भारतीय लोकांचा आवडता असलेला गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे. इंग्लंडच्या लेस्टर शहरात समोसा वीक साजरा केला जाणार आहे. 9 ते 13 एप्रिल दरम्यान इंग्लंडमधल्या खवय्यांना या समोशाचा आस्वाद घेता येणार आहे. दक्षिण आशियातल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या समोसा वीकचं आयोजन करण्यात आलंय.
मुघलांनी भारतात समोसा आणला असं सांगितलं जातं. भारतीयांनी खुल्या दिलानं त्याचं स्वागत केलं. या समोशानं सगळ्या भारताला एकतेच्या सूत्रात बांधलंय. समोसा मस्तही आणि स्वस्तही आणि पोटभरही. हाच समोसा आता इंग्लंडमध्येही लोकप्रिय होईल, असा अंदाज आहे.
इंग्लंडमधल्या या समोसा वीकचं आयोजन केलंय 'लेस्टर करी अवॉर्ड'नं. लेस्टर करी अवॉर्डची रोमिला गुलजार ही सामोशाची प्रचंड चाहती. जर जगात बर्गर डे साजरा होऊ शकतो, तर समोसा वीक का नाही, असं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच तिनं या समोसा वीकचं आयोजन केल आहे.