रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (22:05 IST)

निखिल गुप्ता : अमेरिकेत शीख फुटिरतवाद्याच्या हत्येच्या कटासंदर्भातील आरोपपत्रात काय म्हटले आहे?

murder case
भारतीय नागरिक असलेल्या निखिल गुप्ता याच्यावर एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येची सुपारी देण्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्याबदल्यात 1 लाख डॉलर्स रोख रक्कम दिली असल्याचं अमेरिकन न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
 
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, भारत सरकारसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सूचनेवरून निखिल गुप्ताने अमेरिकेतील एका मारेकऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला एका शीख फुटीरतावादी नेत्याला ठार मारण्याची सुपारी दिली.
 
आरोपपत्रात असा दावा करण्यात आलाय की, निखिल गुप्ताने भारतीय अधिकाऱ्याशी केलेल्या संभाषणात अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत सहभागी असल्याची माहिती दिली होती.
 
आरोपपत्रात असंही म्हटलंय की, निखिल गुप्तावर गुजरातमध्ये एक गुन्हेगारी खटला सुरू आहे. यातून बाहेर पडण्याच्या बदल्यात त्याने न्यूयॉर्कमध्ये एका भारतीय अधिकाऱ्यासाठी हत्या करण्याचं मान्य केलं होतं.
 
आरोप पत्रानुसार, निखिल गुप्ताने ज्या मारेकऱ्याशी संपर्क साधला तो अमेरिकन गुप्तचर विभागाचा एजंट होता.
 
या एजंटने निखिल गुप्ताच्या सर्व हालचाली आणि संभाषण रेकॉर्ड केलं आहे. त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
भारतीय माध्यमातील वृत्तानुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणारा शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नूला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती. पन्नूनेही एक निवेदन प्रसिद्ध करत असं म्हटलंय की, माझ्याविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला जातोय. पन्नूला भारताने दहशतवादी घोषित केलं आहे.
 
पन्नूने स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली असून नुकतंच त्याने एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकीही दिली होती.
 
निखिल गुप्ता याला सुपारी देणारा अधिकारी भारताच्या सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
 
गंभीर आरोप
आरोपानुसार, मे 2023 मध्ये या अधिकाऱ्याने निखिल गुप्ताला अमेरिकेत हत्या घडवून आणण्याचं काम सोपावलं.
 
दस्तावेजानुसार, निखिल गुप्ता भारतीय नागरिक असून तो भारतात राहतो.
 
गुप्ताने मारेकऱ्याशी संपर्क साधण्यासाठी गुन्हेगारीतील एका जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधला. खरं तर, ही व्यक्ती अमेरिकन गुप्तचर संस्थेचा विश्वसनीय स्रोत होती.
 
अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या विश्वसनीय सूत्राने गुप्ताची ओळख अमेरिकन एजन्सीच्या दुसऱ्या एका गुप्तहेर एजंटशी करून दिली.
 
गुप्ता आणि त्या गुप्तहेर एजंटमध्ये एक लाख अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार झाला. त्याबदल्यात हत्या केली जाईल असा करार करण्यात आला.
 
निखिल गुप्ताने न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील त्याच्या संपर्कातील एका दुसऱ्या अमेरिकन एजंटद्वारे पंधरा हजार अमेरिकन डॉलर्स दिले.
 
हत्येसाठी दिलेली ही आगाऊ रक्कम होती. त्याचा व्हीडिओही एजंटने रेकॉर्ड केला असून तो खटल्यात सादर करण्यात आला आहे.
 
आरोपानुसार, हे काम देणाऱ्या भारतीय अधिकाऱ्याने जून 2023 मध्ये गुप्ताला ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे त्याची माहिती दिली. गुप्ताने ही माहिती अमेरिकन एजंटला पुरवली.
 
यामध्ये त्या व्यक्तीचे फोटो आणि घराचा पत्ताही होता.
 
आरोपानुसार, अमेरिकेच्या विनंतीनंतर निखिल गुप्ताला 30 जून 2023 रोजी चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली. लवकरच त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात येईल.
 
प्रकरण नेमकं कुठे फसलं?
आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, भारतीय अधिकाऱ्याने मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात एनक्रिप्टेड अॅप्लिकेशनद्वारे निखिल गुप्ता याच्याशी संपर्क साधला होता.
 
भारतीय अधिकाऱ्याने एका फौजदारी खटल्यात गुप्ताला मदत करण्याचं आश्वासन देत हत्या घडवून आणण्याची जबाबदारी दिली.
 
इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे निखिल गुप्ता आणि भारतीय अधिकारी यांच्यात सतत चर्चा होत होती. याशिवाय दोघेही दिल्लीत भेटले होते.
 
आरोपपत्रात अमेरिकन एजन्सीच्या तपासाचा हवाला देत गुप्ता आणि भारतीय अधिकारी यांच्यात एनक्रिप्टेड अॅपद्वारे सतत बोलणं व्हायचं. या संभाषणादरम्यान गुप्ता दिल्ली किंवा आसपासच्या परिसरात असल्याचं म्हटलं आहे.
 
आरोपपत्रात असा दावा करण्यात आलाय की, 12 मे रोजी गुप्ताला त्याच्याविरुद्धचा फौजदारी खटला मागे घेतल्याचं सांगण्यात आलंय.
 
त्याला असंही सांगण्यात आलं की, इथून पुढे गुजरात पोलिसांकडून कोणीही कॉल करणार नाही.
 
23 मे रोजी, भारतीय अधिकाऱ्याने गुप्ताला पुन्हा आश्वासन दिलं की, त्याचं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणं झालं असून गुजरातमधील प्रकरण संपलेलं आहे. इथून पुढे तुला तिथून कॉल येणार नाही.
 
आरोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय अधिकाऱ्याने गुप्ताची डीसीपीसोबत भेटीची व्यवस्था केली.
 
अधिकाऱ्याकडून विश्वास मिळाल्यानंतर गुप्ता न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्याच्या योजनेसह पुढे आला.
 
यासाठी गुप्ताने अमेरिकेतील गुप्तचर संस्थेच्या एका विश्वसनीय सूत्राशी संपर्क साधला आणि सांगितलं की, "ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे तो न्यूयॉर्क मध्ये राहतो."
 
भारताची प्रतिक्रिया
न्यूयॉर्कमधील हत्येनंतर गुप्ताने एजंटला अमेरिका आणि कॅनडामधील आणखी काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.
 
18 जून रोजी कॅनडातील हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर 19 जून रोजी गुप्ताने अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या एका विश्वसनीय सूत्राला ऑडिओ कॉलवर सांगितलं होतं की, "आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे, तू हे काम आज किंवा उद्या कधीही पूर्ण करू शकतोस. फक्त हे काम लवकरात लवकर पूर्ण कर."
 
त्यानंतर निखिल गुप्ता 30 जून रोजी भारतातून झेक प्रजासत्ताक या देशात गेला. त्याच दिवशी अमेरिकेच्या विनंतीवरून चेक पोलिसांनी त्याला अटक केली.
 
या घडामोडीची माहिती अमेरिकेने भारताला दिली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले आहेत.
 
अरिंदम बागची यांनी गुरुवारी (30 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितलं की, या आरोपपत्रात कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं नाही.
 
बागची म्हणाले, "आम्ही आधीच सांगितलं आहे की, अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावर झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या बाजूने संघटित गुन्हेगारी, दहशतवाद, शस्त्रास्त्र व्यापार आणि इतरांच्या संबंधाबाबत माहिती देण्यात आली होती. यावर तपास करण्यासाठी भारताने एक विशेष तपास समिती स्थापन केली आहे."
 
ते म्हणाले, "भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि अंतर्गत सुरक्षेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भारत सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी एक विशेष तपास समिती स्थापन केली आहे."