लाल समुद्रात भारतीय मालवाहू जहाजा बुडाले, १३ भारतीय खलाशी सुरक्षित
लाल समुद्रात सागरी सुरक्षेची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. येमेनी सागरी हद्दीजवळ भारतीय ध्वज असलेल्या 'एमएसव्ही फैजे नूर-ए-ओलिया' या मालवाहू जहाजावर हल्ला झाला, ज्यामुळे ते बुडाले. सुदैवाने, जहाजावरील सर्व १४ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले. या घटनेनंतर, भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी सांगितले की, भारतीय ध्वज असलेल्या 'एमएसव्ही फैज नूर ओलिया' या यांत्रिक नौकानयन जहाजावर येमेनी समुद्राजवळ एका क्षेपणास्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाज उलटले आणि नंतर बुडाले.
वृत्तानुसार, राष्ट्रीय प्रतिकार दलाने (एनआरएफ) दावा केला आहे की, स्फोटकांनी भरलेल्या बोटीने जहाजावर हल्ला केला. ही घटना हुथींच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेदाह बंदराच्या दक्षिणेला सुमारे १३ सागरी मैल अंतरावर घडली. तथापि, या आरोपावर हुथी बंडखोर गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सोनोवाल यांनी सांगितले की, जहाजावर १४ कर्मचारी होते, ज्यात १३ भारतीय आणि एका येमेनी नागरिकाचा समावेश होता. येमेनी तटरक्षक दलाने त्या सर्वांना सुखरूप वाचवून मोखा बंदरावर आणले. बचावकार्यानंतर सर्वांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांनी सागरी प्रशासनाच्या महासंचालकांना (DGMA) भारतीय खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि वाचवलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी या प्रदेशातील सर्व संबंधित संस्थांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
Edited By - Priya Dixit
