मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:52 IST)

मलाला युसुफझाईचं झालं लग्न, कोण आहे मलालाचा नवरा?

नोबेल पुरस्कार विजेती मानवी हक्क कार्यकर्ता मलाला युसुफझाईचं लग्न झालं आहे. बर्मिंगहॅम इथे झालेल्या मुस्लीम समाजाच्या समारंभात मलाला आणि असर मलिक विवाहबद्ध झाले. मलाला आणि असर यांचा निकाह झाला. इस्लामिक रीतीरिवाजांनुसार ही लग्नाची प्रक्रिया असते. आयुष्यातला सगळ्यांत मौल्यवान दिवस असल्याचं मलालाने म्हटलं आहे.
 
2012 मध्ये मलालावर तालिबान्यांनी हल्ला केला होता. तिच्या डोक्याला गोळी लागली होती. या हल्ल्यातून ती बचावली. त्यानंतर इंग्लंडमधल्या वेस्ट मिडलँड या ठिकाणी ती स्थायिक झाली.
असर आणि मी आयुष्यभरासाठीचे साथीदार झालो आहोत असं मलालाने ट्वीट केलं आहे. छोटेखानी निकाह समारंभ झाला असं मलालाने म्हटलं आहे. नव्या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत असंही मलालाने लिहिलं आहे
15 वर्षांची असताना मुलींच्या शिक्षण हक्काबद्दल पाकिस्तानमध्ये बोलल्याप्रकरणी मलालाला तालिबानने लक्ष्य केलं होतं.
 
कट्टरतावाद्याने स्वात खोऱ्यातल्या मलालाच्या स्कूलबसमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मलालासह तिच्या मैत्रिणीही जखमी झाल्या.
 
जीवावर बेतलेल्या अशा प्रसंगातून बरी झाल्यानंतर मलाला आणि तिच्या घरचे इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे स्थायिक झाले. हे तिचं दुसरं घर आहे असं मलाला म्हणते. 17व्या वर्षी तिला नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
मलाला सगळ्यांत लहान वयाची नोबेल पुरस्कारविजेती ठरली होती. मलाला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकते. मानवी हक्कांच्या चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती म्हणून तिचं नाव घेतलं जातं.
पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मलालाने अफगाण निर्वासितांना आधार मिळावा यासाठी काम सुरू केलं.
 
डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी तिने अॅपल टीव्हीबरोबर करार केला आहे. व्होग या ब्रिटिश मासिकाच्या कव्हरवर ती झळकली आहे. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी तिचं काम सुरूच आहे.
कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसलं तरी इस्लामिक रीतीरिवाजांनुसार निकाह हा लग्नप्रक्रियेचा भाग मानला जातो.
 
स्वतंत्र लग्नसमारंभही होतो. मलाला-असर यांचा स्वतंत्र लग्नसमारंभ झाला का यासंदर्भात मलालाने माहिती दिलेली नाही.
 
लग्नासंदर्भात मलालाने याआधी आपली मतं व्यक्त केली होती. जुलै महिन्यात व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, "लोकांना लग्न का करायला लागतं हे समजत नाही. जर तुम्हाला आयुष्यासाठी जोडीदार हवा असेल तर तुम्हाला कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या का कराव्या लागतात? तुमचं सहजीवन असंच का सुरू होऊ शकत नाही"?
 
"माझी आई म्हणते- असं काहीही बोलू नकोस. तुला लग्न करावंच लागेल. लग्न सुरेख अनुभव असतो", असं तिने म्हटलं होतं.
 
मलालाच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली. नेटिझन्सनी मलालावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
 
मलालाच्या पतीचं क्रिकेट कनेक्शन
मलाला क्रिकेटची चाहती आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने क्रिकेटचा उल्लेख केला आहे. योगायोगाने मलालाचे पतीही क्रिकेटशी संबंधितच आहेत.
 
ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरचे जनरल मॅनेजर आहेत.
 
लाहोरच्या प्रतिष्ठित एचिसन महाविद्यालयातून असर यांनी कायद्याची पदवी घेतली. यानंतर लाहोर विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर काम करण्याआधी ते पाकिस्तान सुपर लीगमधल्या मुलतान सुलतान्स संघासाठीही कार्यरत होते.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी क्रिकेटच्या विकासाकरता नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना केली होती. माजी क्रिकेटपटू नसीम खान या सेंटरचे संचालक आहेत.
 
माजी खेळाडू साकलेन मुश्ताक यांची इंटरनॅशनल प्लेयर डेव्हलपमेंट हेडपदी नियुक्ती करण्यात आली. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ग्रँड ब्रॅडबर्नला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं.