गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (08:10 IST)

इस्रायली सुरक्षा कवच भेदण्यासाठी हमासने दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे पॅराशूटचा वापर कसा केला?

hamas
मोहम्मद हमदार आणि हनान रझाक
'हमास'नं शनिवारी ( 7 ऑक्टोबर) इस्रायलवर हल्ला केला. त्यांच्या कट्टरतावाद्यांनी सीमा ओलांडण्यासाठी घुसखोरीचा वापर केला.
 
हमासची लष्करी शाखा असलेल्या 'इझ अल-दीन अल-कसम ब्रिगेड्स'नं गाझा पट्टीच्या आसपासच्या इस्रायली शहरांवर आणि संगीत महोत्सवातील उपस्थितांवर हल्ला केला. या अचानक केलेल्या हल्ल्याला त्यांनी ‘अल अक्सा फ्लड’असं नाव दिलं.
 
इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते रिचर्ड हेश्त यांनी सांगितलं की, पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी 'पॅराशूट'द्वारे समुद्र आणि जमिनीच्या मार्गानं घुसखोरी केली होती.
 
सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत ज्यात 'अल कसम ब्रिगेड'चे सदस्य पॅराशूटनं उतरताना दिसत आहेत.
 
इस्रायलवर हल्ला करण्यासाठी त्यांनी प्रथमच अशा पद्धतींचा वापर केला.
 
पॅराशूटद्वारे कट्टरवादी सीमेच्या पलीकडे पोहचले
गाझा आणि इस्रायलला विभाजित करणारी भिंत आणि काटेरी तारेचं कुंपण पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी पॅराशूटद्वारे हवाई मार्गाने पार केलं.
 
त्यांनी एक किंवा दोन लोकांना वाहून नेण्याची क्षमता असलेलं पॅराशूट वापरलं.
 
जनरेटर आणि ब्लेडद्वारे चालवलं जाणारं पॅराशूट किंवा ग्लायडर्सद्वारे त्यांनी गाझा पट्टीच्या आसपासच्या इस्रायलच्या भागात प्रवेश केला.
 
दुसऱ्या महायुद्धात पॅराशूटचा वापर
दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅराशूटचा वापर शत्रूच्या सीमेत घुसण्यासाठी लष्काराकडून केला जात असे.
 
दुसऱ्या महायुद्धात प्रथमच जर्मनी आणि मित्र राष्ट्रांनी एकमेकांविरुद्ध पॅराशूट दल वापरलं होतं.
 
1987 चा ग्लायडर हल्ला
शनिवारचा हमासचा हल्ला हा 1987 मध्ये 'पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन'च्या जनरल कमांडशी संबंधित दोन पॅलेस्टिनी, एक सीरियन आणि एका ट्युनिशियन सैनिकांनी केलेल्या ग्लायडर ऑपरेशनची आठवण करून देणारा होता.
 
नोव्हेंबर 1987 मध्ये, त्यांनी इस्रायलच्या लष्करी तळावर हल्ला करण्यासाठी लेबनॉनमधून उड्डाण केलं होतं.
 
'हमास'चे हल्लेखोर जमिनीवर उतरले आणि हल्ला केला
एका मोटरने सुसज्ज अशा पॅराशूटच्या सहाय्यानं उड्डाण करुन हमासचे हल्लेखोर जमिनीवरून हल्ला करण्यात यशस्वी झाले. याचा अर्थ ते पर्वत चढून किंवा कोणतेही विमान न घेता सीमा ओलांडू शकले.
 
इंजिन पॅराशूट हे ताशी 56 किलोमीटर वेगाने चालतं. पॅराग्लायडर्स जमिनीपासून सरासरी 5000 मीटर उंचीवर तीन तास उडू शकतात. पॅराग्लायडिंग वेबसाइट्सनुसार, ते चार लोक किंवा 230 किलो भार वाहून नेऊ शकतात.
 
छत्रीसारख्या या पॅराशूटमध्ये एक किंवा दोन लोकांना नेण्याची क्षमता असलेली तीन चाकी रचना देखील आहे.
 
इझ अल-कासम ब्रिगेडच्या माध्यमांनी काही व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्या आहेत ज्यात पॅराग्लायडर जमिनीवर उतरताना दिसत आहेत, प्रत्येक पॅराशूटमध्ये एक किंवा दोन कट्टरवादी आहेत.
 
फुटेजमध्ये सैनिक हवेत गोळीबार करताना आणि इस्रायली ठिकाणांवर हल्ले करताना दिसत आहेत.
 
सीमेवरील तारेचं कुंपण ओलांडून इस्रायलमध्ये दाखल झालेल्या पॅराट्रूपर्सना हमासनं 'सक्र स्क्वाड्रन' असं नाव दिलं.
 
इस्रायलच्या लष्कराला हे पॅराशूट का दिसले नाहीत?
 
हमासच्या मीडियानं प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओ क्लिपमध्ये दिसत आहे की, रॉकेटचा जोरदार मारा केल्यामुळं या सशस्त्र कट्टरतावाद्यांना सुरक्षा कवच प्राप्त झालं आणि गाझा येथून पॅराग्लायडर्स वर उड्डाण करत असल्याचं दिसत आहे.
 
त्यापैकी काही खूप कमी उंचीवर उडताना दिसतात, तर काही आकाशात खूप उंच उडताना दिसतात. गाझापट्टीच्या चारही दिशेला आकाशात स्पष्टपणे पॅराग्लायडर्स दिसत होते.
 
इस्त्रायलच्या प्रसारमाध्यमांनी लष्कराला त्यांना पाहण्यात कसं अपयश आलं असा सवाल केला आहे.
 
कट्टरतावाद्यांनी सीमा ओलांडल्यानंतरही आपलं हवाई संरक्षण दल सतर्क का झालं नाही याचं कारण इस्रायली लष्करानं अद्याप स्पष्ट केलेलं नाही. विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा पॅराशूट इतकं स्पष्ट दिसत होतं की, लोकांनी त्यांच्या मोबाईल फोनद्वारे त्यांचे व्हीडिओ बनवले.