रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (19:37 IST)

ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्यापेक्षा लोकप्रिय, तरीही या 3 कारणांमुळे हरले

यूकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून ऋषी सुनक बाहेर पडले आहेत. अखेरच्या फेरीत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे त्या आता यूकेच्या पुढच्या पंतप्रधान होणार आहेत.
हुजूर पक्षांतर्गत झालेली पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडीची निवडणूक ऋषी सुनक जिंकले असते तर ते यूकेचे पहिले अश्वेत आणि भारतीय वंशाचे पंतप्रधान झाले असते. या निवडणुकीपर्यंत पोहोचणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे नेते आहेत.
 
यूकेमध्ये आतापर्यंत प्रिती पटेल आणि सादिक खान यांच्यासारखे अनेक भारतीय वंशाचे लोक मंत्री, महापौर किंवा इतर महत्त्वाच्या राजकीयपदापर्यंत पोहोचले आहेत. ऋषी सुनक स्वतः 2020 मध्ये यूकेचे अर्थमंत्री झाल्यानंतर देशातले नंबर 2चे नेते झाले होते.
 
यूकेच्या संसदेत वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना जेवढं प्रतिनिधीत्व मिळतं तेवढं भारतीय संसदेतसुद्धा मिळत नाही. पण, ऋषी सूनक यांची निवड त्यांच्या वंशामुळे मात्र ऐतिहसिक ठरली असती, असं नीलम रैना यांना वाटत. डॉ. नीलम यूकेतल्या मिडलेक्स विद्यापिठात अध्यापनाचं काम करतात.
 
मॉरिशस, घाना, आर्यलंड, पोर्तुगाल, फिजी या सारख्या देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं आहे. ही यादी बरीच मोठी आहे. जवळपास 30 देशांमध्ये भारतीय वंशांचे लोक सत्तापदं भूषवत आहेत.
 
जर 42 ऋषी सुनक जिंकले असते तर त्यांचंसुद्धा नाव या यादीमध्ये समाविष्ट झालं असतं. कोव्हिडच्या काळात अर्थमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी यूकेची अर्थव्यवस्था सांभाळली होती त्याची खूप स्तुती झाली होती. त्यांचा आज विजय झाला असता तर यूकेच्या समाजात विविधतेला किती वाव आहे हे अधोरेखित झालं असतं.
 
1. वंश
ऋषी सुनक धर्मानं हिंदू आहेत. 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांनी पदाची शपथ गीतेला स्मरून घेतली होती. ऋषी यांच्या विजयासाठी यूकेतल्या स्थानिक हिंदूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना आणि होम हवन केलं होतं.
 
निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना बीबीसी इंडियाची एक टीम यूकेमध्येच होती. त्यावेळी नरेश सोनचाटला यांनी आम्हाला दिलेली एक प्रतिक्रिया महत्त्वाची होती. "ऋषी पंतप्रधान व्हावेत अशी माझी इच्छा आहे. पण ते पंतप्रधान होणार नाहीत. बहुदा त्यांचा रंग हे त्याचं कारण असावं," असं ते म्हणाले होते.
 
हुजूर पक्षाचे 1,60,000 सदस्य आहेत. जे पक्षाचे देणगीदारसुद्धा आहेत. या सदस्यांमध्ये 97 टक्के सदस्य गौरवर्णीय आहेत. तर 50 टक्के पुरूष आहेत. तर 44 टक्के सदस्य हे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
 
त्यापैकी 81,326 लोकांनी लिझ ट्रस यांना मतदान केलं तर 60,399 जणांनी ऋषी सुनक यांना मतदान केलं.
 
हुजूर पक्षाच्या तरुण सदस्यांचा ऋषी यांना पाठिंबा असल्याचं दिसून येतंय. तर लिझ यांना वसस्क सदस्यांची पसंती असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात बीबीसीच्या टीमशी बोलताना हुजूर पक्षाच्या काही वयस्क सदस्यांनी त्यांना ऋषी आवडत असल्याचं सांगितलं होतं. पण तरीही ते लिझ यांनाच मतदान करण्यावर ठाम होते.
 
यातून हे स्पष्ट होतं की हुजूर पक्ष अजूनही अश्वेत पंतप्रधानासाठी तयार नाही, असं निरिक्षकांचं मत आहे.
 
2. आर्थिक धोरण
अर्थात ऋषी सूनक यांच्या पराभवाचं वंश हे एकमेव कारण नाही. पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही नेत्यांच्या आर्थिक धोरणांचा अंदाज पाहून मतदान केल्याचंसुद्धा बोललं जातंय.
 
संजय सक्सेना लंडनच्या बर्कलेज् बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. ते सांगतात, "मी या देशात गेली 20 वर्षं राहत आहे. मी या देशात वांशिक विविधता पाहिली आणि अनुभवली आहे. भारतीय लोक मोठमोठ्या पदांवर पोहोचल्याचं मी पाहिलं आहे.
 
"फक्त वंश आणि रंगामुळे ऋषी यांचा पराभव झाला असं मला नाही वाटत. लिझ यांनी करकपातीची केलेली घोषणा लोकांना आवडलेली असावी. पक्ष सदस्यांनासुद्धा ती आवडलेली आहे. कारण जास्त कराचा बोजा त्यांच्यावरसुद्धा पडला असता. जे बहुतांश मध्यमवर्गीय आहेत," सक्सेना सांगतात.
 
दुसरीकडे ऋषी सुनक यांनी मात्र त्यांचा पहिला जोर हा अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर असेल असं स्पष्ट केलं होतं. कर कपात करून लोकांना तात्काळ कुठलाही दिलासा देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. "मी लोकांना खोटी आश्वासनं देऊन त्यांची दिशाभूल करू इच्छित नाही. लोकांशी प्रतारणा करण्यापेक्षा मी हार पत्करेन," असं ऋषी यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
 
ऋषी खूपच श्रीमंत आहेत त्यामुळे ते गरिब आणि मध्यमवर्गीयांच्या समस्या समजून घेऊ शकत नाहीत, अशी यूकेमध्ये सामान्य धारणा आहे. एका सर्वेनुसार यूकेतल्या सर्वांत 250 श्रीमंत कुटुंबांमध्ये त्यांच्या कुटुंबाचा समावेश होतो. पण जन्माने मात्र ते श्रीमंत नाहीत. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे.
ऋषी यांनी त्यांच्या बेवसाईटवर लिहिलं आहे, "मी शाळेत जावं म्हणून माझ्या आईवडिलांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यामुळेच मला विंचेस्टर कॉलेज, ऑक्सफोर्ड आणि सॅनफोर्ड विद्यापिठांमध्ये शिकता आलं."
 
3. बोरिस यांच्या पाठीत खंजीर खूपसला?
हुजूर पक्षाच्या काही लोकांना ऋषी यांनी बोरिस जॉन्सन यांच्या पाठित सुरा खूपसल्याचं वाटतं. ऋषी यांनी जुलैमध्ये बोरिस यांच्या मंत्रिमंडळातून अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याविरोधात राजीनामा सत्र सरू झालं होतं. ज्याची परिणती बोरिस यांना पद गमावण्यात झाली.
 
बोरिस यांनी ऋषी यांना राजकारणात बरंच प्रोत्साहन दिलं, असं अनेकांना वाटतं. पण, आता मात्र बोरिस ऋषी यांच्यावर बरेच नाराज आहेत. ऋषी यांनी बोरिस यांच्याशी नंतर सपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असं ऋषी यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केलं होतं.
 
हुजूर पक्ष जरी अश्वेत पंतप्रधान निवडण्यासाठी तयार नसला तरी लोकांच्या मनात मात्र तसं असल्याचं दिसून सध्या तरी दिसून येतंय. तरुणांमध्ये ऋषी यांची लोकप्रियता लिझ यांच्यापेक्षा नक्कीच जास्त जाणवते.
 
ही जर सार्वत्रिक निवडणूक असती तरी ऋषी नक्की जिंकले असते, असं राजकीय जाणकारांना वाटतं. अर्थात आता ऋषी आणि त्यांच्या समर्थकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे.
 
ऋषी सुनक कोण आहेत?
ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंजच्या साऊदम्पटनमध्ये झाला होता. त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय आणि दक्षिण आशियाई वंशाचा खासदार युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होता.
 
सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या. पण ऋषी सुनक फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळले.
 
त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
 
ब्रिटनचे पंतप्रधान कसे निवडले जातात?
जगातली एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आणि भारताशी असलेलं ऐतिहासिक-सांस्कृतिक नातं यांमुळे युकेमधल्या निवडणुकांविषयी भारतातही एरवी उत्सुकता असते. पण युकेचा पंतप्रधान होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
 
भारतात जसं लिखित राज्यघटना किंवा संविधान आहे, तसं युकेमध्ये नाही. पण तिथेही पंतप्रधान होण्यासाठी आधी तुम्ही खासदार असणं आवश्यक असतं. युकेमध्ये खासदारकीसाठी निवडणूक कोण लढवू शकतं? याविषयीची माहिती त्यांच्या संसदेच्या वेबसाईटवर दिली आहे.
 
त्यानुसार, खासदारकीसाठी पात्रता अशी ठरते:
 
उमेदवाराचं वय 18 वर्षं पूर्ण असायला हवं.
तो किंवा ती ब्रिटिश नागरिक असायला हवा म्हणजे इंग्लड-स्कॉटलंड-वेल्स-नॉर्दन आयर्लंडचा नागरिक असायला हवा.
रिपब्लिक ऑफ आयर्लंड तसंच कॉमनवेल्थ देशांचे नागरिक असलेली व्यक्तीही ब्रिटनच्या खासदारकीची निवडणूक लढवू शकते. पण त्यांच्याकडे युकेमध्ये अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी असायला हवी.
या व्यक्तीचा जन्म युके किंवा कॉमनवेल्थमध्येच झालेला असावा, अशी सक्ती मात्र नाही.
त्यामुळेच न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले बोरीस जॉन्सन युकेचे पंतप्रधान बनू शकले.