शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (22:48 IST)

सिंगापूरमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच 'या' गुन्ह्यासाठी महिलेला फाशी देणार

निकोलस योंग
 
 सिंगापूरमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच एका महिलेला फाशी देण्यात येणार आहे,मानवाधिकार संबंधी काम करणाऱ्या वकिलानं ही माहिती दिलीय.
 
सिंगापूरची 45 वर्षीय नागरिक सारीदेवी डजमानीला 2018 मध्ये 30 ग्रॅम हेरोइनच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.सिंगापूरचेच मोहम्मद अझीझ बिन हुसेन यांना ड्रग्जच्या आरोपाखाली फाशी दिल्यानंतर तीन दिवसांनी या महिलेलाही फाशी दिली जातेय.मार्च 2022 पासून हे सिंगापूरमधील हे 15वं प्रकरण आहे.
 
सिंगापूरमध्ये कठोर अंमली पदार्थ विरोधी कायदे आहेत,जे समाजाच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचं ते मानतात.
 
अझीझला 50 ग्रॅम हेरोइनच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.सिंगापूरच्या कायद्यानुसार 15 ग्राम पेक्षा जास्त हेरोइन आणि 500 ग्रॅम पेक्षा अधिक गांजाच्या तस्करीसाठी मृत्युदंड दिला जाऊ शकतो.
 
सिंगापूरच्या सेंट्रल नार्कोटिक्स ब्युरो (CNB)नं सांगितलं की,अझीझची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली होती.त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली होती.त्या निर्णयाविरोधात त्यानं 2018 मध्ये अपील केलं होतं ते फेटाळण्यात आलं होतं.
 
एप्रिल मध्ये तंगराजू सुप्पीअह या आणखी एका सिंगापूरच्या व्यक्तीला 1 किलो गांजाच्या तस्करी बद्दल फाशी देण्यात आली,या गांजला त्यानं स्पर्शही केला नव्हता.मोबाईल फोन संभाषणाद्वारे त्यानं गांजा तस्करी केली होती,असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
बीबीसीनं संपर्क साधला असता सिंगापूरच्या सेंट्रल नार्कोटिक्स ब्युरोनं सारीदेवी प्रकरणात बोलण्यास नकार दिला.
 
ब्रिटिश अब्जाधीश सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सिंगापूरच्या फाशीबद्दल पुन्हा टीका केली आहे आणि म्हटलं आहे की,"फाशीची शिक्षा गुन्ह्याला प्रतिबंध करणारी नाही."छोट्या अंमली तस्करांना मदतीची आवश्यकता असल्याचं ते सांगतात बऱ्याचदा धमकावून त्यांना यात ओढलं जातं,ब्रॅन्सन यांनी ट्विट करत म्हटलंय की,"सरीदेवी डजमानीची फाशी थांबवण्यात उशीर झालेला नाही."
 
सिंगापूरच्या मानवाधिकार गट 'ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टीस कलेक्टिव्ह'च्या म्हणण्यानुसार सिंगापूरमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्या दोन महिलांपैकी ती एक आहे. 2004 मध्ये केशभूषाकार येन या महिलेला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सारीदेवीनं साक्ष दिलीय की,रमजानच्या उपवास काळात वैयक्तिक वापरासाठी तीन हेरोइनचा साठा केला होता.
 
तिनं तिच्या फ्लॅटमध्ये हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन सारख्या ड्रग्जची विक्री नाकारली नाही.पण तीच कार्यक्षेत्र मर्यदित होत,असं न्यायाधीश सी की ओन यांनी नोंदवलंय.
 
अधिकारी असा युक्तिवाद करतात की कठोर ड्रग्ज कायदा सिंगापूरला जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण बनवतं.म्हणूनच अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेला इथं व्यापक सार्वजनिक समर्थन मिळते असं त्याचं म्हणणं आहे.
 
पण फाशीच्या शिक्षेविरोधात असणारे वकील हे सरकारी अधिकाऱयांच्या या दाव्याचं खंडन करतात
 
ऍमेस्ट्री इंटरनॅशनलच्या चियरा संगीओर्जिओ यांनी निवेदनात म्हटलंय की,"मृत्यूदंडाच्या शिक्षेमुळं ड्रग्जच्या वापरावर आणि उप्लब्धतेवर कोणताही परिणाम होत असल्याचा पुरावा नाहीय."तसेच त्या पुढे सांगतात की "या फाशीमुळं एकच संदेश मिळतोय,सिंगापूर मृत्यूदंडा देण्याबाबतचे आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत नाही." ऍमेस्ट्री इंटरनॅशनल सांगितलं की,चीन,इराण आणि सौदी अरेबियाच्या बरोबरीनं सिंगापूर हा असा चौथा देश आहे ज्यांनी अंमली पदार्थांशी संबधीत आरोपांखाली फाशीची शिक्षा दिलीय.