1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2024 (18:05 IST)

जगातील सर्वांत मोठ्या हिऱ्याचा शोध लावणाऱ्या 2 मुलांची कहाणी

मॅरी गुडहर्ट
ती 2017 वर्षातली सर्वांत मोठी बातमी होती. सियरा लियोनमध्ये 'पीस डायमंड' सापडल्याच्या बातम्या जगभरात झळकत होत्या.
 
आफ्रिकेतील एक असा देश ज्याठिकाणी गरिबी आणि रक्तपात हे मौल्यवान हिऱ्यासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जात होते. अशा देशात या मौल्यवान रत्नातून मिळणारा पैसा स्थानिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल करण्यासाठी वापरला जाणार होता.
 
पण माध्यमांच्या या संपूर्ण गदारोळामागं खरे हिरो होते, ते हिरा शोधण्यासाठी प्रचंड परिश्रम करणारे खाण कामगार.
 
या पाच जणांमध्ये कोम्बा जॉनबुल आणि अँड्र्यू साफी हे सर्वांत कमी वयाचे म्हणजे किशोरवयीन मुलं होते.
 
त्यांची नजर जेव्हा धुळीनं माखलेल्या या मोठ्या आणि चमचमणाऱ्या दगडावर पडली तेव्हा त्यांना जणू त्यांचं स्वप्न पूर्ण झालं असं वाटू लागलं.
 
या चमत्कारीक शोधाच्या सहा वर्षांनंतर ते पुन्हा जणू नैराश्यात हरवून गेले की काय? असं वाटू लागलं आहे.
 
नियतीचा खेळ
साफी अत्यंत हुशार विद्यार्थी होते. पण गरिबीमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यात सोडावं लागलं. जॉनबुल यांचं कुटुंब 1991 पासून 2002 दरम्यानच्या गृहयुद्धामुळं उद्ध्वस्त झालं होतं.
 
एका स्थानिक पाद्रींनी पाच जणांना हिऱ्याच्या शोधासाठी खोदकाम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यात हे दोघंही सहभागी झाले. अट अशी होती की, त्यांना मजुरी मिळणार नाही.
 
तर मोबदल्यात त्यांना खोदकामासाठी लागणारी अवजारं आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबांना अन्न दिलं जाईल. जर हिरा मिळालाच तर त्यातील सर्वांत मोठा वाटा प्रायोजक असलेल्या पाद्रींना मिळणार होता.
 
कठीण आणि जास्त तास काम असूनही हे दोघं किशोरवयीन मुलं यात सहभागी झाले. पहाटेपासून नाश्त्यापर्यंत खजुराच्या शेतीमध्ये काम आणि त्यानंतर दिवसभर ते खोदकाम करायचे.
 
त्यांना आशा होती की, पुन्हा शिक्षण घेता येईल एवढा तरी पैसा त्यांना साठवता येईल. पण वास्तव म्हणजे प्रत्यक्षात हे काम अत्यंत धोकादायक होतं.
 
साफी म्हणाले की, "मी जॉनबुलला म्हटलं माझं स्वप्न भंगलं होतं."
 
जॉनबुल त्यावेळच्या आठवणी सांगू लागले, त्यांना प्रचंड पाऊस आणि प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत होता.
 
"आम्ही एकमेकांना धीर देण्यासाठी एकमेकांचं सांत्वन करायचो. एकमेकांशी गंमत करायचो. आमच्याकडं एक ब्लूटूथ डिव्हाइस होतं, त्यावर आम्ही गाणी लावायचो," असं ते म्हणाले.
 
अचानक आपण श्रीमंत झालो तर काय करायचं अशी स्वप्नं ते पाहायचे. जॉनबुल यांना दोन मजली घर बनवायचं होतं. तसंच टोयोटा एफजे क्रूझर खरेदी करायची होती. तर साफी यांना शिक्षण पूर्ण करायचं होतं.
 
सर्वांत मोठा हिरा
अखेर तो नशीब चमकवणारा दिवस उजाडला. त्यादिवशी त्यांनी खाणीमध्ये जाण्यापूर्वी उकडलेल्या केळीचा नाश्ता केला आणि त्यानंतर प्रार्थना केली.
 
खाण कामगारांनी हिऱ्याच्या शोधासाठी नेमकंच काम सुरू केलं होतं.
 
तो शुक्रवारचा दिवस होता. 13 मार्च 2017. खोदकामाची तयारी करायची, जमीन खोदायची, दगड वेगळे करायचे आणि पावसाचं पाणी खाणीमध्ये जाण्यापासून अडवणं असं त्यांचं नियोजन होतं.
 
त्याचवेळी जॉनबुलची नजर एका चमकणाऱ्या दगडावर पडली.
 
"मी वाहत्या पाण्यामध्ये हा दगड पाहिला. तो खालच्या दिशेला जात होता. मी आधी हिरा पाहिलेला नव्हता. ती फक्त माझी निरागस बुद्धी होती," असं ते म्हणाले.
 
"मी त्या दगडावर एका मिनिटापेक्षा जास्त वेळ नजर खिळवून ठेवली. त्यानंतर काकाला म्हणालो, काका-तो दगड चमकत आहे, तो कोणता दगड आहे?"
 
65 लाख डॉलरमध्ये विक्री
जॉनबुल खाली गेले आणि त्यांनी पाण्यातून तो दगड उचलला.
 
"तो खूपच थंड होता. मी तो पाहतच होतो, तेवढ्यात त्यांनी माझ्या हातातून तो हिसकावून घेतला आणि म्हणाले 'हा तर हिरा आहे!' "
 
हा 709 कॅरेटचा हिरा होता. तो जगातील 14वा सर्वांत मोठा हिरा होता.
 
खाण कामगारांनी पाद्री अॅम्युएल मोमोह यांना याबाबत माहिती दिली आणि त्यांनी तो ब्लॅक मार्केटमध्ये विकण्याऐवजी सरकारला देऊन इतिहास रचला.
 
जॉनबुल आणि साफी यांच्यासराखेच सियरा लियोनचे हजारो रहिवासी अनाधिकृत खाणींमध्ये खोदकाम करतात.
 
ते नशिबवान असतील तर त्यांना हिऱ्याचा एखादा लहानसा तुकडा मिळू शकतो. पण अशाप्रकारे एक पूर्ण हिरा मिळणं हे स्वप्नंच असतं. त्यामुळं अनेक लोक यात जुंपलेले असतात.
 
या हिऱ्यातील काही भाग प्रत्येक खाण कामगाराला मिळेल आणि नफ्यातील काही भाग स्थानिक विकासासाठी सरकारला मिळेल, असं ठरलं होतं.
 
सुरुवातीला प्रत्येक खाण कामगाराला 80,000 डॉलर मिळाले. साफी आणि जॉनबुल यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा विचार केला होता त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक ही रक्कम होती. पण तरीही एवढा लहान वाटा मिळाल्यानं ते निराशही झाले.
 
मिळालेले सर्व पैसे खर्च झाले
जॉनबुल म्हणाले की, "मला जेव्हा माझा वाटा मिळाला तेव्हा मी एक आठवडा हात न लावता ते पैसे तसेच ठेवले. नंतर एक घर खरेदी करणयासाठी मी फ्रीटाउनमध्ये गेलो."
 
साफी यांना शिक्षणासाठी कॅनडाला जायचं होतं आणि जॉनबुल यांनाही त्यांच्याबरोबर तिथं जायचं होतं.
 
त्यांनी प्रवास, युनिव्हर्सिटीची फी आणि राहण्यासारख्या खर्चासाठी एका एजंटला 15,000 डॉलर दिले.
 
त्यांना घानाला नेण्यात आलं. त्याठिकाणी ते सहा महिने राहिले, त्यांचा खूप पैसा खर्च झाला.
 
पण त्यांचा व्हिसा नामंजूर झाला तेव्हा सर्व काही जणू धुळीस मिळालं. जॉनबुल सियरा लियोनला परतले. त्यांना मिळालेल्या रकमेतील एक मोठा भाग खर्च झाला होता. तर साफी यांनी एक नवा प्रवास सुरू केला होता.
 
ते एका तिसऱ्या देशात गेले, त्याचं नाव त्यांच्या आम्ही सुरक्षेच्या कारणामुळं इथं दिलेलं नाही. त्यांना सांगण्यात आलं होतं की, ते दिवसा ड्रायव्हरचं काम करू शकतात आणि संध्याकाळी शिक्षण.
 
पण साफी जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा वास्तव अगदी वेगळं होतं.
 
ते म्हणाले, "मला तबेल्यात घोड्यांची देखरेख करायची होती. तिथंच खायचं आणि झोपायचं होतं. इतर मजुरांना राहण्याची जागा दिली होती, पण मला तिथंच तबेल्यातच झोपायला सोडून देण्यात आलं होतं."
 
साफी यांनी हिऱ्याच्या रकमेतून असं जीवन मिळेल अशी आशा केली नव्हती. घर नसल्यानं त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.
 
सियरा लियोनमध्ये त्यांनी जे घर खरेदी केलं होतं, त्याशिवाय हिऱ्यातून मिळालेला सर्व पैसा खर्च झाला होता. आता त्यांना घरी जायचं असल्याचं ते म्हणत आहेत.
 
काहीही ओळख मिळाली नाही
या सर्वांच्या मनातली सर्वांत मोठी वेदना म्हणजे, त्यांना हिऱ्याच्या शोधासाठी कधीही योग्य ते श्रेय मिळालं नाही.
 
माध्यमांनी प्रामुख्यानं पाद्री यांच्यावरच लक्ष केंद्रीत केलं होतं. कारण त्यांनीच लोकांना खोदकाम करायला लावलं होतं.
 
प्रत्यक्षात खोदकाम करणाऱ्या कामारांबाबत फार कमी उल्लेख होता. साफी यांना बाजुला सारल्याची किंवा बहिष्कृत केल्यासारखी भावना निर्माण झाली होती.
 
जॉनबुल यांना वाटतं की, त्यांनी हा पैसा वेगळ्याप्रकारे खर्च करायला हवा होता.
 
"माझ्याकडे पैसा होता तेव्हा मी फार लहान होतो. मागे वळून पाहतो तेव्हा मला चांगलं वाटत नाही. त्यावेळी मी फक्त दिखावा करत होतो. कपडे आणि इतर गोष्टी खरेदी करत होतो. तरुण असंच करतात हे तुम्हालाही माहिती असेल," असं ते म्हणाले.
 
"आणखी पैसा कमावण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली नसती तर वाया गेलेल्या या पैशातून मला बरंच काही करता आलं असतं."
 
त्यांनी अशा जीवनाची आशा केली नव्हती. पण जॉनबुल सध्या फ्रीटाऊनमध्ये ठिक ठाक जीवन जगत आहे. ते अॅल्युमिनियमच्या खिडक्या तयार करतात. विदेशात स्थायिक होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही.
 
जॉनबुल यांच्या मते, "माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आई वडिलांकडं घर नव्हतं. पण माझी मुलं फ्रीटाऊनमध्ये वडिलांच्या घरात लहानाची मोठी होत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याबरोबर जे घडलं ते माझ्या मुलांना सहन करावं लागणार नाही."