सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (09:08 IST)

इंडोनेशियात भूकंप: मृतांचा आकडा 162 वर, शेकडो लोक जखमी

इंडोनेशियाचं जावा बेट भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 162 वर पोहोचली असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपात किमान 162 जण मृत्युमुखी पडले आहेत अशी माहिती प्रांताचे गव्हर्नर रिदवान कामिल यांनी दिली आहे. हा भूकंप 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. पश्चिम जावातील सियांजुर भागात हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र अंदाजे 10 किमी खोल होते अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.
 
जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
 
बचावकार्य सुरू
अनेकजण इमारतींच्या खाली दबले गेले आहेत, त्यांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
 
ज्या ठिकाणी भूकंप झाला त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप आहे आणि या भागात भूस्खलन हे नेहमी होतात. घरांचे बांधकाम देखील कच्चे असल्यामुळे अनेक घरं उद्‌ध्वस्त झालेली दिसली.
अनेकजण विस्थापित
माध्यमांशी बोलताना कामिल म्हणाले की किमान 326 जण हे जखमी झाले आहेत. इमारती किंवा घरं कोसळल्यामुळे अनेकांना जखमा झाल्या आहेत.
 
अनेक जण हे ढिगाऱ्याखाली दबले आहेत अशी भीती कामील यांनी व्यक्त केली आहे, जखमींचा आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती कामील यांनी व्यक्त केली आहे.
 
13,000 जणांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत तर 2,220 अधिक घरं ही या भूकंपामुळे उद्धव्स्त झाली असल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने म्हटले आहे.
 
अनेकांनी अद्याप घरं सोडली नाहीत
सियांजुर हॉस्पिटलमध्ये जवळपास 300 जणांवर उपचार सुरू आहेत, असं हर्मन सुहेरमन या शासकीय अधिकाऱ्याने मेट्रो टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
 
बचावकार्य सुरू आहे, अनेकांना रुग्णालयात आणले जात आहे. अद्याप अनेक गावं अशी आहेत जिथे अनेक कुटुंबानी आपली घरं अद्याप सोडली नाहीत, असं सुहेरमन म्हणाले.
राजधानीतही जाणवले धक्के
या घटनास्थळापासून इंडोनेशियाची राजधानी 100 किमी दूर आहे पण तिथे देखील या भूकंपाचे धक्के जाणवले. शहरातील मोठ्या इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पश्चिम इंडोनेशियन प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.21 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले.
 
ज्या इमारती कोसळल्या आहेत, तिथून रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करणारी पथकं प्रयत्न करत आहेत. "मी काम करत होते, तेव्हा इमारत हलल्यासारखी वाटली. भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवत होते. हे नक्की काय होतं, हेच कळत नव्हतं. हे धक्के काही वेळ तसेच सुरू होते," असं वकील असलेल्या मायादिता वलुयो यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं.

इंडोनेशियात होणारे भूकंप
अहमद रिदवान या कर्मचाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की 'जकार्तामध्ये भूकंप नेहमी होतात पण यावेळी आम्ही सर्व जण घाबरलो आहोत.'
 
इंडोनेशियात भूकंप हे नेहमी होताना दिसतात. भूगर्भशास्त्रानुसार प्रशांत महासागराच्या धोक्याच्या क्षेत्रात हा भाग येतो. याला रिंग ऑफ फायर असे म्हटले जाते. इंडोनेशियात याआधी महाभयंकर असे भूकंप आणि त्सुनामी आल्या आहेत. 2018 मध्ये सुलावेसीच्या भूकंपात किमान 2000 जणांचा मृत्यू झाला होता.
 
Published By- Priya Dixit