शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (11:07 IST)

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 126 वा : इंग्लंड युक्रेनला करणार 1 अब्ज पौंडाची मदत

युनायटेड किंग्डमने युक्रेनला देत असलेली मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युके युक्रेनला 1 अब्ज पौंडाची लष्करी मदत करणार आहे.
 
मानवतेचया दृष्टिकोनातून युक्रेनला यापूर्वी 1.5 अब्ज पौंडाची मदतही करण्यात आली होती.
 
या मदतीनंतर युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनच्या संरक्षण विभागाचा कायापालट होईल असं मत व्यक्त केलं आहे.
 
रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 125 वा : तुम्ही जिंकणार नाही, नाटो नेत्यांनी पुतीन यांना ठणकावलं
नेटो परिषदेत उपस्थित असलेल्या नेत्यांनी युक्रेन-रशियाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युद्धादरम्यान आपला युक्रेनला असलेला पाठिंबा कायम असेल, असं नेटो नेत्यांनी म्हटलं.
 
तसंच, तुम्ही कधी जिंकणार नाही, अशा शब्दात नेटो नेत्यांनी यावेळी पुतीन यांना ठणकावलं.
 
या परिषदेचं यजमानपद भूषवत असलेल्या स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेज म्हणाले, "रशिया हा नवीन धोरणात्मक संकल्पनेत मुख्य धोका म्हणून ओळखला जाईल. आम्ही पुतीन यांना स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो. तुम्ही जिंकणार नाही."
 
रशिया युक्रेन संघर्ष 124वा:लिसिचांस्क शहर सोडण्याचे आदेश
युक्रेनी अधिकाऱ्यांनी लिसिचांस्क शहरात राहाणाऱ्या नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत
 
लुहांस्कचे गव्हर्नर सर्हे हैदी म्हणाले, तिथली परिस्थिती अत्यंत कठीण आहे, तिथलं राहाणं खरंच धोक्याचं आहे.
 
लोकांनी छावण्यांमध्ये राहायला जावे असं सांगितलं. लिसिचांस्क शहर लुहांस्क प्रांतात आहे.
 
रशियन सैनिकांनी सतत काही आठवडे बाँबफेक केली आहे. त्यानंतर लिसिचांस्कजवळच्या सेवेरोदोनेत्स्क ताब्यात घेतलं आहे.
 
रशिया युक्रेन संघर्ष 123वा: झेलेन्स्की G7 परिषदेत बोलणार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की आज G7 परिषदेला संबोधित करणार आहेत. ताकदवान शस्त्रं उपलब्ध करून देण्यासंदर्भात झेलेन्स्की उपस्थित देशांच्या प्रतिनिधींना आवाहन करण्याची शक्यता आहे.
 
या परिषदेची तयारी सुरू असतानाच कीव्हवर क्षेपणास्त्राने हल्ले होत आहेत.
 
गेल्या काही दिवसात रशियाने युक्रेनमधल्या कीव्ह शहरात जोरदार हल्ले केले होते. त्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की ही मागणी करण्याची शक्यता आहे.
 
शस्त्रास्त्रांची रसद उशिरा पोहोचणं म्हणजे रशियाला आणखी आक्रमणासाठी खतपाणी घालण्यासारखं आहे असं झेलेन्स्की म्हणाले. एअर डिफेन्स सिस्टम आणि रशियावर नव्याने निर्बंध लागू करायला हवेत असं त्यांनी ऑनलाईन संवाद साधताना म्हटलं आहे.
 
मित्र देश खरंच आमचे मित्र असतील तर त्यांनी वेगाने कार्यवाही करायला हवी, नुसते निरीक्षक नकोत असा टोलाही त्यांनी लगावला.
 
जी7 परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध या मुद्याभोवतीच चर्चा एकवटण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील शहरांना जास्तीतजास्त रसद पुरवण्याचा प्रयत्न कसा वाढवता येईल यासंदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे.
 
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 122 वा : रशियाचे कीव्हवर पुन्हा हल्ले
रशियावर अजून निर्बंध लादण्याच्या दृष्टिनं अनेक देश युरोपमध्ये दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे रशियाने रविवारी (26 जून) युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. डोनबास भागावर नियंत्रण राखण्याच्या दृष्टिने युक्रेनला हे हल्ले महागात पडू शकतात.
 
गेल्या काही आठवड्यात कीव्हवर पहिल्यांदाच असे हल्ले करण्यात आले आहेत.
 
याआधी शनिवारी (25 जून) युक्रेनच्या पूर्वेकडील सिविएरो दोनेत्सक हे शहर रशियन शहराच्या ताब्यात गेलं. युक्रेनसाठी हा मोठा धक्का होता.
 
रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सकाळी सेंट्रल कीव्हमध्ये चार स्फोट झाले. त्यानंतर दक्षिण भागात अजून दोन स्फोट झाले.
 
राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख एंड्री एर्माक यांनी सांगितलं, "रशियाने कीव्हवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. रशियन क्षेपणास्त्रांनी एक अपार्टमेंट आणि शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत."
 
युक्रेनचे पोलिस प्रमुख इहोर क्लिमेंको यांनी टीव्हीवर बोलताना सांगितलं की, या हल्ल्यात पाच लोक जखमी झाले आहेत.
 
दुसरीकडे G-7 देशांनी आपल्या बैठकीच्या आधी रशियातून होणाऱ्या सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.