शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (13:54 IST)

राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर पाकिस्तानात लोक काय म्हणत आहेत?

ayodhya
उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पाकिस्तानातील सामान्य लोकांपासून ते अतिविशिष्ट लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
पाकिस्तान सरकारने हा कार्यक्रम पार पडल्यानंतर एक निवेदन जारी करून यावर टीका केली आहे.
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात लिहिलं, 'कट्टरतावाद्यांच्या एका गटाने 6 डिसेंबर 1992 ला अतिशय जुनी मशीद पाडली होती. भारताच्या न्यायव्यवस्थेने या निंदनीय कार्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना सोडून दिलं हे अतिशय दुर्दैवी आहे. इतकंच नाही तर त्या जागेवर एक मंदिर उभारण्याची परवानगी दिली.'
 
पाकिस्तानच्या अनेक वृत्तपत्रांनी पाकिस्तान सरकारच्या या प्रतिक्रियेच्या बातम्या छापल्या आहेत.
 
इतकंच नाही तर पाकिस्तानातील सोशल मीडिया युझर्सनेसुद्धा या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
 
पाकिस्तान सरकार काय म्हणालं?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संबंधी एक निवेदन जारी केलं आहे.
 
त्यात म्हटलं आहे,
 
“अयोध्येत बाबरी मशीद पाडून तिथे राम मंदिराचं निर्माण आणि प्राणप्रतिष्ठेचा पाकिस्तान निषेध करत आहे. तिथे असलेली पुरातन मशीद 6 डिसेंबर 1992 ला कट्टरतावाद्यांच्या एका गटाने पाडली. सुप्रीम कोर्टाने दोषींना तर सोडलंच, इतकंच नाही तर ज्या जागी मशीद होती तिथे मंदिर निर्माणालाही परवानगी दिली.”
 
“गेल्या 31 वर्षांचा घटनाक्रम आज प्राणप्रतिष्ठेपर्यंत पोहोचला आहे. हे सगळं भारतात वाढत असलेल्या बहुसंख्यवादाचं द्योतक आहे. यातून भारतीय मुसलमानांना राजकीय आणि सामाजिक पातळीवर बाजूला ढकलण्याचा प्रयत्न दिसतो.”
 
“मशीद पाडलेल्या जागी राम मंदिर उभारणं हा भारताच्या लोकशाहीवर उमटलेला मोठा डाग आहे आणि तो पुढचा बराच काळ टिकणार आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शादी ईदगाह यांच्यासह अनेक मशिदींची यादी वाढत आहे. त्याही पाडण्याचा धोका वाढला आहे.”
 
“भारतात हिंदुत्वाच्या विचारधारेची आलेली लाट सामाजिक सौख्य आणि अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात वाढत जाणाऱ्या इस्लामोफोबिया, द्वेषमुलक भाषण आणि द्वेषमुलक गुन्ह्यांची नोंद घ्यायला हवी. संयुक्त राष्ट्र आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांना भारतात मुस्लिमांच्या वारसास्थळांना कट्टरतावादी गटांकडून वाचवण्याच्या कवायतीत त्यांची भूमिका निभावायला हवी.”
 
सोशल मीडिया युझर्स काय म्हणाले?
पाकिस्तानी सोशल मीडिया युझर जमील बलोच यांनी एक्स वर लिहिलं, “आपल्याकडे एकेकाळी मोहम्मद बिन कासीम, गोहरी, गजनवी, आणि आलमगीर यांच्यासारखे शासक होते. आज आपल्याकडे बिनकण्याचे शासक आहेत, ज्यांनी मोदी यांना बाबरी मशीद तोडायला आणि त्याच्या भूभागावर मंदिर बांधायला परवानगी दिली.”
 
हरीस डार नावाच्या एका व्यक्तीने एक्स वर लिहिलं, “भारत सरकारच्या नाकाखाली बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिराच्या निर्माणाने पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की भारत एक हिंदूराष्ट्र झालं आहे.
 
नोशी सत्ती नावाचे एक ट्विटर युझर लिहितात, “हा मुसलमानांच्या इतिहासातला अतिशय काळा दिवस आहे. शहीद झालेल्या मशिदीच्या जागी मंदिर तयार झाले तेही तथाकथित सगळ्यांत मोठी लोकशाही असलेल्या देशात."
 
पाकिस्तानी पत्रकार रहीम नसर यांनी लिहिलंय, “धार्मिक कट्टरतावाद भारताच्या सुरक्षेला आणि स्थिरतेला नुकसानकारक आहे. हिंदूंमध्ये असलेला अतिराष्ट्रवाद भारताला अराजकता आणि धार्मिक अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलत आहे.”
 
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने या प्रसंगी आनंद व्यक्त केला आहे.
 
त्याने एक्सवर लिहिलं, “अनेक काळापासूनची प्रतीक्षा पूर्ण झाली. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली.”
 
पाकिस्तानच्या वर्तमानपत्रात काय छापून आलं आहे?
पाकिस्तानच्या प्रतिष्ठित जियो टीव्हीने त्यांच्या बातमीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना केलेल्या विनंतीचा उल्लेख केला आहे.
 
बातमीनुसार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे आग्रह केला आहे की, 'भारतात असलेली मुस्लीम वारसास्थळं कट्टरतावाद्यांपासून वाचवावी तसंच भारतीय अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारांचं रक्षण करावं.'
 
गेल्या काही तासांपासून काही पाकिस्तानी ट्विटर युझर्स एक व्हीडिओ शेअर करत आहे. त्यात एक व्यक्ती चर्च सारख्या इमारतीच्या गच्चीवर चढून तिथे एक झेंडा लावताना दिसत आहे.
 
हा व्हीडिओ शेअर करत सोशल मीडिया युझर्स शंका व्यक्त करत आहेत की येणाऱ्या काळात ख्रिश्चन समुहाला टार्गेट करण्यात येण्याची शक्यता आहे.
 
पाकिस्तानातले प्रसिद्ध लेखक आणि बीबीसीचे माजी पत्रकार मोहम्मद हनीफ लिहितात, “इथे पाकिस्तानात द्विराष्ट्रवादाच्या विचारधारेच्या घोषणा देणारे लोकही टाळ्या पिटत आहेत आणि म्हणत आहेत की आम्हाला शंभर वर्षांआधीच माहिती होतं की हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकत नाहीत."
 
“पाकिस्तानातील प्रसिद्ध शायर फहमीदा रियाज यांनी काही काळ भारतात व्यतित केला आहे. जेव्हा त्यांनी भारतात हिंदुत्वाचं आक्रमण होताना पाहिलं तेव्हा त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली. त्यात त्या म्हणतात की अरेच्या तुम्ही तर अगदी आमच्यासारखे निघाले. जेव्हा तुमची स्वप्नं स्वर्गवासी होतील तेव्हा आम्हाला पत्र पाठवत रहा.”
 
“आज जर फहमीदा रियाज असत्या तर त्यांनी रामाचं भजन ऐकलं असतं. त्यात मारणं, कापणं आणि पाकिस्तानात बाबराचं मंदिर तयार करण्याच्या घोषणा ऐकल्या असत्या तर त्या म्हणाल्या असत्या की, तुम्ही स्वर्गात आहात, फक्त पत्र ठेवून घ्या.”