पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू
गुरुवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेतील एका महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला होता, परंतु त्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिला चांगल्या उपचारांसाठी डानो धांधाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिठी शहरातील जिल्हा रुग्णालयात नेले जात होते.
गुरुवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. थारपारकर जिल्ह्यातील नगरपारकर परिसरात एका रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे रुग्णवाहिकेला आग लागली, ज्यात महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे, जिला प्रसूतीनंतरच्या आरोग्यविषयक गुंतागुंतीमुळे रुग्णालयात नेले जात होते. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार रुग्णवाहिकेचा चालक वाहनामध्ये ऑक्सिजन सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. तथापि, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावरच कोणत्या परिस्थितीत स्फोट झाला आणि त्यात काही निष्काळजीपणा होता का, हे स्पष्ट होईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १० जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

