1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (12:08 IST)

संभाजीनगरमध्ये हिंसा घडवणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी 8 टीम तयार - पोलीस आयुक्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमी कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादातून जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान, परिसरातील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरणातील तणाव मात्र कायम आहे.
 
कडेकोट पोलीस बंदोबस्तात राम नवमीच्या कार्यक्रमांचं आयोजन सध्या करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर हिंसाचारप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली.
 
तसंच, "या हिंसाचारातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही 8 टीम तयार केल्या आहेत, ज्या हल्लेखोरांना अटक करतील. त्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई सुरु आहे," अशीही माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितली.
 
‘संभाजीनगर दंगलीला MIM आणि भाजप जबाबदार’ – अंबादास दावने
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी भाजप आणि एमआयएमवर आरोप केले आहेत. तसंच संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांवर देखील त्यांनी आरोप केले आहेत.
 
“संभाजीनगरात बुधवारी रात्री घडलेली घटना म्हणजे मागच्या दीड महिन्यापासून हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार सातत्याने 2 गटांकडून सुरू आहे. त्यात एमआयएम, भाजप आणि शिवसेनेतून गेलेल्या गद्दारांचा सामावेश आहे.
 
यादोन्ही गटांनी सातत्याने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सातत्याने भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘दंगल होणार’ अशा प्रकारचं वक्तव्य मागच्या महिनाभरापासून लोक करत होते. मीसुद्धा याबाबत प्रशासनाला आणि पोलीस आयुक्तांना चारदा बोललो. परंतू मला वाटतं याची दखल घेतली गेली नाही,” असं दानवे यांनी म्हटलंय.
 
तसंच “जातीय द्वेष स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी पसरवले जात आहेत. पोलीस आयुक्त याबाबत सुस्पष्ट आणि रोखठोख भूमिका घेण्यात कमी पडले आहेत. या दंगलीला एमआयएम, भाजप आणि त्यांचे मित्र जबाबदार असल्याचं मी जाणिपूर्वक सांगत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात हा राडा झाला. या परिसरात भगवान रामाचं मंदिर आहे.
 
येथे बुधवारी रात्री उशिरापर्यंत राम नवमीच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती.
 
पण, काही कारणाने या परिसरात दोन गटांमध्ये वादाचा प्रसंग उद्भवला.
 
पण, प्रकरण चिघळून हाणामारीपर्यंत प्रकार पोहोचला.
 
त्यानंतर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नंतर काही वेळ तणाव निवळल्याप्रमाणे वाटत होतं. मात्र, अचानक दुसरा एक जमाव तिथे येऊन घोषणाबाजी, दगडफेकीचा प्रकार सुरू झाला.
 
त्यानंतर मात्र दोन्ही गटाकडून खासगी वाहनांना लक्ष्य करण्यास सुरूवात झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली.
 
पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. यादरम्यान, पोलिसांनी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या. तसंच लाठीमार, हवेत गोळीबारही केला.
मात्र, जमावाने अधिकच चिडून पोलिसांविरुद्ध झटापट सुरू केली.
 
जमावाने पोलिसांचीच वाहने पेटवून दिल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडल्याचं दिसून आलं.
 
अखेरीस, पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली. यानंतर जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं.
 
रात्री उशिरा या परिसरात रस्त्यांवर प्रचंड राडारोडा, कचरा, चपलांचा खच पडलेला होता.
 
पोलिसांनी जाळलेली वाहने पहाटेच हटवली. या वाहनांची रस्त्यांवर पसरलेली राखही हटवण्यात आली असून सकाळपासून रस्ता धुण्याचं काम करण्यात येत होतं.
 
पुन्हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात पोलीस आणि SRPF बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
रामनवनी तसेच रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किराडपुरासोबतच शहरातील इतर संवेदनशील परिसरातही कठोर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अफवांना बळी पडू नका
या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
 
ते म्हणाले, “बुधवारी रात्री उशीरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही तरुणांमध्ये किरकोळ वादानंतर मोठ्या संख्येने समाजकंटक लोक किराडपुरा भागात जमले. या लोकांनी परिसरात दगडफेक, वाहने जाळणे असे प्रकार केले. पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला हुसकावून लावलं आहे. सध्या या भागात शांतता आहे. या प्रकरणात कोणतेही पोलीस कर्मचारी जखमी नाहीत.”
 
“आज दिवसभर रामनवमीनिमित्त याठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी शांतता राखून उत्साहात हा सण साजरा करावा. दंगलखोरांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल. शहरात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल,” असं निखिल गुप्ता यांनी म्हटलं.
 
या प्रकरणात सहभागी असलेल्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निखिल गुप्ता यांनी दिला. सध्यातरी कुणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. पण हल्लेखोर कोणत्या भागातील आहेत, याची माहिती मिळाली आहे, लवकरच त्यांना पकडण्यात येईल, असंही गुप्ता म्हणाले.
कारवाई करण्याची नेत्यांची मागणी
या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. विविध राजकीय पक्षांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत म्हटलं, "कोणत्याही ठिकाणची कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस यंत्रणेचं असतं. पोलीस यंत्रणेने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करता कामा नये."
 
"काल पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. पण त्या प्रकरणामागची वस्तुस्थिती काय आहे, त्याचे मास्टरमाईंट कोण आहेत, ते पोलिसांनी शोधलं पाहिजे," असं पवार यांनी म्हटलं.
 
छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. सीसीटीव्ही पाहून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.
 
पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
 
ते म्हणाले, “या प्रकरणात बऱ्याच गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवर दगडफेक झाली. अशा घटनांना शासन पाठिशी घालणार नाही. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”
 
मंत्री अतुल सावे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, “विकृत लोकांनी दंगल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, राममंदिराचं नुकसान झालं नाही. राम मंदिराला कोणतीही इजा झालेली नाही. भक्तांनी अफवांवर विश्वास न ठेवता नेहमीप्रमाणे रामनवमी साजरी करावी.”
 
हा भाजपचा डाव - चंद्रकांत खैरे
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे भाजपचा डाव असल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
 
मी मंत्री असताना याठिकाणी एकही जातीय दंगल झाली नव्हती. त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे. त्यांना जनतेला सांभाळणं जमत नाही. गृहमंत्री कुठे आहेत, असा सवाल त्यांनी विचारला.
 
दंगलीमुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडू शकेल. 2 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे, तो डिस्टर्ब करण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे.
 
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांना उचकवण्यासाठीही असे प्रकार केले जातात. या सगळ्यामागे भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यमंत्री भागवत कराड आणि खासदार इम्तियाज जलील हे मित्र आहेत. दोघांनी मिळूनच याचं प्लॅनिंग केलं आहे, असा आरोप खैरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांचं शांतता राखण्याचं आवाहन
"छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, काही नेते जाणीवपूर्वक राजकीय वक्तव्ये करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी तो बंद करावा, सर्वांनी शांतता राखावी," असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
 
फडणवीस म्हणाले, "संभाजीनगरमध्ये भडकवणारी वक्तव्ये करून तिथे परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. अशा स्थितीत नेत्यांनी कसं वागलं पाहिजे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कुणीही चुकीच्या प्रकारची वक्तव्ये करू नये. सगळ्यांनी शांतता पाळावी."
 
"आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीही नाही," असंही त्यांनी म्हटलं.
 
"आरोप करणारे वक्तव्ये करणं म्हणजे किती संकुचित विचार करून राजकीय हेतूने बोललं जात आहे, त्याचा आपल्याला परिचय येत आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं.
 
Published By- Priya Dixit