमाणे आता भारताला गरज असल्याने मदत करण्याचा आम्ही पूर्ण निर्धार केला आहे."
 
सोमवारी (26 एप्रिल) सकाळी दिल्लीत दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून 318 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मालाचा पहिला टप्पा भारतात पाठविण्यात आला.
आसाम सरकारने भूतानमधून ऑक्सिजन आयात करण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती आसामचे आरोग्यमंत्री हिमंन्ता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
 
सुरुवातीला आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री पीयूष हजारिका यांनी भूतानमधील समद्रूप जोंगखार येथे काम सुरू असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाला भेट दिली.
 
हा प्रकल्प तयार झाल्यानंतर आसामला दररोज 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.
भारतात कोरोना विषाणू वेगाने पसरतोय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,52,991 नवीन रुग्ण आढळले. तर गेल्या 24 तासांत 2812 जणांचा मृत्यू झाला.
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकडेवारीनुसार, देशात रुग्णांची एकूण संख्या आता 1,73,13,163 एवढी असून मृतांची संख्या 1,95,123 वर पोहोचली आहे.
 
शनिवारी (24 एप्रिल) 3,49,691 नवीन रुग्णांची नोंद झाली तर शुक्रवारी (23 एप्रिल) 3,46,786 रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी 2767 आणि शुक्रवारी 2624 जाणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.