बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (21:55 IST)

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची अशी असेल अंत्ययात्रा

queen Elizabethan
ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आगामी काही दिवस लोक त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊ शकतील. त्यानंतर राजकीय सन्मानासह त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव वेस्टमिन्स्टर येथील राजमहालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
 
महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले आहेत. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागणार असून त्यासाठी काही तासांचा आणि प्रसंगी रात्रीहून अधिक वेळ लागू शकतो, असे सांगण्यात आले आहे.
 
हा रथ हळूहळू पॅलेस ऑफ होलीरुड हाऊसच्या दिशेने पुढे जाईल आणि चार वाजता तिथे पोहोचेल.
 
त्यानंतर सोमवारी 12 सप्टेंबरपासून 24 तासांसाठी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव शरीर सेंट गिल्स कॅथेड्रल एडिनबरा इथे ठेवलं जाईल. याठिकाणीही लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येऊ शकतील.
 
सोमवारी (12 सप्टेंबर) दुपारी महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव शरीर एडिनबरा येथील सेंट गिल्स कॅथेड्रल इथे पोहोचेल. राजघराण्यातील सदस्यही त्यांच्यासोबत कॅथेड्रल इथे पोहोचतील.
 
मंगळवारी (13 सप्टेंबर) महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव लंडन येथे आणलं जाईल. या प्रवासादरम्यान त्यांची कन्या आणि राजकुमारी एन सोबत असेल. महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव शरीर एडिनबरा विमानतळाहून आरएफएफ नॉर्थहॉल्ट बकिंगहॅम पॅलेस येथे नेलं जाईल.
 
बुधवारी (14 सप्टेंबर) दुपारी साधारण 3 वाजता महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव शरीर वेस्टमिंन्स्टर सभागृहात आणलं जाईल. याठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर 19 सप्टेंबरपूर्वी चार दिवस ठेवलं जाईल. या दरम्यान लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील.
 
महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाची शवपेटी 11 व्या शतकातील वेस्टमिन्स्टर सभागृहात उंच व्यासपीठावर ठेवली जाईल.
 
या व्यासपीठाच्या प्रत्येक कोपऱ्यात राजघराण्याची सेवा करणारे सैनिक तैनात असतील.
 
यानंतर 19 सप्टेंबरला संपूर्ण राजकीय सन्मानासह महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अंतिम निरोप दिला जाईल.
 
विंडसर येथे किंग जॉर्ज VI मेमोरिअल चॅपलमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव शरीर दफन केले जाईल.
 
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अंतिम प्रवास अत्यंत साधेपणाने सुरू होऊन अंतिम टप्प्यात भव्य स्वरुपात संपन्न होणार आहे. यापूर्वी वर्ष 1965 साली सर विन्स्टन चर्चिल यांच्या निधनावेळी लोकांनी अशा प्रकारे अंत्ययात्रा पाहिली होती.
 
किंग चार्ल्स तृतीय दौऱ्यावर जाणार
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अंतिम निरोप दिल्यानंतर किंग चार्ल्स तृतीय स्कॉटलँड, उत्तर आयर्लंड आणि वेल्सचा दौरा करणार आहेत. ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस या दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील.
 
महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यंसंस्कार होईपर्यंत ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राजघराण्यात यानंतर आणखी एक आठवडा दुखवटा असेल.
 
ब्रिटनच्या इतिहासात वेस्टमिन्स्टर एबे एक ऐतिहासिक चर्च आहे. याच ठिकाणी ब्रिटनचे राजा आणि महाराणी यांचा राज्याभिषेक होतो. 18 व्या शतकानंतर तिथे कोणत्याही शासकावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
 
1900 च्या दशकात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील, आजोबा, पणजोबा आणि महाराणी व्हिक्टोरिया या सर्वांवर विंडसर येथील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये अंत्यसंस्कार झाले होते.
 
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राजघराण्यातील सदस्यांसह जगभरातील राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं जाईल.
 
टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमात ब्रिटनचे ज्येष्ठ नेते, आजी आणि माजी पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 
या दिवशी पूर्वनियोजित असलेले कार्यक्रम रद्द करण्याचे तसे कुठलेही बंधन नाही पण सरकारने पूर्वनियोजित कोणत्याही दौऱ्याच्या आयोजनाची वेळ बदलली पाहिजे असा सल्ला दिला आहे.
 
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर तात्काळ अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले किंवा टाळण्यात आले.
 
प्रीमियर लीग, इंग्लिश फुटबॉल लीग आणि स्कॉटलँड किंवा उत्तर आयर्लंड येथे होणारे फुटबॉलचे सामने मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
 
वुमन सुपर लीग, वुमन चॅम्पियनशिप आणि वुमन एफए कपसाठीचे सर्व सामने सुद्धा काही वेळासाठी स्थगित केले आहेत. घोड्यांची शर्यत, गोल्फ आणि बॉक्सिंगचे अनेक सामन तूर्तास रद्द केले आहेत.
 
पुढील आठवड्यात होणारी आंदोलनं सुद्धा रद्द केली गेली आहेत. तसंच ट्रेड्स युनियन काँग्रेसने म्हटलंय की, त्यांनी आपले वार्षिक संमेलन स्थगित केलं आहे.
 
शनिवारी (10 सप्टेंबर) किंग चार्ल्स यांनी घोषणा केली की, महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारादिवशी सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
 
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्स तृतीय यांची नवे राजे म्हणून घोषणा करण्यात आली.
 
ही घोषणा सेंट जेम्स पॅलेस येथे करण्यात आली. राज्यारोहणाच्या समितीमध्ये ज्येष्ठ राजकीय नेते, न्यायमूर्ती, अधिकारी यांचा समावेश असतो. या समितीने चार्ल्स यांची राजेपदी घोषणा केली. अशी घोषणा करण्याच्या कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वतः राजे उपस्थित नव्हते. पण नंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या पहिल्या प्रिव्ही काऊन्सिल बैठकीला ते उपस्थित राहिले. प्रिव्ही काऊन्सिलचे क्लर्क रिचर्ड टिलब्रूक यांनी 'गॉड सेव्ह द किंग'ची घोषणा करण्याआधी चार्ल्स यांची 'किंग ऑफ द कॉमनवेल्थ, डिफेंडर ऑफ द फेथ' अशी घोषणा केली. अभ्यागतांनी पूर्ण भरुन गेलेल्या सभागृहात क्विन कॉन्सर्ट, प्रिन्स ऑफ वेल्स, पंतप्रधान लिझ ट्रस यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केला.
 
यापूर्वी ब्रिटनचे नवीन राजे किंग चार्ल्स आणि क्वीन कंसोर्ट कॅमिला पार्कर यांनी बकिंगहॅम पॅलेसच्या मार्गावर उभे असलेल्या लोकांचं बाहेर येऊन अभिवादन स्वीकार केलं.
 
यावेळी "गॉड सेव्ह द किंग" अशी घोषणा लोक देत होते. यावेळी किंग चार्ल्स आणि क्वीन कंसोर्ट कॅमिला यांनी लोकांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आणि हात मिळवत त्यांचं अभिवादन स्वीकारलं.