गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 3 जुलै 2024 (16:58 IST)

ऑनलाईन बुक सेलर, 72 कोटी डॉलर्सचा तोटा ते जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी; ॲमेझॉनचा प्रवास

amazon
आजच्या काळात आयटी आणि ई-कॉमर्स कंपन्यांचा बोलबाला आहे. मात्र, जेव्हा इंटरनेट आणि ऑनलाइन क्षेत्राची सुरुवात झाली होती, तेव्हा हे क्षेत्र इतकं विस्तारेल आणि सर्वव्यापी होईल याचं आकलन फारच थोड्या लोकांना होतं.
 
ॲमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेसॉस हे अशाच मोजक्या लोकांपैकी एक. आज ॲमेझॉन ही कंपनी ई-कॉमर्सच्या क्षेत्रावर राज्य करते आहे तर जेफ बेसॉस हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात.
 
ॲमेझॉनच्या झेपेची ही कहाणी..
2000 मध्ये बीबीसी न्यूजनाइटच्या एका खास मुलाखतीत ॲमेझॉनचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी सांगितलं होतं की, "कधीकाळी ॲमेझॉन खूपच तोट्यात होती."
 
मात्र त्यानंतर जवळपास 25 वर्षांनी ॲमेझॉनचा समावेश जगातील अशा मोजक्या कंपन्यांमध्ये केला जातो ज्यांचे बाजारमूल्य दोन ट्रिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे.
 
8 जून 2000 ला 'बीबीसी न्यूजनाइट'च्या डेस्कवर बीबीसीचे प्रेझेंटर आणि पत्रकार जेरेमी वाइन अडखळत ई-कॉमर्स बाजारावर एक रिपोर्ट सादर करत होते.
त्यांच्या टेबलावर त्या रात्री पाहुणे म्हणून 36 वर्षांचे जेफ बेझोस हजर होते. त्या वेळेस जेफ बेझोस ॲमेझॉन डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
 
बीबीसीच्या ताज्या घडामोडींच्या प्रमुख कार्यक्रमातील त्या मुलाखतीच्या वेळेस ॲमेझॉननं आपल्या व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा गाठला होता. त्या वर्षी जवळपास अर्ध वर्ष संपेपर्यत डॉटकॉम बूमचा एक आर्थिक बुडबुडा तयार झाला होता आणि हा बुडबुडा आता फुटण्याच्या तयारीत होता.
 
ॲमेझॉनच्या शेअर्समध्ये झाली होती मोठी घसरण
इतकंच काय ॲमेझॉनसहित डझनावारी ऑनलाइन कंपन्या आणि व्यवसाय याच डॉटकॉम भोवती भिरभिरत होत्या. आता या सर्वांना डॉटकॉम बुडबुड्याच्या परिणामांची जाणीव देखील होऊ लागली होती.
जेरेमी वाइन यांच्या बातमीनुसार 1999 मध्ये ॲमेझॉननं 1.6 अब्ज डॉलरची विक्री केली होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याच वर्षी कंपनीला 72 कोटी डॉलरचा निव्वळ तोटा झाला होता.
 
ॲमेझॉनच्या शेअर्सच्या किंमतीतसुद्धा चढउतातर होत होते. डिसेंबर 1999 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 113 डॉलर प्रति शेअर इतकी होती. तर जून 2000 मध्ये कंपनीच्या शेअरच्या किंमतीत चांगलीच घसरण होत ती 52 डॉलर प्रति शेअर पर्यत खाली आली होती.सुरूवातीच्या काळात ॲमेझॉनला चांगलं यश मिळाल्यानंतर सुद्धा 2000 च्या दशकाच्या सुरूवातीला डॉटकॉम बूममुळे कंपनीला मोठा फटका बसला होता.
 
जेरेमी वाइन आपली मुलाखत सुरू करताना म्हणाले, "लोक म्हणायचे की ॲमेझॉन अद्भुत आहे. मात्र आता ते म्हणतात की ॲमेझॉनला इतका तोटा होतो आहे ही आश्चर्याची गोष्ट नाही का?"
जेफ बेझोस बिनधास्तपणे उत्तर देत म्हणाले, "ठीक आहे, सध्या जरी आम्ही तोट्यात चालणारी कंपनी म्हणून ओळखले जात असू. मात्र आमच्या धोरणाबाबत आम्ही सजग आहोत आणि ही गुंतवणूक करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची वेळ आहे."
 
त्या मुलाखतीनंतर 24 वर्षांनी आणि ॲमेझॉनची सुरूवात झाल्यानंतर 30 वर्षांनी, आजसुद्धा जेरेमी वाइन यांना आपल्या मुलाखतीचे काही खास भाग लक्षात आहेत.
 
बेझोस यांची आठवण करताना वाइन यांनी इन हिस्ट्रीला सांगितलं, "मी काही खूपच अवघड प्रश्न विचारले होते. मात्र बेझोस यांनी त्या प्रश्नांना बगल दिली. मुलाखतीदरम्यान ते कधीही घाबरले नाहीत."
 
वाइन पुढे सांगतात, "मला आठवतं की मला वाटलं की हा माणूस खूपच दिलखूश आहे. त्याच्यात खूप ऊर्जा आहे. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला नेहमीच वाटतं की बेझोस यांना तेव्हापासूनच हे माहित होतं की ते पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार आहेत."
 
ॲमेझॉनची परिकथा
जेफ बेझोस यांनी 5 जुलै 1994 ला वॉशिंग्टनमधील बेलेव्यूमध्ये एका गॅरेजमध्ये आपल्या कंपनीची सुरूवात केली होती. वर्षभरानंतर त्यांनी एक वेबसाइट देखील लॉंच केली होती.वर्ल्ड वाइड वेब (WWW)ही संकल्पना त्यावेळेस नवीनच होती. त्यावेळेस याला वेब 1.0 म्हणून ओळखले जायचे.त्या वेळेस काही मोजक्या कंपन्यांनाच वेबवर आधारलेल्या व्यवसायाच्या क्षमतेचं आकलन होतं.
 
ॲमेझॉनची सुरूवात एक ऑनलाइन बुक सेलर म्हणून झाली होती. कंपनी त्यावेळेस ऑनलाइन स्वरुपात पुस्तके विकत होती. अॅमेझॉननं त्यावेळेस स्वत:चा प्रचार जगातील सर्वात मोठं ई-बुक कलेक्शन म्हणून केला होता.
ॲमेझॉन नदीप्रमाणेच कंपनीचं ई-बुक कलेक्शन देखील प्रचंड होतं.
 
कंपनीनं पुस्तकांवर दुप्पट लक्ष केंद्रित केलं. जेणेकरून वेगानं विस्तारणाऱ्या ई-कॉमर्स बाजारपेठेत तिला एक बडी कंपनी म्हणून स्थान मिळवता येईल.
 
ॲमेझॉन कंपनी त्यावेळच्या डॉटकॉम बूमच्या लाटेवर स्वार होती. 1990 च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेतील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे डॉटकॉम बूम वेगानं वाढत होतं. तंत्रज्ञान कंपन्यांची सुरूवात आणि विस्तार होण्याचा तो काळ होता. साहजिकच त्याविषयी प्रचंड अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र त्या वस्तुनिष्ठ नव्हत्या. म्हणूनच त्याला डॉटकॉम बूम असं म्हणतात.
 
शेअर मार्केटमध्ये या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीमुळे डॉटकॉमची तेजी आली होती. या तेजी किंवा वाढीमुळे इंटरनेटवर आधारित कंपन्यांच्या एका नव्या पिढीचा सुद्धा जन्म झाला होता.
 
ॲमेझॉन बनली जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी
वेबसाईट लाँच झाल्यानंतर चार वर्षांनी, ॲमेझॉन जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.
आधी पुस्तके विकणाऱ्या ॲमेझॉनने आपल्या वेबसाईटवरून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी आणि उपकरणं इत्यादी इतर वस्तू देखील विकणं सुरू केलं.2000 च्या अखेरपर्यत ॲमेझॉनकडे जवळपास एक कोटी 70 लाखांपेक्षाही जास्त ग्राहक होते.तोपर्यत ॲमेझॉनच्या बाजारमूल्यात घवघवीत वाढ झाली होती. कंपनीचा आयपीओ आणताना जितके बाजारमूल्य होते त्यापेक्षा ते 50 पटीनं वाढलं होतं.

जेफ बेझोस यांना जगप्रसिद्ध टाइम मासिकानं 1999 च्या 'पर्सन ऑफ द ईयर'नं देखील नावाजलं होतं.
टाइम मासिकानं बेझोस यांना 'किंग ऑफ सायबरकॉमर्स' म्हटलं होतं.
अर्थात त्यानंतरच्या वर्षांमध्ये ॲमेझॉनला कर आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीसंदर्भात टीकेला देखील तोंड द्यावं लागलं होतं.याशिवाय 2000 मध्ये ॲमेझॉनला मिळालेल्या आश्चर्यकारक यशानंतर सुद्धा या कंपनीकडे शंकेनं पाहणारे अनेकजण होते.ॲमेझॉनवर टीका करणारे त्या कंपनीसंदर्भात विनोददेखील करत असत. 2000 च्या न्यूजनाइटवरील आपल्या मुलाखतीत बेझोसनं त्या विनोदांचाही उल्लेख केला होता.
 
ॲमेझॉनवर टीका करणारे म्हणायचे की ॲमेझॉन डॉट कॉम आणि ॲमेझॉन डॉट बॉम्ब.
ॲमेझॉन तेव्हा तोट्यात सुरू होती. त्याची चेष्टा करण्यासाठी टीकाकार उपहासानं कंपनीला अॅमेझॉन डॉट ऑर्ग असंसुद्धा म्हणायचे.
कंपनीला नफा होत नाही असं यातून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मुलाखतीदरम्यान जेरेमी वाइन बेझोसना म्हणाले होते, "तुमच्याकडे जेव्हा 2 कोटी ग्राहक असतात तेव्हा पैसे गमावणं ही काही मोठी गोष्ट नसते."
त्यांची ही टिप्पणी ऐकून बेझोस सुद्धा जोरजोरात हसले होते.
वाइन यांनी केलेल्या टिप्पणीवर चेष्टेच्या स्वरात उत्तर देताना बेझोस म्हणाले होते, "ठीक आहे, आमच्याकडे ते कौशल्य आहे."
अर्थात यानंतर थोडं गंभीर होत बेझोस म्हणाले होते, "मात्र प्रत्यक्षात इथं आम्ही गुंतवणूक करत आहोत."
सुरूवातीपासूनच कंपनीच्या विस्तारावर होतं जेफ बेझोसचं लक्ष
डॉटकॉम आणि ई-कॉमर्स क्षेत्रात अस्थिरता, चढउतार असतानाच जेफ बेझोस मात्र सुरूवातीपासूनच कंपनीच्या विस्ताराबाबत विचार करत होते.
 
1999 मध्ये ॲमेझॉननं जगभरातील जवळपास 40 लाख चौ. फूट जागा विकत घेण्यासाठी गुंतवणूक केली होती.
 
यामध्ये लंडनबाहेर असणाऱ्या वितरण केंद्रासाठी केलेल्या गुंतवणुकीचा सुद्धा समावेश होता. हे वीस लाख चौ. फूट क्षेत्रफळाचं वितरण केंद्र यूकेमधील कंपनीचं सर्वात मोठं वितरण केंद्र होतं.
बेझोस यांचं म्हणणं होतं की "कमी किंमतीत जितकं शक्य असेल तितकं जास्तीत जास्त सामान निवडण्याच्या आणि विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या धोरणामुळे कंपनीचं नुकसान झालं."

बेझोस म्हणाले होते, "ग्राहकांची सतत वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्यावर 2000 मध्ये कंपनीचं लक्ष केंद्रित होतं."
मात्र येणाऱ्या काळात बाजारपेठेवरील आपली पकड मजबूत करण्याच्या हेतूनं बेझोस यांनी अत्यंत हुशारीनं कंपनीच्या तोट्याचा उपयोग देखील कंपनीच्या फायद्यासाठी करून घेतला.
 
मात्र डॉटकॉम क्रॅशमुळे देखील ॲमेझॉनचं खूप नुकसान झालं. ग्राहक सर्वात आधी या धोरणामुळं अॅमेझॉन त्या सर्वात वाईट काळातसुद्धा तग धरू शकली.जेरेमी वाइन यांनी 2024 मध्ये त्या मुलाखतीबद्दल सांगितलं की, "मला फक्त इतकं आठवतं की बेझोस स्टुडिओतून बाहेर पडत असताना मी त्यांना पाहिलं आणि माझ्या मनात विचार आला की या माणसाचं पुढचं भवितव्य काय?"
 
"बेझोस यांनी सर्वात वाईट काळातून नुकतंच आपल्या कंपनीला वाचवलं होतं. डॉटकॉम बबलचं संकट खूपच कठीण होतं. 2007 मध्ये आलेल्या बॅंकिंग क्रॅश किंवा सबप्राईम संकटाआधीचा हा काळ होता. डॉटकॉम बबलमुळे अनेक कंपन्या रसातळाला गेल्या होत्या, गुंतवणुकदारांसह अनेकजण दिवाळखोर झाले होते."
ॲमेझॉनची बाजारपेठेतील भक्कम स्थिती

जेरेमी वाइन यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या 24 वर्षांनंतर, अॅमेझॉन आज ई-कॉमर्स क्षेत्रातील मातब्बर कंपनी बनली आहे. ई-कॉमर्स आणि क्लाउड कंम्प्युटिंगच्या क्षेत्रात कंपनीची स्थिती फक्त भक्कमच नाही तर कंपनीचं वर्चस्वदेखील आहे.
 
न्यूजनाइटवरील मुलाखतीनंतर अनेक महिन्यांनी, ॲमेझॉनची बाजारपेठेतील भक्कम स्थितीनं त्याचं मार्केटप्लेस लॉंच केलं होतं. या सुविधेमुळे थर्ड पार्टी व्यवसायांना ॲमेझॉनची बाजारपेठेतील भक्कम स्थितीचे दरवाजे खुले झाले. म्हणजेच आता इतर विक्रेते किंवा व्यावसायिकांना त्यांचा माल ॲमेझॉनची बाजारपेठेतील भक्कम स्थितीच्या वेबसाईटवर विकता येणार होता.
 
2005 मध्ये आपल्या नियमित ग्राहकांसाठी कंपनीनं ॲमेझॉन प्राइम लॉंच केलं. तेव्हापासून ॲमेझॉन प्राइमच्या व्यवसायाचा वेगानं विस्तार झाला आहे. आता 2024 मध्ये कंपनीच्या युजर्सची संख्या 1 कोटी 80 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.प्राइम सदस्यत्वासाठीच्या युजर्सची संख्या 1 कोटी 80 लाखांच्या पुढे नेण्यासाठी कंपनी सज्ज आहे.
 
ॲमेझॉननं 2023 मध्ये 574 अब्ज डॉलरचं उत्पन्न कमावलं आहे. याशिवाय ई-कॉमर्स व्यवसायाव्यतिरिक्त कंपनी इतरही क्षेत्रात व्यवसायाचा विस्तार करते आहे.यात फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, स्ट्रीमिंग सर्व्हिस, फुल-सर्व्हिस किराणा स्टोअर आणि एआय सहाय्यक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.याचबरोबर ॲमेझॉननं ट्विच इंटरअॅक्टिव्ह, होल फूड्स आणि ऑडिबल सह अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं आहे.
 
जेफ बेझोसबद्दल वाइन सांगतात, "मुलाखतीनंतर मी विचार केला की यामुळेच मी व्यावसायिक नाही. कारण मी जर पुस्तकांचं व्यवसाय सुरू केला असता तर मी विचार केला असता की ठीक आहे, माझं इथं व्यवस्थित चाललं आहे. मी आता यावर निवृत्त होऊ शकतो, मला फक्त इतकंच करायचं आहे."
 
वाइन पुढे सांगतात, "मी थक्क झालो होतो की बेझोस यांनी इतक्या लवकर ॲमेझॉनचं रुपांतर 2.0, 3.0 आणि 4.0 मध्ये केलं होतं. हा बदल इतका होता की माझ्या किराण्याच्या वस्तू देखील इथूनच विकत घेतो आहे. ते एक अफलातून व्यावसायिक आहेत. ॲमेझॉननं आपलं आयुष्य किती व्यापलं आहे ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे."
 
कोरोना काळात बेझोस झाले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
कोरोना संकटाच्या काळात 2020 मध्ये सर्वत्रच ऑनलाइन सेवांचा बोलबाला झाला होता. या काळात बेझोस यांच्या व्यवसायाचा मोठा विस्तार झाला आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीदेखील बनले.
 
सध्या मात्र जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीचा विचार करता बेझोस, इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नाल्ट हे आलटून पालटून पहिला क्रमांक पटकावत असतात.मात्र लक्षात घ्यायची बाब म्हणजे ॲमेझॉनला अजूनही तोट्याचा सामना करावा लागतो आहे.2022 मध्ये ॲमेझॉन शेअर बाजारात नोंदणी असलेली पहिली अशी कंपनी बनली जिला एक ट्रिलियन डॉलरचा तोटा सहन करावा लागला होता.
 
वेतन आणि वाईट कार्यसंस्कृतीमुळे यूकेतील कोवेंट्री येथील ॲमेझॉनच्या गोदामात संप सुद्धा झाला आहे.तर अमेरिकेत सुद्धा ॲमेझॉनला युनियन विरोधात संघर्षाला तोंड द्यावं लागतं आहे.बेझोसनं 2021 मध्ये ॲमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. कंपनीची जबाबदारी त्यांनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अॅंडी जेसी यांच्याकडे दिली होती.
 
तेव्हापासूनच बेझोस यांनी आपलं सर्व लक्ष 'पॅशन प्रोजेक्ट'वर केंद्रित केलं आहे. म्हणजेच त्यांना विशेष रस असलेल्या क्षेत्रांतील व्यवसायांवर केंद्रित केलं आहे.
 
बेझोस यांच्या या पॅशन किंवा आवडीमध्ये अवकाश क्षेत्राशी निगडीत 'ब्लू ओरिजिन' ही कंपनी आणि 'द वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राचा समावेश आहे. 2013 मध्ये त्यांनी हे विकत घेतलं होतं.
 
बेझोस यांनी चॅरिटेबल प्रोजेक्टवर म्हणजे सेवाभावी कामावर लक्ष देण्याचीही घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त हवामान बदल आणि विषमता यासारख्या मुद्द्यांसंदर्भात काम करण्यासाठी आपली संपत्ती दान करण्याचीही योजना बेसोस बनवत आहेत.
मात्र बेझोस यांच्या सेवाभावी किंवा परोपकारी कामांवर टीका देखील होत आली आहे. काही लोकांनी बेसोस दांभिक असल्याचं म्हटलं आहे.
ॲमेझॉनच्या कथित वाईट कार्यसंस्कृती आणि करांसदर्भातील वर्तनाकडे ते बोट दाखवतात.
काही लोक ॲमेझॉन आणि बेझोसबद्दल काय विचार करतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करणंसुद्धा कठीण आहे.
मात्र, ॲमेझॉननं आपल्या बहुतांश आर्थिक बाबींमध्ये अस्तित्व नोंदवत आपलं ठसा उमटवला आहे या गोष्टीला नाकारता येणार नाही.
Published By- Priya Dixit