मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (10:35 IST)

Indonesia: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान प्रचंड हिंसाचारानंतर चेंगराचेंगरी, 129 जण ठार, अनेक जखमी

इंडोनेशियामध्ये शनिवारी फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 129 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पूर्व जावा येथील मलंग रिजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली. वृत्तानुसार, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात सामना सुरू होता. दरम्यान अरेमाचा संघ हरला. त्यानंतर मोठ्या संख्येने चाहते आपला संघ हरताना पाहून मैदानाकडे धावू लागले.
 
यादरम्यान काही लोकांनी खेळाडूंवर हल्ला केला. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोकांनी मैदानात घुसून सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, पोलिस लोकांवर लाठीमार करत आहेत आणि लोकांना नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत आहेत.
 
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, हल्ला, चेंगराचेंगरी आणि गुदमरल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. स्टेडियममध्ये दोन पोलिस अधिकारीही मारले गेले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या सुमारे 180 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, किती जण गंभीर जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्व जावाचे पोलीस अधिकारी निको अफिन्टा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, स्टेडियममध्ये ३४ लोकांचा मृत्यू झाला आणि बाकीचा रुग्णालयात मृत्यू झाला.
 
एका व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक मैदानात घुसून इकडे-तिकडे फुटबॉल फेकताना दिसत आहेत, तेव्हा पोलिस येतात आणि सगळ्यांचा पाठलाग करत होते. यादरम्यान काही लोक जाळीवर लटकलेले दिसतात, तर काही खुर्च्यांकडे धावताना दिसतात.

Edited By- Priya Dixit