अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा गुरू अयमान अल्-जवाहिरी ठार
अमेरिकेने अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ठार केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रविवारी (31 जुलै) अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.
"अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने जवाहिरीचे हात रंगले होते. आता लोकांना न्याय मिळाला आहे. हा कट्टरतावादी आता जगात राहिला नाहीये," असं बायडन यांनी म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीमध्ये उभा होता, तेव्हाच ड्रोनच्या सहाय्याने दोन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. जवाहिरीच्या कुटुंबातील लोकही त्यावेळी घरात उपस्थित होते. मात्र, कोणालाही इजा पोहोचली नसल्याचंही अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
बायडन यांनी म्हटलं आहे की, त्यांनी अल्-कायदाच्या या 71 वर्षीय नेत्याविरोधात निर्णायक हल्ल्याला मंजुरी दिली होती. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल्-कायदाचा नेतृत्व जवाहिरीकडेच होतं. अमेरिकेवर 9/11ला झालेल्या हल्ल्याची योजनाही लादेन आणि जवाहिरी यांनीच आखली होती. जवाहिरीला अमेरिका 'मोस्ट वॉन्टेड दहशतवादी' मानत होती.
बायडन यांनी म्हटलं की, जवाहिरीच्या मृत्यूने 2001मध्ये 9/11ला झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. तालिबानने अमेरिकेची ही मोहीम आंतरराष्ट्रीय नियमांचं आणि सिद्धांताचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.
जवाहिरी आय सर्जन होता. इजिप्तमध्ये इस्लामिक जिहादी ग्रुप बनविण्यासाठी जवाहिरीने मदत केली होती. अमेरिकेने मे 2011मध्ये ओसामा बिन लादेनला ठार केलं होतं आणि त्यानंतर अल् कायदाची धुरा अल् जवाहिरीकडे आली.