मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (21:23 IST)

Woman died प्रसूतीवेदना सहन करीत अडीच किमी पायपीट केल्याने महिलेचा मृत्यू

Woman died इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात जुनवणेवाडी येथील महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे प्रसूतीवेदना सहन करीत पहाटेच्या वेळी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली.
 
पाऊस, प्रसूतीवेदना व पायपीट यामुळे अखेर या महिलेचे निधन झाले व मृत्यूनंतरही रस्त्याअभावी पुन्हा नातेवाईकांना तिचा मृतदेह डोली करून गावाकडे न्यावा लागला. शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना असून या गावात तातडीने रस्ता करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी केली आहे.
 
याबाबत माहिती अशी, की तळोघ ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून, मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकर्‍यांना अडीच किमी अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट सुरू केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला झोळी करून दवाखान्यात नेण्यात आले; मात्र अतिश्रमामुळे तिचे निधन झाले.
 
तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठीसुद्धा पुन्हा कच्च्या रस्त्यामुळे डोली करून न्यावे लागले. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. जुनवणेवाडीसारख्या अनेक गावांत रस्ताच नसल्याने अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याने आता तरी वाहतुकीस योग्य रस्ता व्हावा, अशी अपेक्षा जुनवणेवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.