गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जुलै 2024 (12:17 IST)

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट्सकडून पुरेसा पाठिंबा, अंतिम उमेदवारी कधी मिळणार?

कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींचा पुरेसा पाठिंबा मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोमवारी संध्याकाळी असोसिएटेड प्रेसने केलेल्या सर्वेक्षणात हॅरिस यांना पक्षातील मतदानाच्या पहिल्या फेरीत नामांकन जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 1,976 पेक्षा जास्त प्रतिनिधींचे समर्थन मिळाले.
अमेरिकेत अध्यक्षीय शासन प्रणाली आहे. त्याठिकाणी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवायची असेल तर त्याआधी संबंधित उमेदवाराला स्वत:च्या पक्षाकडून समर्थन मिळवावं लागतं. ती प्रक्रिया सध्या अमेरिकेत सुरू आहे.
सीबीएस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किमान 27 राज्यांतील शिष्टमंडळांनी हॅरिस यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे.
 
त्यामुळे हॅरिस यांची डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी अंतिम होण्याची दाट शक्यता आहे.
रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्र्म्प यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक आहेत.
 
अशा वेळी या निवडणुकीनं रंजक वळण घेतलं आहे. जो बायडन यांची माघार आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी कमला हॅरिस यांना दर्शवलेला पाठिंबा यामुळं निवडणुकीची रंगत वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या डिबेटमध्ये बायडन यांची कामगिरी पाहता, त्यांच्यावर उमेदवारी सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता.
शेवटी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी (21 जुलै) राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली. तसंच आपलं कमला हॅरिस यांना पाठिंबा असल्याचं जाहीरही केलं.
अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिल्या, कृष्णवर्णीय आणि आशियाई-अमेरिकन वंशाच्या उप-राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचा इथवरचा प्रवास खास आहे.
कमला हॅरिस बायडन यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. गर्भपात आणि कृष्णवर्णियांच्या मुद्द्यांवर त्यांनी अगदी थेट मते मांडलेली आहेत.
 
हॅरिस यांचं भारताबरोबर असलेलं नातंही अगदी खास आहे.
 
दरम्यान, बायडन यांच्या माघारीनंतर कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी बक्कळ देणगींचा ओघ सुरू झाला आहे.
 
पक्षाला पाठिंबा देणाऱ्या लाखो लोकांनी मोठ्या प्रमाणात देणग्या देणं सुरू केलं आहे. हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्यानंतर हा बदल झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
सोमवारी कमला हॅरिस यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्याआधी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्या म्हणाल्या, “आता आपल्याकडे निवडणुकीसाठी फक्त 106 दिवस उरले आहेत. आपल्या सर्वांना भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.”
कार्यकर्त्यांसमोर हॅरिस यांनी त्यांचं अमेरिकेसाठीचं व्हिजन मांडलं. आपला दृष्टिकोन ट्रम्प यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे हे स्पष्टपणे सांगितलं.
 
“देशाबाबत सध्या दोन पातळीवर प्रचार सुरू आहे. एक प्रचार आहे तो भविष्याचा विचार मांडतोय. तर दुसरा निव्वळ भूतकाळाकडे जात आहे. डोनाल्ड ट्रम्प देशाला मागे घेऊन जातायत. पण आम्ही अमेरिकेच्या उज्वल भविष्याचा विचार करतोय. ज्याठिकाणी प्रत्येकाला सामावून घेतलं जाईल.”
 
या दरम्यान, हॅरिस यांनी बायडन यांच्या कामाचं कौतुकही केलं. त्यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणं माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता असं त्यांनी म्हटलं.
 
बायडन यांच्या निर्णयावर अनेकांच्या संमिश्र भावना होत्या. कारण आपण सर्व त्यांचे चाहते आहोत, असंही हॅरिस म्हणाल्या.
आपण पक्षाकडून अंतिम उमेदवारी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेऊ असंही त्या म्हणाल्या.
निवडणुकीतून माघारी घेतल्यानंतर बायडन यांनी हॅरिस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. कारण कोव्हिड-19 मुळे त्यांना विलगीकरणात ठेवलं आहे.
याशिवाय बायडन यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि हॅरिस या राष्ट्रध्यक्षपदासाठी सर्वोत्तम आहेत असंही म्हटलं.
माझ्या निर्णय सगळ्यासाठी आश्चर्यकारक आणि कठीण गेला असावा. पण आताच्या घडीला तो योग्य निर्णय आहे, असंही बायडन यांनी म्हटलं.
आपण दुसऱ्यांदा पदावर राहावं यासाठी सर्वांनी जीव ओतून काम केलं. पण मी कुठंही जात नाहीय. मी या प्रचारात पूर्णपणे झोकून देणार आहे. ज्याप्रकारे तुम्ही माझ्यासाठी परिश्रम घेतले, तसंच कार्य तुम्ही कमलासाठी कराल, असा माझा ठाम विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
“आपल्याला लोकशाही वाचायची आहे आणि ट्रम्प हे देशासाठी धोकादायक आहेत,” या शब्दांत बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.
Published By- Priya Dixit