गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (15:09 IST)

राणी एलिझाबेथ 59 वर्षांत पहिल्यांदा संसदेच्या अभिभाषणाला अनुपस्थित राहणार

queen Elizabethan
इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यावेळी संसदेच्या अभिभाषणाच्या वेळी उपस्थित राहणार नाहीत, असं बकिंगहॅम पॅलेसने जाहीर केलं आहे.
 
1963 नंतर या भाषणाला अनुपस्थित राहण्याची राणी एलिझाबेथ यांची ही दुसरी वेळ आहे. या भाषणात सरकारच्या योजना मांडल्या जातात. मंगळवारी राणी एलिझाबेथ यांच्या जागी प्रिन्स चार्ल्स हे भाषण करतील.
 
राणी एलिझाबेथ यांचं वय आता 96 वर्षं आहे आणि त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे त्यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.
 
राणी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील, असं सोमवार संध्याकाळपर्यंत बकिंगहॅम पॅलेस तर्फे सांगण्यात येत होतं. मात्र आता त्या या कार्यक्रमाला संसदेत उपस्थित राहणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. शारीरिक हालचाल करण्यात वारंवार अडथळे येत असल्याचं कारण यामागे सांगितलं आहे.
 
राणी एलिझाबेथ यांनी सल्लागारांबरोबर चर्चा केल्यानंतर हा कटू निर्णय घेतला असल्याचं एका निवेदनात सांगितलं आहे.
 
त्यांच्या जागी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्स विलियम्स यांना संसदेचं कामकाज सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
 
इंग्लंडच्या शासकाचा मुकूट मात्र संसदेत आणला जाईल. राणी एलिझाबेथ यांचं सिंहासनही रिकामं असेल. तसंच, प्रिन्स चार्ल्स, कॅमिला, आणि प्रिंस विलियम्स तिथल्या खासदारांच्या समोर बसतील.
 
नुकत्याच होऊन गेलेल्या इस्टर वेळीसुद्धा राणी एलिथाबेथ अनुपस्थित होत्य. Maundy Service या कार्यक्रमाला त्या अनुपस्थित होत्या. यावर्षी त्या कोणत्याही राजेशाही पार्ट्या आयोजित करणार नाहीत, अशी घोषणाही त्यांनी केली.
 
मात्र या आठवड्यातल्या इतर नियोजित कार्यक्रम पार पडतील, असं सांगण्यात येत आहे. त्यात पंतप्रधान आणि सल्लागारांच्या भेटींचा समावेश आहे. या भेटी फोन किंवा व्हर्च्युअल माध्यमातून होतात. तसंच काही खासगी गाठीभेटीसुद्धा त्या घेतील.
 
ब्रिटिश संसदेचं अधिवेशन तिथल्या संसदीय वर्षाची सुरुवात असते. त्यात राणी एलिझाबेथ सरकारचं धोरण आणि कायदे ठरवतात.
 
हे अभिभाषण राणी एलिझाबेथ करतात. गेल्या 70 वर्षांच्या काळात त्यांनी 1959 आणि 1963 मध्ये गरोदरपणामुळे या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या.
 
त्या वेळी हे भाषण चान्सलरने दिलं होतं. यावेळी राजकुमार राणीऐवजी उभे राहतील.
 
या कार्यक्रमाच्या रुपरेषेत गेल्या काही वर्षांत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात राणी पारंपरिक मुकुट परिधान करणार नाही किंवा त्या समारंभासाठी असलेला विशिष्ट ड्रेस सुद्धा त्या घालत नसत. गेल्या वर्षी कोव्हिडमुळे हा समारंभ अत्यंत मर्यादित स्वरुपात आयोजित करण्यात आला होता.
 
59 वर्षांत या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची राणी एलिझाबेथ यांची ही पहिलीच वेळ आहे.
 
राष्ट्रप्रमुख आजारी असल्यामुळे प्रिंस चार्ल्स आणि प्रिंस विलियम्स काऊंसिलर या नात्याने हे कर्तव्य निभावतील.
 
जेव्हा राष्ट्रप्रमुख आजारी असतील तेव्हा दोन काऊंसिलर तिथे उपस्थित असणं आवश्यक असतं.
 
तिथे चार काऊंसिलर असतात. प्रिंस अँड्र्यू यांनी राज्यकारभाराच्या कामाचा राजीनामा दिला आहे. प्रिंस हॅरी आता अमेरिकेत असतात त्यामुळे तेही राज्यकारभाराचा भाग नाही.
 
राणीतर्फे या अधिवेशनाची सुरुवात करण्याचे अधिकार काऊंसिलरला दिले जातात.
 
पंतप्रधानांच्या कार्यालयातर्फेही एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय, "राणी एलिझाबेथ यांच्या इच्छेचा पंतप्रधानांनी मान ठेवला असून प्रिंस ऑफ वेल्स हे अभिभाषण करणार यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो."