हुथींनी येमेनच्या राष्ट्रपती भवनावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला, दोन सुरक्षा कर्मचारी ठार
हुथी बंडखोरांनी येमेनच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी ठार आणि सहा जण जखमी झाले. येमेनमध्ये हुथी बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यातील तणाव वाढत आहे.
गुरुवारी, हुथी दलांनी येमेनच्या एडनमधील अल-माशिक राष्ट्रपती भवनाला लक्ष्य केले. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी ठार आणि सहा जण जखमी झाले.वृत्तानुसार, येमेनचे युवा मंत्री, नायेफ सालेह अल-बकरी यांनी सांगितले की एडनमधील सर्व कॅबिनेट मंत्री सुरक्षित आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हल्ला होऊनही सरकारचे सदस्य शहर सोडणार नाहीत. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा हुथी चळवळ आणि सौदी अरेबिया यांच्यातील लष्करी संघर्ष वाढत आहे. एक दिवस आधी, हुथींनी सौदी ऊर्जा प्रकल्प आणि रियाध आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. बुधवारी, हुथी लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी दावा केला की, त्यांच्या गटाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून सौदी अरेबियातील अनेक लक्ष्यांवर हल्ला केला आहे.

