सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (22:55 IST)

इस्रायल-हमास संघर्ष : गाझापट्टीनंतर आता लेबनॉनवर इस्रायलकडून बॉम्ब हल्ले

israel vs palestine
Israel-Hamas conflict :गाझा सीमा इस्रायली सैनिकांनी सुरक्षित केल्या असून, गाझा पट्टीतील हमासच्या केंद्रांवर एअरस्ट्राईक सुरूच असल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलानं दिलीय.
 
बुधवारी ( 10 ऑक्टोबर) रात्री इस्रायलकडून गाझापट्टीच्या उत्तरभागात हवाई हल्ले करण्यात आले.
 
तर लेबनॉनमध्येही काही भागात इस्रायलनं बॉम्ब वर्षाव केल्याचा दावा तिथल्या सरकारी मीडियानं केलाय. तर दुसरीकडे, लढाई पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, असं हमासनं स्पष्ट केलंय.
 
हमासच्या राजकीय संघटनेचे प्रमुख इस्माईल हनियेह म्हणाले की, "शत्रूंच्या कैंद्यांबाबत आमच्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला, त्या प्रत्येकाला आम्ही हेच सांगितलंय की, लढाई पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही."
 
गाझाची नाकेबंदी; इस्रायलकडून हवाई हल्ले सुरूच
गाझाच्या उत्तर भागात बुधवारी (10 ऑक्टोबर) रात्री खूप तणावाची परिस्थिती होती. येथील स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हवाई हल्ल्यात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या.
 
मंगळवारी रात्री 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये बहुसंख्य नागरिक होते. त्या भागात पोहोचण्यात आम्हाला अद्याप यश आलेले नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
मात्र इमारतीच्या गच्चीवरून आम्ही रात्री त्या भागात सातत्यानं हवाई हल्ले होत होते ते आपण पाहत आहोत.आम्ही शहराच्या दक्षिणेकडील भागात शेकडो लोक रुग्णालयं आणि शाळांकडे जाताना पाहिले, असं त्यांनी सांगितलं आहे.
 
दोन लाख विस्थापितांना आश्रय देण्याचा संयुक्त राष्ट्रांचा प्रयत्न आहे. हे गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के आहेत.
 
गाझापट्टीत वीज नाही, पाणी नाही आणि खायला अन्न नाही अशी स्थिती आहे. बेकरीसमोर लोक रांगेत उभे आहेत. जिथं त्यांना काही खाद्यपदार्थ मिळत आहेत. बँका थोडेफार पैसे देत आहेत आणि थोडं इंधन पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे.
 
लेबनॉनच्या सरकारी मीडियाचा दावा की, 'शत्रू बॉम्बचा वर्षाव करत आहे'
 
लेबनॉनच्या सरकारी मीडियानुसार, इस्रायलनं त्यांच्या देशाच्या काही भागात हल्ले केले आहेत. इस्रायलच्या लष्करानंही या हल्ल्याची माहिती दिली आहे.
 
याआधी इस्रायलच्या लष्करानं लेबनॉनमधून त्यांच्या लष्करी चौकीवर क्षेपणास्त्राचा मारा केल्याचं म्हटलं होतं.
 
हिजबुल्लाहनं लेबनॉनच्या हद्दीतून हा क्षेपणास्त्र मारा केल्याचा दावा या आधी इस्रायली लष्करानं केला होता.
 
आयडीएफ (इस्रायल डिफेन्स फोर्स) नं सांगितलं की अँटी टँक क्षेपणास्त्र अरब अल-अरमाशजवळ पडलं होतं. त्यानंतर इस्रायली लष्करानं म्हटलं आहे की ते लेबनॉनच्या काही भागात हल्ले करत आहेत. लेबनॉनच्या सरकारी मीडियानं दोन भागात हल्ले झाल्याचं वृत्त दिलं आहे.
 
लेबनॉनच्या नॅशनल न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, "धारिया क्षेत्राजवळ शत्रू बॉम्बचा वर्षाव करत आहे, तर यारिन परिसरात फॉस्फरस बॉम्बचा मारा करण्यात आला."
 
या वृत्ताची बीबीसीनं स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. लेबनॉनच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
हमासच्या हल्ल्यानंतर कट्टरवादी संघटना हिजबुल्लानं इस्रायलवर अनेक रॉकेटचा मारा केला होता. हिजबुल्लाला इराणचा पाठिंबा असल्याचं मानलं जात आहे, तर इस्रायल आणि पाश्चात्य देशांनी या संघटनेवर निर्बंध लादले आहेत.
 
शनिवारी( 7 ऑक्टोबर) झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला असून 2700 हून अधिक लोक जखमी झाल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. त्याचवेळी, गाझामधील हल्ल्यात आतापर्यंत 950 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
मोदी म्हणाले- 'कठीण काळात आम्ही इस्रायलसोबत आहोत'
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून गाझा पट्टीतून हमासच्या कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाशी संबंधित सद्यस्थितीची माहिती दिली.
 
यावेळी पंतप्रधानांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना आश्वासन दिलं की, या कठीण काळात भारतातील जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
 
सोशल मिडिया 'एक्स' वर पीएम मोदींनी ही माहिती दिली की इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांना दूरध्वनी केला होता.
 
मोदी एक्सवर म्हणाले, "इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल मला माहिती दिल्याबद्दल मी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो."
 
तसंच इस्रायलमध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी मांडला. तेव्हा नेतन्याहू यांनी इस्रायलमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदी यांना आश्वासन दिलं आहे. दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचं मान्य केलं आहे.
 
हमासला परिणाम भोगावे लागतील - नेत्यान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हमासवर हल्ल्यानंतर त्यांचं प्रत्युत्तर ही केवळ सुरुवात असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या देशाकडे असलेल्या प्रचंड ताकदीचा वापर करून ते हमासचा पराभव करतील, असं त्यांनी म्हटलं.
 
AFP या वृत्तसंस्थेच्या मते दक्षिण इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान ते म्हणाले, “हमासला याचे परिणाम भोगावे लागतील.”
ते म्हणाले, “ही फक्त सुरुवात आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमच्या ताकदीच्या बळावर आम्ही त्यांना हरवू. आम्ही मध्य-पूर्व आशियाची परिस्थिती बदलून टाकू.”
 
ओलीस नागरिकांना सोडवण्यासाठी इस्रायल आणि हमासमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं करत असल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.
गाझाची नाकेबंदी
इस्रायलच्या सैन्याने काल (9 ऑक्टोबर) हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली. लष्कराने सांगितलं की, हमासच्या 500 पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ला केला आहे.
 
इस्रायलचे संरक्षण मंत्री योओव गँलेट यांनी गाझाची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचा आदेश दिला आहे. ते म्हणाले की, गाझामध्ये खाणं पिणं आणि वीजेचा पुरवठा खंडित केला आहे. इस्रायलच्या मते गाझा पट्टीतून कोणी बाहेर येऊ शकणार नाही किंवा जाऊ शकणार नाही.
 
संयुक्त राष्ट्रांच्या मते गाझामध्ये 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत. त्यापैका बहुतांश लोकांनी एका शाळेत आश्रय घेतला आहे.
 
अमेरिकेने पाठवल्या युद्धनौका
या संघर्षात भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडासह पाश्चात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे.
 
तर अमेरिकेने मध्य पूर्व समुद्रात युद्धनौका पाठवल्या आहेत.
 
रशिया आणि चीनने या हिंसाचाराचा निषेध केला आहे, पण पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला आहे.
 
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 18 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
 
सोमवारी (9 ऑक्टोबर) 12 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आणि 11 जणांचं अपहरण झाल्याची बातमी आली होती.
 
तसंच इस्रायलमध्ये राहणाऱ्या नेपाळमधील 10 विद्यार्थ्यांचाही या संघर्षात मृत्यू झाला आहे.
 
 





















Published By- Priya Dixit