Earthquake in Nepal: नेपाळमध्ये शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपानं नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम पश्चिम या भागात मोठी जीवितहानी झालीय.
या भूकंपातील मृतांचा आकडा 133 वर पोहोचला असून, 140 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
जाजरकोट आणि रुकुम पश्चिम या दोन जिल्ह्यांमध्ये भूकांपामुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तिथे बचाव कार्य आणि शोध मोहीम वेगाने सुरू आहे, असं नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते कुबेर कडायत यांनी बीबीसी नेपाळी सेवेला सांगितले.
भूकंपानंतर नागरिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण रात्र घराबाहेर काढली.
बचाव कार्यासाठी पोलीस, लष्कर आणि सशस्त्र दल तैनात केले असून, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जातोय.
नेपाळमधील या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. मात्र, भारतात कुठेही नुकसान झालं नाहीय.
शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री आलेला भूकंप हा 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतरचा सर्वात प्राणघातक भूकंप मानला जात आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपात झालेल्या जीवीतहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
“नेपाळमधील भूकंपात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या भावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही आशा करतो,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
लष्कराच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितलं की, 100 हून अधिक लोक जखमी झाले असून जाजरकोट येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी लोक दाखल करण्यात आले आहेत.
अथबिस्कोट नगरपालिकेचे महापौर रबी केसी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "लोक घाबरले असून त्यांनी घराबाहेर आश्रय घेतला आहे."
त्यांनी पुढे सांगितलं की, मध्यरात्री खूप जोरदार हादरा जाणवला त्यामुळे लोकांनी घराबाहेर सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. मातीच्या शेकडो घरांचं नुकसान झालंय. आम्ही बचाव आणि मदत कार्यात गुंतलो आहोत."
भूकंप झाल्यानंतर तासाभरात आणखी तीन धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे घरांचं नुकसान होण्याच्या भीतीने अनेकांनी रात्र घराबाहेर काढली.
स्थानिक माध्यमांवरील व्हीडिओ फुटेजमध्ये बहुमजली विटांची घरं ढासळल्याचं दिसत आहे. तर सोशल मीडियावरील पोस्टमध्ये कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून जिवंत लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं दिसतंय.
युनिसेफ नेपाळने सांगितलं की आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन करत आहेत.
भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी शनिवारी या प्रदेशात दौरा करत तातडीने बचावकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
भूकंपामुळे भूस्खलन झालं असून रस्ते उखडले आहेत. अशात शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
भूस्खलनामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यास अडचणी
नेपाळमध्ये भूकंपानंतर अनेक ठिकाणी भूस्खलनाचं वृत्त आहे, त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यात अडचणी येत आहेत.
जखमी रुग्णांवर भेरी रुग्णालय नेपाळगंज नर्सिंग होम आणि मेडिकल कॉलेज कोहलपूर इथे उपचार सुरू आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नेपाळी आर्मी रुग्णालय, नेपाळगंज पोलीस रुग्णालय आणि रांझा येथील भेरी हॉस्पिटलमध्ये जखमींच्या उपचारासाठी 105 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहेत.
नेपाळगंजमध्ये उपस्थित असलेल्या बीबीसीच्या प्रतिनिधी बिमला चौधरी यांनी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनूसार सांगितलं की, जखमी रुग्णांसाठी रक्तदान करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही सज्ज ठेवण्यात आलं आहे.
कर्नाली प्रांताचे पोलीस प्रमुख डीआयजी भीम प्रसाद ढकाल यांनी सांगितलं की, भूकंपानंतर पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भूकंप प्रभावित भागातील जखमींच्या बचावकार्याला सुरुवात केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाली प्रांत पोलीस कार्यालयातून 56 जणांचे पथक बचावकार्यासाठी पाठवण्यात आलं आहे.
डीआयजी ढकाल यांनी सांगितले की, रुग्णालयातील औषधांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचं पथक भूकंपग्रस्त भागात गेलं आहे.
ते म्हणाले, "अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं लोकांना बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत."
2015 मध्ये 9 हजार लोकांचा बळी घेणारा भूकंप
25 एप्रिल 2015 रोजी नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला.
युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, तेव्हा सुमारे 9000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
तर 10 लाख घरांचे नुकसान झाले आणि सुमारे 28 लाख लोक विस्थापित झाले होते.
या विनाशकारी भूकंपात नेपाळची राजधानी काठमांडू येथील अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त झाल्या असून शेकडो परदेशी पर्यटकांनाही याचा फटका बसला होता.
Published By- Priya Dixit