1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (09:13 IST)

डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर 'हे' भारतीयही असतील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतशी दोन्ही बाजूच्या टीम कशा असणार, उपराष्ट्राध्यक्षपद आणि इतर महत्त्वाच्या पदांसाठी दावेदार कोण याची चर्चा होत आहे. ट्रम्प यांच्या टीममध्ये अनेक भारतीय वंशाच्या नेत्यांचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. या संभाव्य नावांबद्दल जाणून घेऊया.
अमेरिकेतील निवडणुकांकडं जगाचं लक्ष लागलं आहे. पुढील महिन्यात अमेरिकेतील विस्कान्सिनमध्ये रिपब्लिकन पक्षाची परिषद होणार आहे. या परिषेदत डोनाल्ड ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारासाठीची त्यांची पसंती जाहीर करतील.
 
ट्रम्प यांच्या टीममध्ये समावेश होण्यासाठी अनेकजण उत्सूक असून यासंदर्भात अनेक नावांची चर्चा होते आहे.
यातीलच काही इच्छुकांना त्यांच्या संपत्तीबाबत माहिती देण्यासाठीची कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत.
यासंदर्भात भारतीयांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय वंशाच्या राजकारण्यांची नावंदेखील यात चर्चेत आहेत.
 
ट्रम्प यांच्या टीममध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकणाऱ्या किंवा उपराष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या संभाव्य उमेदवारांवर एक नजर टाकूयात.
तुलसी गबार्ड
डेमोक्रॅटिक पक्षाच्या तुलसी गबार्ड अमेरिकन संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या हिंदू ठरल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांच्या यादीत त्यांचा समावेश होऊ शकतो.
तुलसी गबार्ड यांच्याबाबतची विशेष गोष्ट म्हणजे, दशकभरापूर्वी इराक युद्धात त्या लढल्या आहेत. अमेरिकेच्या राखीव सैन्यात त्या होत्या.
2016 मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठीही त्या इच्छूक होत्या. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते.
 
नंतर त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्याऐवजी बर्नी सेंडर्स यांना पाठिंबा दिला होता.
2013 ते 21 या कालावधीत त्या अमेरिकन संसदेत होत्या. त्यावेळी त्यांनी ओबामा सरकार आणि अमेरिकन सैन्याच्या धोरणांवर टीका केली होती.
पुन्हा एकदा 2020 मध्ये त्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत उतरल्या होत्या. अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर त्या तीव्र टीका करायच्या.
42 वर्षांच्या तुलसी गबार्ड यांनी नंतर फॉक्स न्यूजमध्ये जाण्याची घोषणा केली आणि 2022 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षदेखील सोडला.
 
अलिकडे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीत, युक्रेननला मदत करण्यावर प्रखर टीका करणाऱ्या तुलसी गबार्ड यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली होती. ट्रम्प यांनी गबार्ड यांच्याशी अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षण खात्याच्या (पेंटागॉन) कारवायांसंदर्भात चर्चा केली होती.
 
जेडी वान्स
जेडी वान्स 39 वर्षांचे असून ते ओहायोमधून ज्युनियर सिनेटर आहेत. गेल्या अनेक महिन्यांत त्यांनी अनेकदा ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.
वान्स यांनी येल इथून शिक्षण घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 'हिलबिली एलेगी' हे बेस्ट सेलिंग पुस्तकही लिहिलं आहे.
वान्स हे आधी ट्रम्प यांचे विरोधक होते. मात्र 2022 मध्ये ट्रम्प यांच्या पाठिंब्यावर ते सिनेटच्या निवडणुकीत उभे राहिले. त्यानंतर मात्र त्यांनी भूमिका बदलली.
ट्रम्प यांना मिळणारा पाठिंबा वाढवणाऱ्या अनेक मुद्द्यांना वान्स यांनी आपल्या कार्यकाळात पाठिंबा दिला.
जेडी वान्स यांच्या मते, भविष्यात ट्रम्प यांच्या सरकारसाठी ते सिनेटमध्ये अधिक उपयुक्त ठरतील. अर्थात तेसुद्धा उपराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेतच.
 
टिम स्कॉट
हेदेखिल सिनेटर असून अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचा प्रमुख कृष्णवर्णीय चेहरा आहेत. पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धीही होते.
स्कॉट 58 वर्षांचे असून त्यांना प्रचार मोहिमेसाठी निधी जमवता आला नाही, त्यामुळं तीन डिबेटनंतरच ते त्यातून बाहेर पडले आणि ट्रम्प यांना पाठिंबा दिला.
न्यू हॅम्पशरमधील प्रायमरीच्या आधी ट्रम्प यांच्या प्रचारसभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली.
ते म्हणाले होते की, "आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांची गरज आहे."
त्याचबरोबर ते ट्रम्प यांना म्हणाले होते की, "माझं तुमच्यावर प्रेम आहे."
त्यावर ट्रम्प यांनी स्मितहास्य करत उत्तर दिलं होतं की, "म्हणूनच तर तुम्ही महान राजकारणी आहात."
सीबीएस नुसार ट्रॅम्प यांच्याकडून स्कॉट यांनाही संदेश आला आहे.
 
डग बुरगम
प्राथमिक फेरीत ट्रम्प यांच्याविरुद्ध डग बुरगम यांचा पराभव झाला होता. 67 वर्षांचे बुरगम दुसऱ्यांदा नॉर्थ डकोटाचे गव्हर्नर बनले आहेत.
 
राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत त्यांचा फारसा प्रभाव पडला नव्हता.
 
2023 मध्ये बुरगम म्हणाले होते की, 'ट्रम्प यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. कारण 'तुम्ही ज्यांच्या संगतीत असता तशीच तुमच्याबद्दलची प्रतिमा देखील तयार होते.'
बुरगम यांच्या करिअरची सुरुवात एका लहानशा सॉफ्टवेअर स्टार्टअपद्वारे झाली. नंतर ते स्टार्टअप मायक्रोसॉफ्टनं विकत घेतलं. नंतरच्या वर्षांमध्ये बुरगम अब्जाधीश झाले.
 
बुरगम यांच्या राजकारणाच्या आकलनामुळं आणि त्यांच्या वर्तनाचा ट्रम्प यांच्यावर प्रभाव पडला आहे, असं म्हटलं जातं. याच वैशिष्ट्यांमुळे 2016 मध्ये माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांची निवड झाली होती.
 
बुरगम यांनादेखील ट्रम्प यांच्याकडून संदेश आला असल्याची माहिती आहे.
 
बायरन डोनाल्ड्स
कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा विस्तार करण्यामध्ये बायरन डोनाल्ड्स यांचा मोठा वाटा आहे.
 
न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले बायरन डोनाल्ड्स 45 वर्षांचे आहेत. त्यांच्या आईनं एकटीनं त्यांचं संगोपन केलं. 2012 मध्ये त्यांचा फ्लोरिडातील राजकारणात प्रवेश झाला. त्याआधी ते वित्तीय कंपन्यांमध्ये काम करायचे.
 
फ्लोरिडा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये चार वर्षे सेवा दिल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी अमेरिकन संसदेत कट्टरपंथीयांचं प्रतिनिधित्व केलं.
 
कृष्णवर्णीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी 15 जूनला ते ट्रम्प यांच्या मिशिगनच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते. ट्रम्प यांनी उघडपणे बायरन यांना पसंती असल्याचं सांगितलं होतं.
ट्रम्प म्हणाले होते, "बायरन डोनाल्ड्स एक उत्तम व्यक्ती आहेत आणि उपराष्ट्राध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचाही समावेश आहे. तुम्हाला त्यांना उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पाहायला आवडेल का?"
 
ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यास उपराष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा बायरन यांनी सार्वजनिकरित्या व्यक्त केली आहे.
 
त्यांनादेखील ट्रम्प यांच्याकडून कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत.
 
एलिस स्टेफानिक
एलिस संसदेत न्यूयॉर्कचं प्रतिनिधित्व करतात. अमेरिकन संसदेत त्या प्रमुख रिपब्लिकन महिला नेत्या आहेत.
 
एलिस 39 वर्षांच्या असून आधी उदार विचारसरणीच्या होत्या आणि ट्रम्प यांच्याबद्दल अनुकूल नव्हत्या. मात्र अलिकडच्या काही वर्षांमध्ये त्या कट्टरपंथीयाच्या बाजूस गेल्या आणि कॅपिटल हिल दंगलीत त्याच ट्रम्प यांच्या सर्वांत विश्वासू समर्थक होत्या असं मानलं जातं.
अलिकडच्या महिन्यांमध्ये अमेरिकेतील महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या ज्यूवादाच्या विरोधातील भावनांचा मुद्दा मांडण्यात त्या आघाडीवर होत्या.
 
ट्रम्प सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
सीबीएसनुसार त्यांनाही ट्रम्प यांच्याकडून संदेश मिळाला आहे.
 
मार्को रुबियो
2016 च्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीमध्ये मार्को रुबियो आणि ट्रम्प एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. मार्को फ्लोरिडातून सिनेटर आहेत.
 
2012 मध्ये मिट रोमनीऐवजी रुबियो यांना पुढं करण्यात आलं होतं.
एका मजूर क्युबन प्रवाशाचे पुत्र असलेल्या मार्को यांनी सुरुवातीलाच ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.
 
रुबियो 52 वर्षांचे आहेत. टीव्हीवरील सादरणीकरणाच्या दृष्टीकोनातून त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे. ते ट्रम्प यांना लॅटिन समाजातून मोठ्या प्रमाणात मतं मिळवून देऊ शकतात.
 
सीबीएसच्या वृत्तानुसार त्यांनाही ट्रम्प यांच्याकडून संदेश आला आहे.
 
क्रिस्टी नोएम
क्रिस्टी नोएम दक्षिण डकोटाच्या गव्हर्नर आहेत. ट्रम्प समर्थकांमध्ये क्रिस्टी नोएम, उपराष्ट्राध्यक्षपदाची पहिली पसंत बनल्या होत्या.
 
त्या 52 वर्षांच्या आहेत. कोविड संकटाच्या काळात फॉक्स न्यूजवर मास्कचा निर्बंध त्यांनी मोडला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.
त्यांच्या जीवनाबद्दलच्या काही आठवणी त्यांनी लिहिल्या होत्या. पण त्यापूर्वीच त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या.
 
त्यांनी स्वतःच्या जीवनाबद्दल केलेल्या लिखानात, शिकारीदरम्यान सांगली साथ देत नसल्यानं त्यांनी त्यांच्या 14 महिन्यांच्या श्वानाला गोळी घातल्याचं सांगितलं होतं. तशीच त्यांनी एका बकरीलाही गोळी घातली होती.
 
यावर चोहोबाजूनं टीका झाल्यानं त्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीपासून दूर गेल्या होत्या.
 
निकी हेली, विवेक रामास्वामी आणि इतर
विवेक रामास्वामी: भारतीय वंशाचे रामास्वामी 37 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म ओहायोमधला असून त्यांनी हार्वर्ड आणि येल इथं शिक्षण घेतलं आहे. जैव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. 2024 च्या प्राथमिक फेरीत त्यांनी धाडसी धोरणांचा अजेंडा आणि उत्साहाच्या जोरावर ट्रम्प समर्थकांवर प्रभाव पाडला. त्यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही.
 
निकी हेली: भारतीय वंशाच्या निकी हेली यांनी दशकभरापूर्वी अमेरिकेतील सर्वात तरुण गव्हर्नर बनून विक्रम केला होता. तेव्हा त्या 39 वर्षांच्या होत्या. रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेरीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. यामुळं ट्रम्प यांची कुचंबणा झाली होती. पण, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांनाच मत देणार असल्याचं निकी हेली म्हणाल्या. भारतातून अमेरिकेत जाऊन दक्षिण कॅरोलिनामधील बामबर्गमध्ये स्थायिक झालेल्या एका पंजाबी शीख कुटुंबात निकी हेली यांचा जन्म झाला आहे. त्यांच्या कुटुंबाचा कपड्यांचा व्यवसाय आहे. जन्माच्या वेळी त्याचं नाव निमरत निकी रंधावा होतं.
बेन कार्सन: ट्रम्प यांच्या आधीच्या सरकारमध्ये कार्सन घरं आणि शहरी विकास विभागात सेक्रेटरी होते. ते पेडियाट्रिक न्यूरो सर्जन आहेत. 2016 ते राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत होते. मात्र, ट्रम्प यांच्यावर खटला सुरू असताना बेन कार्सन दिसले नाहीत. त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.
 
टॉम कॉटन: सीबीएसनुसार दोन वेळा अकांसासचे सिनेटर असलेल्या टॉम यांनादेखील ट्रम्प यांच्या टीमकडून संदेश आला आहे. ते माजी सैनिक आहेत. परराष्ट्र धोरणात ते युद्धाचे समर्थक आहेत. हार्वर्ड लॉ स्कूल मधून त्यांनी पदवी घेतली आहे. कॉटन यांना ट्रम्प यांनी आधी सर्वोच्च न्यायालयासाठीच्या नॉमिनीच्या रुपात पुढे केलं होतं.
 
रॉन डीसेंटिस: 2022 मध्ये फ्लोरिडाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत रॉन यांनी ते ट्रम्प यांचं आंदोलन पुढं घेऊन जाऊ शकतात असं म्हटलं होतं.
 
केटी ब्रिट: अलाबामातून पहिल्यांदा सिनेटर झाल्या आहेत. यावर्षी जो बायडन यांच्या स्टेट ऑफ युनियन भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळं त्या चर्चेत आल्या होत्या.
 
केरी लेक: माजी टीव्ही अँकर असलेल्या केरी यांनी 2020 च्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्याला केरी यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र 2022 मध्ये अरिझोनाच्या गव्हर्नर पदाच्या शर्यतीत त्या मागे पडल्या होत्या.
 
सारा हुकाबी सँडर्स: व्हाइट हाऊसमध्ये दोन वर्षे ट्रम्प यांच्या प्रसारमाध्यम सचिव होत्या.
 
Published By- Priya Dixit