शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 मे 2022 (10:37 IST)

पुतिन यांची कथित 'गर्लफ्रेंड' अलिना कबाएव्हा अडचणीत? कोण आहे अलिना कबाएव्हा?

putin daughter
"प्रत्येक कुटुंबाकडे युद्धाकाळात घडलेली अशी एक गोष्ट असते. आपण त्या गोष्टी विसरू नयेतचं पण त्या आपल्या पुढच्या पिढीलाही त्या गोष्टी सांगाव्यात." रशियाची 'सिक्रेट फर्स्ट लेडी' म्हणून ओळख असणाऱ्या अलिना कबाएव्हाचं हे मत आहे.
 
अलिना सध्या प्रसिद्धीच्या झोतात येण्यामागचं कारण म्हणजे अमेरिकेने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या मुलींसह त्यांच्या निकटवर्तीयांवर निर्बंध लादले आहेत. आता पुढचा नंबर अलिना कबाएव्हा यांचा असण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या मुलींसह त्यांच्या निकटवर्तीयांवर निर्बंध लादल्यानंतर आता पुतिन यांच्या कथित 'प्रेयसी'वर निशाणा साधला जाऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
या पार्श्वभूमीवर अलिना कबाएव्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
 
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पुढच्या फेरीत निशाणा साधण्यात येऊ शकणाऱ्यांच्या प्रस्तावित यादीत अलिना कबाएव्हा यांच्या नावाचा समावेश केल्याचे समजते.
 
अलिना ही एक जिम्नॅस्ट आहे. तिने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. यानंतर तिने सत्ताधारी पक्ष युनायटेड रशिया पक्षात प्रवेश केला. तसंच रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृह ड्यूमावरही तिची निवड झाली आहे.
 
माध्यम संस्थांमध्ये मोठा हिस्सा असलेल्या एका होल्डिंग कंपनीचीही ती प्रमुख आहे.
 
क्रेमलिनचा प्रचार करणं तसंच पुतिन यांचे निकवर्तीय म्हणूनही अलिनाचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये असू शकतं. त्या कदाचित मीडिया बॉसपेक्षा जास्त असू शकतात.
 
2008 मध्ये पुतिन यांनी कथित प्रेयसीसंदर्भातील दावे फेटाळले होते. परंतु काही रिपोर्ट्सनुसार त्यांना मुलं आहेत.
 
अलिना कबाएव्हा कोण आहे?
द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका पुतीन यांची कथित 'प्रेयसी' आणि माजी ऑलिम्पिक जिम्नॅस्ट अलिना कबाएव्हा हिच्यावर निर्बंध लादण्याच्या तयारीत होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा हा निर्णय बारगळला.
 
या पाठीमागचं कारण असं सांगण्यात येतंय की, अलिनावर लादलेले निर्बंध पुतीन स्वतःवरील वैयक्तिक हल्ला मानू शकतात आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना धक्का लागू शकतो.
 
दरम्यान, व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सोमवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत, अमेरिका जाणीवपूर्वक रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या कथित प्रेयसीवर निर्बंध लादत नाहीये अशाप्रकारचे दावे फेटाळले आहेत.
 
रशियन नेत्या आणि माजी जिम्नॅस्ट अलिना कबाएव्हा यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, या प्रश्नावर साकी म्हणाले, "आम्ही लावण्यात आलेल्या निर्बंधांचा सातत्याने आढावा घेत आहोत."
 
कोण आहे अलिना कबाएव्हा?
अलिना ही एक जिम्नॅस्ट आहे. तिने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. तिने वयाच्या 13 व्या वर्षी जिम्नॅस्टमध्ये पदार्पण केलं आणि 1998 मध्ये तर पहिलं जागतिक विजेतेपद (रोप) पटकावलं.
 
तदनंतर 2001 आणि 2002 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपमध्येही तिने अनेक पदकं मिळवली. 2003 मध्ये पुन्हा एकदा तिने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. तिच्या कारकिर्दीत ती डोपिंग प्रकरणातही अडकली होती. मात्र, तिला त्याचा असा काही फटका बसला नाही.
 
2005 नंतर तिने हळुहळू राजकारणात प्रवेश केला त्याबरोबर तिचं नाव पुतीन यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. युनायटेड रशिया पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृह ड्यूमावरही तिची निवड झाली आहे. 2014 मध्ये, सोची ऑलिम्पिकमध्ये मशाल घेऊन जाणाऱ्या खेळाडूंपैकी ती एक होती.
 
द मॉस्को टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अलिना क्रेमलिन-समर्थित मीडिया ग्रुप 'द नॅशनल मीडिया ग्रुप'ची प्रमुख आहे. मात्र पाश्चात्य निर्बंधांमुळे तिचे नाव एप्रिलमध्ये वेबसाइटवरून काढून टाकण्यात आलं.
 
मॉस्को टाईम्सने असं ही एक वृत्त दिलं होतं की, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि युरोपमधील अधिकाऱ्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं की, 2015 मध्ये अलिना गरोदर होती आणि प्रसूतीसाठी ती स्वित्झर्लंडला गेली होती. त्यानंतर, 2019 मध्ये तिने मॉस्कोमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्याची माहिती आहे. मात्र पुतिन यांनी कधीही या गोष्टी मान्य केल्या नाहीत.
 
मॉस्कोमध्ये 'अलिना फेस्टिव्हल' च्या हेडलाईन्स
'द मॉस्को टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, अलीना गेल्या शनिवारी रशियाच्या राजधानीत आयोजित 'अलिना फेस्टिव्हल'मध्ये दिसली होती. मे महिन्यात रशियाच्या 'व्हिक्टरी डे' निमित्ताने आयोजित होणाऱ्या 'जिमनॅस्ट एक्झिबिशन'साठी ती तिथे आली होती.
 
याच दरम्यान ती म्हणाली की, "प्रत्येक कुटुंबाकडे युद्धातली अशी एक गोष्ट असते, जी विसरता येत नाही. त्या गोष्टी आपण विसरू तर नयेच पण आपल्या पुढच्या पिढीला ही सांगाव्यात."
 
यावेळी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाला ज्या टीकेला सामोरं जावं लागलं त्याबाबत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून रशियन जिम्नॅस्ट, जज आणि प्रशिक्षक यांच्यावरील बंदीबाबत ती म्हणते की, "यातून आमचाचं विजय होईल."
 
'डेली मेल'ने दिलेल्या बातमीनुसार, अलिना या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे, ती स्वित्झर्लंड किंवा सायबेरियातील बंकरमध्ये लपून बसल्याच्या अफवांना आळा घालण्यात आला आहे.
 
'व्हिक्टरी डे' च्या या कार्यक्रमात शेकडो मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान 'झेड' सिम्बॉल देखील दाखवण्यात आला. हा सिम्बॉल रशियाने युक्रेनवर जो हल्ला केलाय त्याच्या समर्थनाचं प्रतीक बनलाय.