शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (12:58 IST)

जर्मनी आणि बेल्जियममध्ये पुरामुळे हाहाःकार, 120 जणांचा मृत्यू

विक्रमी पावसामुळे जर्मनी आणि बेल्जियममध्ये नद्यांना पूर आलाय. पश्चिम युरोपमध्ये आतापर्यंत 120 जणांचा बळी गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत. या पुरामुळे पश्चिम युरोपातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. युरोपपच्या या भागात अनेक दशकांनंतर असा पूर आल्याचं सांगितलं जात आहे.
 
मुसळधार पावसामुळे जर्मनी आणि बेल्जियममधल्या नद्यांना पूर आला आणि नद्यांचं पाणी कालवे सोडून बाहेर आलं. अतिवृष्टीमुळे पुराचा जोर कायम आहे. यामध्ये आतापर्यंत किमान 80 जणांचा जीव गेलाय. बहुतेक मृत्यू जर्मनीमध्ये झालेयत. तर बेल्जियममध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय अनेकजण बेपत्ता असल्याचं समजतंय.
 
जर्मनीमधल्या ऱ्हाईनलंड - पॅलाटिनेट आणि उत्तर ऱ्हाईन - वेस्टफेलिया भागांना या अतिवृष्टीचा सर्वात वाईट फटका बसलाय. नेदरलँडमधली परिस्थितीही गंभीर आहे. शुक्रवारीही असाच मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान बदलांमुळे हे संकट आल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
यापुढेही अशा नैसर्गिक आपत्ती हवामान बदलामुळे येत राहतील आणि म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीची पावलं अधिक प्रभावीपणे उचलण्याची गरज इथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
हवामान बदलांमुळे अशाप्रकारच्या नैसर्गिक घटना घडण्याची शक्यता असली तरी एका विशिष्ट घटनेचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी जोडणं योग्य नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल सध्या अमेरिकेत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची त्या भेट घेणार आहेत. या नैसर्गिक संकटामुळे झालेला विध्वंस पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुरामुळे जीव गेलेल्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
मर्कल म्हणाल्या, "माझ्या भावना तुमच्यासोबत आहेत. आमच्यावर विश्वास ठेवा, आमचं सरकार लोकांचे जीव सुरक्षित ठेवण्यासाठी, धोका कमी करण्यासाठी आणि हे संकट दूर करणयासाठी हरप्रकारे प्रयत्न करेल." जर्मनीत पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी पोलीस, हेलिकॉप्टर आणि शेकडो सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
 
पश्चिम जर्मनीमधल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. संपर्क साधनांवरही पावसाचा परिणाम झाला आहे.
 
काही भागांना या पुराचा इतका वाईट तडाखा बसलाय की तिथे बोटीने पोहोचणंही कठीण झालंय. मायेनमधल्या 65 वर्षांच्या स्थानिक एन्मरी मुलर यांनी AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं,"कोणालाही याचा अंदाज नव्हता. इतका पाऊस आला कुठून? पाण्याचा आवाज इतका मोठा होता की असं वाटलं की आता दरवाजा फोडून पाणी आत येणार."
 
अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून शुक्रवारीही मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ही पाणीपातळी वाढेल अशी भीती आहे. काही भागांमधली परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने लोकांना सोडवण्याची मोहीमही थांबवावी लागली आहे.
 
नेदरलँडमध्ये अदयाप पावसामुळे कोणाच्या मृत्यूचं वृत्त नाही. पण नदीकिनारी असणाऱ्या गावं आणि शहरांतल्या हजारो लोकांना लवकरात लवकर आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलंय.

फोटो: सोशल मीडिया