अमेरिकेने ११ अरब देशांना सुरक्षा सूचना जारी केली; गरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला
अमेरिकेच्या इशाऱ्यांमध्ये इराण-समर्थित हौथी गटांकडून सौदी अरेबियातील नागरी विमानतळे आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या धोक्याचाही उल्लेख आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने ११ अरब देशांमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केली आहे. या सूचनेत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवेत, जॉर्डन, बहरीन, ओमान, कतार, इराक, लेबनॉन, येमेन आणि इस्रायल यांचा समावेश आहे. या प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीत अचानक बिघाड होण्याची शक्यता लक्षात घेता, अमेरिकी राजनैतिक दूतावासांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आपल्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करण्यास तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेचा हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा या प्रदेशात इराण आणि त्याच्याशी संलग्न हौथी गटांच्या कारवायांबद्दल चिंता वाढली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, जर तणाव वाढला तर अमेरिकेचे हितसंबंध, कंपन्या आणि संस्थांना लक्ष्य केले जाऊ शकते. तथापि, या इशाऱ्याचा अर्थ असा नाही की सर्व देशांवर हल्ल्याचा तात्काळ धोका आहे किंवा हवाई सेवा स्थगित करण्यात आल्या आहे.
अमेरिकेच्या दूतावासांनी प्रवाशांना इशारा दिला आहे की, जर प्रदेशातील परिस्थिती बिघडली तर हवाई क्षेत्र बंद केले जाऊ शकते. यामुळे उड्डाणांना विलंब, उड्डाणे रद्द होणे किंवा मार्गात बदल होऊ शकतो. प्रवाशांना प्रवासापूर्वी त्यांच्या एअरलाइन आणि संबंधित विमानतळाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाने प्रवाशांना बगदाद, एरबिल, बसरा आणि सुलेमानिया विमानतळांना जोडणाऱ्या विमानांच्या स्थितीची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

