सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (12:47 IST)

ISI च्या माजी प्रमुख फैज हमीदवर कोर्ट मार्शल प्रक्रिया, एकेकाळी होते इम्रान खान यांचे खास

पाकिस्तानी गुप्तचर संघटना (ISI) चे माजी प्रमुख जनरल (सेवानिवृत्त) फैज हमीद यांना 'टॉप सिटी केस'मध्ये जनरल कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करताना ताब्यात घेण्यात आल्याची घोषणा पाकिस्तानने केलीय.
लष्कराच्या जनसंपर्क विभाग, आयएसपीआरने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केले, यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टॉप सिटी प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यात आली.

निवेदनात पुढे म्हटलंय की, "टॉप सिटी प्रकरणाच्या चौकशीअंती, लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) फैज हमीद यांच्याविरुद्ध पाकिस्तान सेना अधिनियमाच्या तरतुदींनुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.”
फैज हमीदबाबत पाकिस्तानी लष्कराचं असंही म्हणणं आहे की, “पाकिस्तानी लष्कर कायद्याचे उल्लंघन करण्याच्या अनेक घटना त्यांच्या निवृत्तीनंतर समोर आल्या आहेत.”
 
कोण आहेत फैज हमीद?
पाकिस्तानी सेनेच्या इतिहासात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच लोक असतील, ज्यांमा दोन वेगवेगळ्या कोअरचे कमांडरपद सांभाळण्यास मिळाले. गेल्या 75 वर्षांत फक्त 11 लेफ्टनंट जनरल्सनी एकापेक्षा जास्त कोअरचे नेतृत्व केले आहे. बलूच रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल फैज हमीद त्यापैकीच एक आहेत.
 
मुस्लीम लीग-एनचे माजी सिनेटर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल अब्दुल कय्युम यांच्या मते, फैज हमीद यांच्यात ते सर्व गुण होते ज्यामुळे त्यांना लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचता आले.
 
पाकिस्तानच्या पंजाबमधील चकवालचे असणारे, फैज हमीद यांनी ब्रिगेडियर म्हणून आपल्या कारकिर्दीत रावळपिंडीमध्ये 10 कोअरच्या 'चिफ ऑफ स्टाफ'चे पदही सांभाळले आहे.
मेजर जनरल म्हणून त्यांनी पनो आकील विभागाचे जनरल कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले आणि जवळपास अडीच वर्ष त्यांनी डीजीसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएसआयच्या काउंटर इंटेलिजन्स शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहिले.
 
लेफ्टनंट जनरल झाल्यानंतर, त्यांनी दोन महिने ऍडज्युटंट जनरल म्हणून काम केले आणि 2019 मध्ये, त्यांची आयएसआय प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि दोन वर्षांहून अधिक काळ ते या पदावर होते.
 
2021 मध्ये, त्यांनी आठ महिने पेशावरचे कोअर कमांडर म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर काही आठवड्यांसाठी ते बहावलपूरचे कोअर कमांडर राहिले.
 
विद्यमान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी लष्कराचा राजीनामा दिला.
 
राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप
वर्तमान विरोधी पक्ष तहरीक-ए-इन्साफ आणि त्याचे संस्थापक इम्रान खान यांच्याकडून आयएसआयचे माजी डीजी मेजर जनरल फैसल नसीर यांच्यावर राजकीय हस्तक्षेप आणि तेहरीक-ए-इन्साफ विरुद्ध कारवाई आणि हिंसाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
 
त्याचप्रमाणे 2017 ते 2019 पर्यंत आयएसआयचे डीजी राहिलेले मेजर जनरल फैज हमीद यांच्या विरोधात मुस्लिम लीग-एननेही जवळपास अशाच तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धी, अटक यासारखे आरोपही करण्यात आले.
 
इम्रान खान यांच्या शासनकाळात पीएमएल-क्यूचे चौधरी परवेझ इलाही यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, जनरल अशफाक परवेझ कयानी यांच्या कार्यकाळात आयएसआयचे डीजी लेफ्टनंट जनरल शुजा पाशा आमच्या पक्षाच्या नेत्यांना तेहरीक-ए-इन्साफमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा उल्लेख आम्ही तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याकडे केला होता.

माजी गव्हर्नर आणि मुस्लिम लीग-एनचे नेते मुहम्मद झुबेर यांनी या मुद्द्याचे समर्थन करताना म्हटलं आहे की, “जनरल पाशा आणि नंतर जनरल झहीर उल इस्लाम यांनी तेहरीक-ए-इन्साफच्या बाजूने काम केले आणि शेवटी मेजर जनरल फैज हमीद यांच्या काळात इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले.”
 
तहरीक-ए-इन्साफच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि माजी संरक्षण सचिव लेफ्टनंट जनरल (निवृत्त) नईम खालिद लोधी म्हणतात, “आधीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लष्कराचा हस्तक्षेप होत आला आहे. यावेळी प्रकरण थोडे वेगळे होते. जनरल फैज हमीद यांच्या कारकिर्दीत राजकीय हस्तक्षेप अतिशय सार्वजनिक आणि काहीसा निर्लज्ज होऊ लागला होता. आयएसआयच्या भूमिकेची रस्त्यावर आणि सार्वजनिक वर्तुळात चर्चा होऊ लागली. पूर्वी हे सगळं गुपचूप व्हायचं, पण आता हे सगळं उघडपणे होऊ लागलं.”
 
अफगाणिस्तान शांतता प्रक्रिया
डीजी आयएसआयच्या रुपात, जनरल फैज हमीद यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार आणि अफगाणिस्तानातील तालिबानशी चर्चा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर जनरल फैज हमीद हे काबूलमधील एका हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसले आणि त्यांनी परदेशी पत्रकारांशी संक्षिप्त बातचित केली.याचा एक फोटेदेखील समोर आला असून यात जनरल फैज हमीदच्या मागे आयएसआयचा एक मेजर जनरल देखील उपस्थित असल्याचे दिसते, परंतु त्यांनी मास्क घातला होता.
 
प्रसारमाध्यमांत हे चित्र प्रसिद्ध झालं आणि, एका गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाने अशाप्रकारे लोकांसमोर येणं योग्य आहे का? अशी टीकेची झोडही उठली. दरम्यान, नवीन आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीचा मुद्दा पुढे आला, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांची अशी इच्छा होती की जनरल फैज हमीद यांनी आणखी काही काळ या पदावर काम करावे. ही बाब खुद्द इम्रान खान यांनी सांगितली होती.परंतु, आयएसआयचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान आवासातून या नियुक्तीला मंजुरी देण्यास विलंब करण्यात आला. यामुळे लष्कर आणि तहरीक-ए-इन्साफ यांच्यात तणावाची स्थितीही उत्पन्न झाली होती.
 
प्रसिद्धी आणि नुकसान?
अनेक मंडळांमध्ये लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या कारकिर्दीशी संबंधित वादांसाठी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षालाही दोषी ठरवले जाते.
काही तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान इम्रान खान आणि तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांनी जनरल फैज हमीद यांच्या व्यक्तिरेखेला विलक्षण प्रसिद्धी दिली, ज्यामुळे त्यांचे नाव एका पक्षाशी जोडले गेले.
जनरल हमीद गुल यांच्याप्रमाणे जनरल फैज हमीद यांनाही प्रसिद्धीमुळे अपरिमित हानी झाली.
 
एका अधिकाऱ्याची प्राथमिकता काय असावी?
लष्करी परंपरेत अशीही अलिखित परंपरा आहे की, एखाद्या अधिकाऱ्याला एखादे लक्ष्य किंवा असाइनमेंट दिल्यास, त्याने त्याची जबाबदारी केवळ व्यावसायिक पद्धतीने पार पाडणे अपेक्षित असते.
पाकिस्तानच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना आणि भूतकाळातील उदाहरणे पाहिल्यास, एकापेक्षा जास्त वेळा असं घडलंय जेव्हा, लष्करी अधिकारी त्यांचे व्यावसायिक कर्तव्य बजावताना मूलभूत नियमांच्या पलीकडे गेल्याचे पाहायला मिळाले.

रशियाविरुद्ध अफगाण युद्धादरम्यान आणि नंतर अनेक अधिकारी अतिरेक्यांमध्ये लोकप्रिय झाले. माजी डीजी आयएसआय जनरल हमीद गुल त्यांच्या कार्यकाळात आणि नंतर एक वेगळी व्यक्ती म्हणून उदयास आले, त्यांनाही लवकर सैन्य सोडावे लागले.
माजी डीजी आयएसआय जनरल जावेद नसीर यांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि तेही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

9/11 नंतर जनरल मुशर्रफ यांच्या टीमचे प्रमुख सदस्य आणि तत्कालीन डीजी आयएसआय जनरल महमूद अहमद यांना त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि त्यांच्या कल्पना यांचा समतोल साधता आला नाही आणि त्यांना सैन्य सोडावे लागले. आणि आता या संदर्भात जनरल फैज हमीद यांचंही नाव घेतलं जात आहे.
 
माजी गव्हर्नर मुहम्मद जुबेर यांच्या म्हणण्यानुसार, “ऐंशीच्या दशकातील अफगाण युद्ध आणि 9/11 नंतरही पाकिस्तानी लष्कराचे अनेक अधिकारी इस्लामचा लढा मानून खूप पुढे गेले होते.” त्याचप्रमाणे प्रोजेक्ट इम्रानमध्येही काही अधिकारी संस्थेच्या पलीकडे जाऊन त्याचा एक भाग बनले.
 
माजी संरक्षण सचिव लेफ्टनंट जनरल नईम खालिद लोधी यांचेही कमी-अधिक प्रमाणात असेच मत आहे.
त्यांच्या मते, डीजी आयएसआय हे पद सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक आहे. अधिकार, सत्ता, महत्त्व, संसाधने हे सर्व या नियुक्तीचे मूलभूत आणि अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे महासंचालकांची स्वतःची विचारसरणी आणि संस्थेची दृष्टी यांचा मेळ बसत नाही, असे अनेकदा घडते. विशेष अधिकार असल्यामुळे अधिकारी संस्थेची संमती न घेताही वाटेल ते करतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit