1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 सप्टेंबर 2023 (13:58 IST)

गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला आणि त्याचा जीव गेला

death
एका अमेरिकन नागरिकाला गुगल मॅपनं चुकीचा रस्ता दाखवल्यानं त्याचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.फिलिप पॅक्सन असं मृत व्यक्तीचं नाव आहे. फिलिप यांना गुगल मॅपनं कोसळलेल्या पुलावरुन गाडी चालवण्यास सांगितली, हा पूल 9 वर्षांपूर्वी कोसळला होता. तरी Google मॅपनं हा नकाशा अपडेट केला नाही, हा त्यांचा निकाष्ळजीपणा असल्याचा आरोप फिलिप पॅक्सन यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
कोसळलेल्या पुलावरून गाडी चालवल्यानं पाण्यात बुडून फिलिप याचा मृत्यू झाला होता.
 
फिलिप पॅक्सन यांच्या कुटुंबानं त्यांच्या मृत्यूबद्दल गुगल कंपनीवर खटला दाखल केला आहे , त्यांचा असा आरोप आहे की नऊ वर्षांपूर्वी हा पूल पडला होता हे नकाशात दाखवण्यात Google अपयशी ठरला आहे, हा त्यांचा निष्काळजीपणा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
उत्तर कॅरोलिना येथील हिकोरी येथील कोसळलेल्या पुलावरून गाडी चालवल्यानं सप्टेंबर 2022 मध्ये फिलिप यांचा बुडून मृत्यू झाला होता.
 
गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, कंपनी आरोपांची पडताळणी करत आहे. या प्रकरणी मंगळवारी ( 19 सप्टेंबर) वेक काउंटी येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
 
फिलिप यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलीच्या नवव्या वाढदिवसाच्या पार्टीला तयारी सुरु होती. मित्राच्या घरुन ते गाडी घेऊन निघाले हा परिसर त्यांना अपरिचित होता, असं या खटल्यात म्हटलं आहे.
 
त्यांची पत्नी ही दोन मुलींसह आधीचं घरी पोहचले होते.
"स्थानिक रस्त्यांबद्दल अपरिचित असल्यानं फिलिप हे Google मॅपवर अवलंबून होते. याचा वापर आपल्याला घरी सुरक्षितपणे घेऊन जाईल, असं त्यांना वाटलं असावं."
 
कुटुंबाच्या वकिलांनी खटल्याची घोषणा करताना एका निवेदनात म्हटलं आहे की, "दुःखद गोष्ट म्हणजे, अंधारात आणि पावसात सावधपणे गाडी चालवताना, त्यांनी गुगलच्या कालबाह्य दिशानिर्देशांचं पालन केलं आणि या नकाशानुसार जो पुल आता अस्तित्वात नाही त्यावरुन गाडी चालवली आणि ते स्नो क्रीकमध्ये कोसळले. बुडून त्यांचा मृत्यू झाला."
 
2013 मध्ये पूल कोसळल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांचे ऑनलाइन नकाशे बदलण्यासाठी गुगलशी वारंवार संपर्क साधला होता, असं दाव्यात म्हटलं आहे.
 
शार्लोट ऑब्झर्व्हर वृत्तपत्रानुसार, तोडफोडीमुळं ब्रिजच्या प्रवेशद्वारावर लावलेले अडथळे गायब होते.
 
तीन स्थानिक कंपन्यांवरही याप्रकरणी खटला चालवला जात आहे, यात असा युक्तिवाद करण्यात आला आहे की पुलाची देखभाल करणं हे त्यांचं कर्तव्य आहे.
"आमच्या मुली विचारतात की त्यांचे वडील कसे आणि का मरण पावले? मी त्यांना समजावू शकत नाहीये. माझ्याकडे शब्द नाहीत. जीपीएस दिशानिर्देश आणि पुलासाठी जबाबदार असलेले असं कसं वागले असतील हे मला अजूनही समजू शकत नाही. मानवी जीवनाचं त्यांना महत्त्व नाही का?" असं त्यांची पत्नी, अॅलिसिया पॅक्सन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
 
दरम्यान, गुगलच्या प्रवक्त्यानं एपी न्यूजला सांगितलं की, “पॅक्सन कुटुंबाप्रती आम्हाला सर्वात जास्त सहानुभूती आहे. मॅपमध्ये अचूक माहिती प्रदान करणं हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या खटल्याची समीक्षा करत आहोत."
 















Published By-Priya Dixit