शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (22:21 IST)

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भारत दौऱ्यांच्या तीन आठवणी

elizabeth
महाराणी एलिझाबेथ भारतात पहिल्यांदा आल्या ते 1961 सालच्या जानेवारी महिन्यात. त्यावेळी महाराणींच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा रस्ता गर्दीने भरुन गेला होता.
"भारतीय नागरिक या आठवड्यात आपल्यासमोरच्या अडचणी विसरले. पूर्णपणे जरी विसरले नसले तरी आर्थिक अडचणी, राजकीय संकट, कम्युनिस्ट चीनबाबत चिंता, कांगो आणि लाओसच्या पार्श्वभूमीवर निष्प्रभ वाटत होती. महाराणी एलिझाबेथ राजधानी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त आनंद घेण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे," 
 
बातमीनुसार, "रेल्वे, बस आणि बैलगाड्या भरभरून लोक राजधानी दिल्लीत दाखल होत होते. ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलीप आणि क्वीन एलिझाबेथ या शाही जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती."
 
एलिझाबेथ या दौऱ्यावर वसाहतीवादी साम्राज्याच्या शासक म्हणून आलेल्या नव्हत्या.
 
ब्रिटिश साम्राज्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर गादी सांभाळणाऱ्या राजघराण्यातल्या त्या पहिल्या होत्या
 
इंग्रज निघून गेल्यानंतर भारताच्या नागरिकांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, हेसुद्धा दर्शवण्याची संधी या निमित्ताने भारतासमोर होती.
 
शाही जोडप्यासाठी भारतीय उपखंडाचा सहा आठवड्यांचा दौरा अतिशय रंजक ठरणार होता. या दौऱ्याचा व्हीडिओ ब्रिटिश पाथेने त्यांच्याचॅनेलवर पोस्ट केलेला आहे.
 
1961 च्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ यांनी मुंबई, चेन्नई, कोलकाता (तत्कालीन बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता) आणि आग्र्याचा ताज महाल, जयपूरचा पिंक पॅलेस, तसेच प्राचीन शहर वाराणसी इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.
 
या सर्वच ठिकाणी त्यांचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं. यादरम्यान त्या हत्तीवर स्वार होऊन फेरफटकाही मारला.
 
दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर आयोजित एका सभेत त्यांनी जनतेला संबोधितही केलं.
 
गर्दीतून वाट काढत ताजमहालच्या दिशेने त्या निघाल्या. पुढे ब्रिटिशांच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये बांधलेल्या स्टील प्लांटला त्यांनी भेट दिली. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचीही त्यांनी भेट घेतली होती.
 
कोलकात्यात त्यांनी राणी व्हिक्टोरिया यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाला भेट दिली. कोलकाता येथे शाही जोडप्याच्या उपस्थितीत घोड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
या ठिकाणी जाताना शाही जोडप्याने खुल्या कारमधून प्रवास करत सर्वांना अभिवादन केलं.
 
या कार्यक्रमाचं वार्तांकन करताना आकाशवाणीच्या (AIR) पत्रकाराने यॉर्कशायर पोस्टच्या संपादकीयमधील काही भाग सांगितला. त्यानुसार, महाराणी एलिझाबेथ या भारतीयांना प्रभावित करण्यासाठी म्हणून कदाचित आल्या नसतील. पण भारतीयांच्या उत्साहामुळे त्यांनी सर्वांना प्रभावित केलेलं आहे, हे दिसून येतं, असं म्हटलं गेलं होतं.
 
याच्यानंतर सुमारे 20 वर्षांनी म्हणजेच नोव्हेंबर 1983 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी दुसऱ्यांदा भारत दौरा केला.
 
कॉमनवेल्थ नेत्यांच्या बैठकीचं औचित्य साधून त्यांच्या या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
यावेळी शाही जोडपं राष्ट्रपती निवासातील अतिथीगृहात मुक्कामाला होते. तेथील भारतीय फर्निचर हटवून त्याठिकाणी व्हाईसरिगल पद्धतीची सजावट करण्यात आली होती. अतिथीगृहाची डागडुजी करून ते अतिशय चकचकीत करण्यात आलं होतं.
 
खोलीचे पडदे, बेडशीट बदलण्यात आले होते. याशिवाय, जेवणासाठी पाश्चिमात्य जुन्या पद्धतीचे पदार्थ बनवण्यात आले होते. कारण, महाराणी यांना साध्या पद्धतीचं जेवणच आवडत असे.
 
महाराणी एलिझाबेथ यांनी ऑक्टोबर 1997 साली आपला शेवटचा भारत दौरा केला.
 
प्रिन्सेस डायना यांच्या निधनानंतर त्या पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेत होत्या.
 
महाराणींच्या या दौऱ्याला काही प्रमाणात वादाचंही गालबोट लागलं. या दौऱ्यात त्या जालियनवाला बाग स्मारकाला भेट देणार होत्या.
 
ब्रिटिश इतिहासातील सर्वाधिक रक्तरंजित नरसंहारांपैकी एक म्हणून जालियनवाला बाग ही घटना ओळखली जाते.
 
अमृतसरच्या उत्तर दिशेला असलेल्या जालियनवाला बागेत 1919 साली आंदोलन सुरू होतं. त्यावेळी या ठिकाणी बसलेल्या शेकडो आंदोलकांवर नागरिकांवर ब्रिटिश सैनिकांनी यथेच्छ गोळीबार केला. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता.
 
महाराणी एलिझाबेथ यांच्या भेटीच्या एक दिवस आधी त्यांचा दिल्ली येथे एक भोजनाचा कार्यक्रम सुरू होता.
 
या कार्यक्रमात महाराणी एलिझाबेथ म्हणाल्या, "भूतकाळात काही कठीण प्रसंग घडले, हे काही लपून राहिलेलं नाही. उद्या मी भेट देणार असलेलं जालियनवाला बाग हे ठिकाण त्याचं दुःखद उदाहरण आहे. पण आपल्याला कितीही काही वाटलं तरी इतिहास आपल्याला पुन्हा लिहिता येत नाही. इतिहासात दुःखाचे क्षण आहेत. तसेच आनंदाचे क्षणही आहेत. दुःखातून आपल्याला बोध घ्यावा लागेल. तर आनंदातून आपल्याला नव्याची निर्मिती करावी लागेल."
 
ब्रिटनने जालियनवाला बाग घटनेबाबत स्पष्ट शब्दांत माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्यांचं या भाषणातून समाधान झालं नाही.
 
जालियनवाला बागेत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांनी यानंतर अमृतसर विमानतळावर नियोजनबद्ध आंदोलन पुकारलं. विमानतळापासून ते शहरापर्यंतच्या सुमारे 15 किलोमीटर रस्त्यावर लोक झेंडे घेऊन उभे होते.
 
यानंतर शीख धर्मीयांसाठी सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरात महाराणी एलिझाबेथ यांना पादत्राणे काढायला लावून केवळ सॉक्ससह प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.
 
महाराणींच्या राजेशाही पोशाखाची भारतीय माध्यमांमध्ये चर्चा होती. 1983 च्या भारत दौऱ्यातही एका मासिकाच्या पत्रकाराने त्यांच्या पोशाखाबाबत भरभरून लिहिलं होतं.
 
"हॅट पाहा हॅट," एका पत्रकाराने म्हटलं.
दुसऱ्याने विचारलं, "कशाची बनलीय?"
"स्ट्रॉने बनवलीय." पहिला उत्तरला.
आणि ड्रेस कोणत्या कापडाचा बनवलेला आहे?
"चिनी धाग्यांपासून," पहिल्याने उत्तर दिलं.
 
दुसऱ्याने विचारलं, "तू महाराणींचा डिझायनर आहेस का?"
त्यावर पहिला उत्तरला, "नाही, नाही, मी पण पत्रकारच आहे. 
महाराणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या तिन्ही भारत दौऱ्यांमध्ये येथील आदरातिथ्याचा मनसोक्त आनंद घेतला.
"भारतीयांच्या मायेची ऊब, आदरातिथ्य, त्यांच्या मनाची श्रीमंती आणि येथील विविधता ही आमच्यासाठी प्रेरणादायक ठरत आली आहे," असं महाराणी एलिझाबेथ यांनी नंतर म्हटलं होतं.