1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (23:12 IST)

इस्रायलचं आयर्न डोम काय आहे, जे रॉकेटला हवेतच नष्ट करतं?

Iron Dome
इस्रायलवर 'हमास'ने अभूतपूर्व हल्ला केला. शेकडो रॉकेट्सचा मारा इस्रायलवर केल्यानं इस्रायलच्या संरक्षण यंत्रणांच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
 
या हल्ल्यानंतर इस्रायलं त्यांचं हवाई संरक्षण यंत्रणा 'आयर्न डोम' सक्रीय केलंय. त्याचे काही व्हीडिओही समोर आले, ज्यात दिसतंय की हमासने मारा केलेले रॉकेट्स इस्रायल 'आयर्न डोम'च्या मदतीने आकाशातच नष्ट करतंय.
 
इस्रायलनं 'आयर्न डोम' सक्रीय केल्यापासून 'हमास'ने मारा केलेली रॉकेट इस्रायलच्या सुरक्षा कवचामुळे जमिनीवर पोहोचण्याच्या आधीच हवेतच नष्ट करण्यात आली. या सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम अँटी मिसाइल म्हणतात.
 
हल्ला करण्यात आलेलं रॉकेट नागरी भागांमध्ये पडण्यापासून ही यंत्रणा रोखते आणि हे रॉकेट हवेतच नष्ट करण्यात येतं.
 
आयर्न डोम सिस्टीम काम कसं करते?
लाखो डॉलर्स खर्च करून इस्रायलने उभारलेली ही यंत्रणा ही एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा एक भाग आहे.
 
डागण्यात आलेलं रॉकेट किंवा क्षेपणास्त्र हे रहिवासी भागांवर पडेल किंवा नाही याचा अंदाज ही सिस्टीम लावते किंवा कोणतं रॉकेट आपल्या लक्ष्यापासून दूर जाण्याचा अंदाज असल्याचंही ही सिस्टीम ठरवते.
 
जी रॉकेट रहिवासी भागांवर पडण्याची शक्यता असते, अशा रॉकेटस ना ही सिस्टीम हवेमध्ये नष्ट करते.
 
या वैशिष्ट्यामुळे ही बचावात्मक यंत्रणा अतिशय परिणामकारक ठरते आहे.
 
या प्रत्येक इंटरसेप्टरची किंमत सुमारे दीड लाख डॉलर्स असल्याचं टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलंय.
2006 साली हिजबुल्ला या इस्लामी गटाशी युद्ध झाल्यानंतर इस्रायलने या यंत्रणेवर काम करायला सुरुवात केली होती.
 
2006 सालच्या युद्धादरम्यान हिजबुल्लाने इस्रायलच्या दिशेने हजारो रॉकेटस लॉन्च केली आणि यामध्ये अनेक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलने ही बचावात्मक यंत्रणा विकसित करायला घेतली.
 
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपण देशासाठी एक मिसाईल शिल्ड म्हणजेच क्षेपणास्त्रापासून बचाव करणारं कवच तयार करणार असल्याचं इस्रायलची सरकारी कंपनी रफार डिफेन्सने म्हटलं होतं.
 
ही यंत्रणा तयार करण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला वीस कोटी डॉलर्सची मदत केली.
 
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर 2011साली या यंत्रणेची चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान इस्रायलच्या दक्षिणेला असणाऱ्या बीरसेबा शहरातून क्षेपणास्त्र डागण्यात आली आणि या यंत्रणेने ही रॉकेट्स यशस्वीरित्या पाडली.
या यंत्रणेत त्रुटी आहेत का?
 
2021 साली हमास आणि इतर पॅलेस्टाईन कट्टरवादी संघटनांनी इस्रायलच्या दिशेने 1500 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली होती, तेव्हा बीबीसीनं 'आयर्न डोम'बाबत जाणकारांशी बातचित केली होती.
 
काही जाणकारांच्या मते, सध्या ही यंत्रणा गाझाकडून येणारी रॉकेट्स प्रभावीपणे नष्ट करत असली तरी भविष्यात ती इतर दुसऱ्या कोणत्या शत्रूच्या विरुद्ध इतकी प्रभावी सिद्ध होईलच याची खात्री नाही.
 
जेरुसलेम पोस्टचे संपादक योना जेरेमी बॉब यांनी असं म्हटलं होतं की, कमी वेळात भरपूर रॉकेट डागण्याची हिजबुल्लाची क्षमता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही यंत्रणा इतक्या प्रभावीपणे काम करू न शकण्याची शक्यता आहे.
 
पण गेली काही वर्षं सतत संघर्षाला सामोरे जाणारे इस्रायली नागरिक या यंत्रणेचे आभार मानतात, कारण या सुरक्षा यंत्रणेमुळे त्यांचा जीव वाचतोय.
 
पण इस्रायलने फक्त या यंत्रणेच्या भरवशावर राहून चालणार नाही, आणि दीर्घकालीन इतर उपाय शोधणं गरजेचं असल्याचं तेल अवीव विद्यापीठातले राजकीय संशोधक डॉक्टर योआव फ्रोमर सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, "हा विरोधाभास म्हणायला हवा की आयर्न डोम यशस्वी झाल्याने काही परराष्ट्र धोरणे अयशस्वी झाली. यामुळे हिंसा वाढली… अनेक वर्षं उलटूनही कधीही न संपणाऱ्या हिंसाचाराच्या चक्रात आम्ही अडकलेलो आहोत."
 






Published By- Priya Dixit