मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2024 (14:16 IST)

जो बायडन यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, कमला हॅरिस यांना मिळू शकते संधी?

अमेरिकेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतायत. सध्यातरी जो बायडन विरुद्ध ट्रंप अशी लढत होणार असल्याचं दिसत आहे.
 
पण डेमोक्रॅटिक पक्षाचे उमदेवार जो बायडन यांच्या उमेदवारीविषयी सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे.
 
रविवारी (7 जुलै) डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्षीय उमेदवारीविषयी चर्चा केली. त्यावेळी बायडन यांच्या उमेदवारीवरही चर्चा झाली.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्याआधी दोन उमेदवारांमध्ये आमने-सामने प्रेसिडेन्शियल डिबेट होतात. यापैकी पहिल्याच डिबेटमध्ये जो बायडन यांच्या कामगिरीवर शंका व्यक्त करण्यात आली आहे.
 
तसंच, 81 वर्षीय बायडन यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
शुक्रवारी (5 जुलै) ABC न्यूज चॅनेलला दिलेल्या प्राइम टाइम मुलाखतीमुळे त्यांच्या भविष्याबद्दल आणखी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
 
उमेदवारीविषयी उलटसुलट चर्चा असतानाही बायडन यांनी मात्र पेनसिल्व्हेनिया राज्यात दोन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या.
 
पेनसिल्व्हेनिया हे अमेरिकन निवडणुकीतील 'स्विंग स्टेट' म्हणून ओळखलं जातं.
 
दरम्यान, बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारीविषयी संमिश्र चर्चा होतेय.
 
बायडन यांची उमेदवारी कायम ठेवणं हे पक्षासाठी रिस्क असल्याचं काहीजण म्हणतायत, तर शेवटच्याक्षणी आपला उमेदवार बदलला तर विरोधी पक्षाकडून आणखी टीका होईल, अशी भीती इतर डेमोक्रॅट सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
रविवारी (7 जुलै) हकीम जेफ्रिस यांनी बायडन यांच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावली होती.
 
या बैठकीत उपस्थित असलेल्यांपैकी चार नेत्यांच्या मते, बायडन यांनी या निडणुकीतून माघारी घ्यावी, अशी प्रतिक्रिया CBS या वृत्तसंस्थेला दिली आहे.
 
याशिवाय डेमोक्रॅटिक पक्षाच्या आणखी तीन नेत्यांनीही अशी इच्छा व्यक्त केली आहे.
 
गेल्या आठवड्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उच्च पदस्थ नेत्यांनी टीव्ही मुलाखती दिल्या. तेव्हा त्यांनीही बायडन यांच्या उमेदवारीवर शंका व्यक्त केली.
 
काहींच्या मते, बायडन हेच कायम राहिल्यास नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पक्षाचा पराभव होऊ शकतो. परंतु इतरांचे म्हणणे आहे की त्यांच्या जागी इतर उमेदवार हे अनोळखी चेहरे आहेत.
 
‘डेमोक्रॅटिक पक्षाने पुन्हा नव्या दमाने सुरुवात करावी’
पहिल्याच प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये बायडन यांनी अगदी सुमार कामगिरी केलीय.
 
त्यामुळे त्यांना बाजूला करून नवीन चेहरा घेतला तर पक्षाच्या प्रचाराला नव्या दमाने सुरुवात करता येईल, अशी सध्या चर्चा सुरू आहे.
 
बायडन यांच्या कट्टर समर्थकांनी पण राष्ट्राध्यक्षांचं वय, आरोग्य आणि मानसिक स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्याची ताकद जो बायडन यांच्याकडे आहे की नाही याबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाल्याचं कॅलिफोर्नियातील डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी म्हटलं आहे.
 
शिफ यांनी NBC न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, ‘बायडन यांनी आपली उमेदवारी थेट माघारी घ्यावी’, असं म्हणता म्हणता राहिले. आतापर्यंत पाच डेमोक्रॅट्स नेत्यांनी सार्वजनिकपणे अशी भूमिका घेतली आहे.
 
शिफ यांच्यामते बायडन यांनी एका तटस्थ व्यक्तीकडून सल्ला घ्यावा. त्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा.
 
"जो बायडन यांची अविश्वसनीय कारकीर्द आणि त्याउलट डोनाल्ड ट्रम्प यांची उथळ कामगिरी पाहता सध्या बायडन हे ट्रंप यांना चितपत करतील. पण राष्ट्राध्यक्षांची एकच गोष्ट सध्या काळजीत टाकणारी आहे. ती म्हणजे त्यांचा वृद्धापकाळ,” असं शिफ सांगतात.
 
बायडन हे 81 वर्षांचे आहेत, तर ट्रम्प नुकतेच 78 वर्षांचे झाले आहेत. दोन्ही उमेदवारांचे वय मतदारांमध्ये चर्चेचा मुद्दा बनला आहे.
 
दुसरीकडे नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून बायडन हे त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी झाल्याचं समोर आलं आहे.
 
या सर्व कारणांमुळे आपण जर नवीन उमेदवार दिला तर पुन्हा एकदा चांगली सुरुवात करता येईल, असं अनेकांना वाटत आहे.
 
बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीतील धोरणांवरही सध्या टीका होतेय.
 
ज्या प्रकारे त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था हाताळली. तसंच देशाच्या दक्षिण सीमेवरील स्थलांतरितांचा मुद्दा हाताळला, यावरून त्यांना घेरलं जातंय.
 
नवीन गड्याची जोखीम कोण घेणार?
बायडन यांना पक्षातील सर्व नेत्यांकडूनच विरोध होतोय, असं नाहीये.
 
तर काही डेमोक्रॅटिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार बायडन यांची उमेदवारी बदलून त्यांच्या जागी नवीन उमेदवार जास्त जोखिमीचा ठरू शकतो.
 
त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी द्यायची याविषयी स्पष्टता नसल्याचं सध्या समजत आहे.
 
बायडन यांच्याजागी कुणाला उमेदवारी द्यायची आणि ते ट्रंप यांना कशी टक्कर देतील, हा पण एक प्रश्न आहे. बायडन यांना आतापर्यंत यश मिळालं आहे. त्यामुळे नवा मार्ग निवडण्याआधी काहीजणांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
 
“बायडन यांचं वय झालंय हे खरंय. आधीसारखं ते मुद्देसूद बोलू शकत नसतील. एअर फोर्स विमानाच्या पायऱ्या चढू शकतील, तेवढी ताकद त्यांना मिळावी. पण इथे कुणाची धोरणं अधिक यशस्वी झाली आहेत याकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे,” असं सिनेटर बर्नी सँडर्स यांनी म्हटलं आहे.
 
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम म्हणाले, "आपण उमेदवार बदलावा ही तर विरोधी पक्षाची इच्छा आहे. यातून त्यांना आमच्यामध्ये अंतर्गत लढाई सुरू आहे, अशी प्रतिमा निर्माण करायला मदत होईल. पण आपण ते टाळायला पाहिजे.”
 
बायडन यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या मते, “आता उमेदवारी बदलणं म्हणजे पक्षात अंतर्गत कलह आहे, असं दाखवण्यासारखं होईल.”
 
कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळू शकते?
अमेरिकेतील ओहायो राज्याचे माजी सिनेटर टिम रायन यांनी बायडन यांच्या जागी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव पुढं केलं आहे.
 
"कमला हॅरिस यांची उमेदवारी आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो," असं टिम यांनी न्यूजवीकसाठी लिहिलेल्या एका लेखात नमूद केलं आहे.
 
आतापर्यंत हॅरिस यांनी बायडन यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. पण 59 वर्षांच्या हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
 
कमला हॅरिस 2020 मध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या आहेत. त्यांना डेमोक्रॅट पक्षाची कार्यप्रणाली चांगली माहितीये.
 
हॅरिस यांना त्यांंचं काम चांगलंच माहीत आहे, असं त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.