1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (10:02 IST)

भारताने अमेरिकी खलिस्तानी नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा अमेरिकेचा आरोप, निखिल गुप्ताला अटक

Indians
शिखांसाठी स्वतंत्र देशाच्या मागणीला समर्थन देणाऱ्या अमेरिकन नागरिकाला न्यूयॉर्कमध्ये ठार मारण्याचा कथित कट उधळल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.
 
आज बुधवार 29 नोव्हेंबर रोजी अमेरिकेने या कथित कटाचा आरोप निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिकावर ठेवला आहे.
 
निखिल गुप्ता यांच्यावर कथित ‘कटाअंतर्गत पैसे घेऊन हत्ये’चा आरोप आहे. फिर्यादी पक्षाने आरोप केला आहे की, याचा कट भारतात रचण्यात आला होता.
 
त्याला हे काम भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्यानं दिल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
 
न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये कथित लक्ष्य केलेल्या व्यक्तीचे नाव नव्हते.
 
या कटाच्या संबंधात अमेरिकेने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यावेळी भारत सरकारने चौकशी सुरू केल्याचं यापूर्वी सांगितलं होतं.
 
या आरोपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काही वेळातच व्हाईट हाऊसने सांगितलं की त्यांनी हा मुद्दा भारत सरकारकडे सर्वाxत वरिष्ठ पातळीवर उपस्थित केला होता. त्यावर भारतीय अधिकाऱ्यांनी 'आश्चर्य आणि चिंता' व्यक्त केली होती, असंही त्यांनी म्हटलंय.
 
“शीखांसाठी स्वतंत्र राज्याच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाची न्यूयॉर्कमध्येच हत्या करण्याचा कट आरोपीने भारतातून रचला," असं यूएस अॅटर्नी डेमियन विल्यम्स यांनी सांगितलं आहे.
 
अमेरिकेच्या भूमीवर अमेरिकन नागरिकांच्या हत्येचे प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
शीख हे धार्मिक अल्पसंख्याक आहेत. भारताच्या लोकसंख्येत त्यांची संख्या सुमारे 2 टक्के इतकी आहे. काही गटांकडून शिखांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी झालेली पाहायला मिळते.
 
खलिस्तान किंवा वेगळ्या राष्ट्रासाठी पाश्चात्य देशांतील शीख फुटीरतावाद्यांच्या मागणीवर भारत सरकारने अनेकदा तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
आरोप काय आहेत?
याचिकाकर्त्यांनी लावलेल्या आरोपानुसार “गुप्ता ड्रग्स आणि शस्त्रांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तस्करीत सामील होता. त्यानंतर भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने त्याला कथितरित्या टार्गेटची हत्या करण्याच्या कामावर ठेवलं,” म्हणजेच त्याला हत्येची सुपारी देण्यात आली.
 
याचिकाकर्त्यांनी आरोप लावले की त्या अधिकाऱ्याने गुप्ता यांना आदेश दिले की हत्येशी संभावित योजनेसंदर्भात एका भारतीय अधिकाऱ्यांशी त्याने संपर्क साधावा.
 
तसंच तो एका मारेकऱ्याला भेटणार होता जो हे काम करणार होता.
 
कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांत सांगितलं की या व्यक्तीने स्वत:ला एक अंडरकव्हर अधिकारी असल्याचं सांगितलं आणि तो 80 लाख रुपये घेऊन हत्या करणार होता.
 
गुप्ताला जूनमध्ये एका सहकाऱ्यांमार्फत 15 हजार डॉलर देण्यात आले.
 
निखिल गुप्ताला चेक प्रजासत्ताकच्या अधिकाऱ्यांनी 30 जूनला अटक केली होती. त्याआधी काही दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध अमेरिकन अधिकाऱ्यांनी सुरुवातीचं आरोपपत्र दाखल केलं होतं.
 
कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार अमेरिकेच्या विनंतीवरून अद्यापही ते चेक प्रजासत्ताकच्या ताब्यात आहेत.
 
मात्र कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ज्या व्यक्तीच्या हत्येचा कट रचला होता त्या व्यक्तीच्या नावाची माहिती दिलेली नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते तो व्यक्ती शीख फुटीरतवादी गटाचा अमेरिकेतील नेता आहे.
 
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
अमेरिकेत एका शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नांच्या दाव्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले की यासंदर्भात एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
 
बागची माहिती देताना म्हणाले, “द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावर चर्चा करताना संगठित गुन्हेगारी, बंदूक चालवणाऱ्या, दहशतवादी आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही अमेरिकेबरोबर काही माहिती शेअर केल्याचं आधीच सांगितलं आहे.”
 
“भारत अशा प्रकारची माहिती अतिशय गांभीर्याने घेतो हेही आम्ही सांगितलं आहे. कारण आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि त्याच्याशी निगडीत विभाग त्याची चौकशी आधीपासूनच करत आहे.”
 
ते म्हणाले, “यासंदर्भात हे सूचित केलं जात आहे की 18 नोव्हेंबरला एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती जेणेकरून सर्व बाजूंची नीट माहिती घेतली जाईल.”
 
अमेरिका आणि कॅनडा च्या आरोपांवर भारताची प्रतिक्रिया वेगवेगळी
दरम्यान प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार भारताने कॅनडा आणि अमेरिकेने लावलेल्या आरोपांवर वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
 
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 18 सप्टेंबरला त्यांच्या देशाच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित करत भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते.
 
भारताने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ते आरोप खारिज केले होते.
 
या आरोपाला दुजोरा देणारा एकही पुरावा कॅनडाने सादर केला नसल्याचं भारताचं म्हणणं होतं.
 
फायनान्शिअल टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार व्हाईट हाऊसच्या एका प्रवक्त्याच्या हवाल्याने दावा केला आहे की अमेरिकेत एक शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणाची भारताला उच्च स्तरावर दखल घ्यायला लावली आहे.
 
मात्र या प्रकरणावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने साधी आणि संतुलित प्रतिक्रिया दिली आहे.
 
कॅनडाने निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा सार्वजनिकरित्या एकही पुरावा अद्याप सादर केलेला नाही.
 
भारताच्या तपास संस्थांनी निज्जरला आतंकवादी घोषित केलं होतं. 18 जूनला ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील एका गुरुद्वाराच्या बाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती.
 
निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये झालेल्या राजनैतिक वादात भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली होती.
 
गेल्या महिन्यात मात्र भारताने चार श्रेणींमध्ये कॅनडाच्या नागरिकांसाठी ही सेवा पुन्हा बहाल केली होती. मात्र अद्यापही दोन्ही देशातले संबंध सुधारलेले नाहीत.
 
गुरपतवंत सिंह पन्नू कोण आहेत?
गुरपवंत सिंह पन्नू हे खलिस्तानी समर्थक अमेरिकन वकील आहेत. त्यांचं वय 40 ते 50 च्या दरम्यान आहे. त्याचा संबंध अमृतसरच्या खानकोट गावाशी आहे. त्याचे वडील महिंदर सिंह पंजाब राज्य शेतकी विपणन बोर्डात कर्मचारी होते.
 
पन्नू यांनी 1990च्या दशकात पंजाबमधून कायद्याची पदवी घेतली आणि सध्या ते अमेरिकेत वकील आहेत. ते नेहमीच कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थक कार्यक्रमात दिसतात.
 
न्यूयॉर्कस्थित खलिस्तान समर्थक संघटना सिख्स फॉर जस्टिसचे ते संस्थापक आहेत आणि त्यांना खलिस्तानी नेते म्हणून ओळखलं जातं.
 
पन्नू यांनी नुकताच सर्व शीखांना एअर इंडियाच्या विमानांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. असं करणं धोकादायक होऊ शकतं, असा त्यांचा दावा होता.
 
या प्रकरणी NIA ने भारतात पन्नूवर FIR दाखल केला आहे.