बाडमेरमध्ये हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले, दोन्ही वैमानिकांचा मृत्यू, शहिदांना श्रद्धांजली  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  बाडमेरमधील बैतू पोलीस स्टेशन हद्दीतील भीमडा गावाजवळ गुरुवारी रात्री हवाई दलाचे मिग विमान कोसळले. ही घटना रात्री 9 वाजताची आहे. अपघातग्रस्त विमानाचा अवशेष अर्धा किलोमीटरपर्यंत पसरला होता. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.
				  													
						
																							
									  
	 
	गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान जमिनीवर पडताच त्याला जोरात आग लागली. विमान जिथे पडले तिथे जमिनीत 15 फूट खड्डा पडला होता. ज्वाळा दूरवर दिसत होत्या. रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी लोकबंधू यादव यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाचे विमान-21 क्रॅश झाले आहे. घटनास्थळावरून दोन जणांचे मृतदेह सापडले.
				  				  
	
	भारतीय हवाई दलाने सांगितले की, हे विमान गुरुवारी संध्याकाळी राजस्थानच्या उत्रलाई विमानतळावरून प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते. रात्री 9.10 च्या सुमारास बाडमेरजवळ ते कोसळले. यामध्ये दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	याबाबत लष्कराने खंत व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी दोन्ही वैमानिकांची नावे उघड केली नाहीत. पायलटच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे लष्कराने म्हटले आहे. यासोबतच अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
				  																								
											
									  
	
	मिळालेल्या माहितीनुसार, विमान क्रॅश होताच त्याला आग लागली. त्यामुळे त्याचा धूर सुमारे एक किलोमीटर दूर पसरला होता. या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे, माहिती मिळताच स्थानिक प्रशासनही अपघातस्थळी पोहोचले.