शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2024 (13:10 IST)

युके निवडणुकीतल्या पराभवानंतर ऋषी सुनक यांचं राजकीय भवितव्य काय असेल

युनायटेड किंग्डममध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (5 जुलै) जाहीर झाले आणि तब्बल 14 वर्षांनी लेबर पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला.
 
लेबर पार्टीचे नेते किएर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. अँगेला रेनर या उपपंतप्रधान बनल्या आहेत.
 
650 सदस्य संख्येच्या युकेच्या संसदेत लेबर पार्टीने 412 जागांवर विजय मिळवला आहे. बहुमतासाठीच्या 326 या आकड्यापेक्षा ही संख्या मोठी आहे.
 
या निवडणूक निकालांमुळे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ऋषि सुनक यांच्यासाठीही हा निकाल धक्कादायक आहे. त्यांच्या नेतृत्वात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या.
 
कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 121 जागांवर विजय मिळाला आहे आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 250 जागांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. हा त्यांच्यासाठी दारूण पराभव आहे.
 
परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “जे मतदार सुरुवातीला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षासाठी मत देत होते, त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने रिफॉर्म पार्टीला मत दिलं. या मतदारांचा विश्वास कसा जिंकायचा याचा विचार आता कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला करायला हवा.”
 
ऋषी सुनक यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
पराभवानंतर पंतप्रधानांचं सरकारी निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर ऋषी सुनक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, सरकार बदलायला हवं हा स्पष्ट संकेत मतदारांनी दिला आहे.
 
त्यांनी म्हटलं, “सर्वांत आधी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की, मला माफ करा. मी माझं सर्वोत्तम दिलं. पण तुम्ही स्पष्ट संकेत दिले की, सरकार बदलायला हवं. तुम्ही दिलेला निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मी या पराभवाची जबाबदारी घेतो.”
 
या निवेदनानंतर ऋषी सुनक यांनी बकिंगहॅम पॅलेस इथं जाऊन किंग चार्ल्स यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा दिला.
 
ऋषी सुनक यांनी केवळ पंतप्रधानपदाचा राजीनामाच दिला नाही, तर आपण यापुढे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणूनही काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
 
त्यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली आणि म्हटलं, “तुम्ही कठोर मेहनत केली, मात्र आपल्याला विजय मिळवता आला नाही. या निकालानंतर मी पक्षाच्या सदस्यपदाचाही राजीनामा देईन. अर्थात, मी इतक्यात राजीनामा देणार नाही. नवीन नेत्याच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहिन.”
 
ऋषी सुनक पुढे काय करणार?
सध्या लंडनमध्ये असलेले बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी बीबीसी प्रतिनिधी मोहम्मद शाहिद यांना सांगितलं, “गेल्या 14 वर्षांत देशाने पाच पंतप्रधान पाहिले आणि इथे लोकांमध्ये रोष होता. लोक कंटाळले होते. त्यांना बदल हवा होता.”
 
ते सांगतात की, लेबर पार्टीला लोकांनी जनादेश दिला आहे, मात्र किएर स्टार्मर यांची पुढील वाटचाल सोपी नसेल. कारण अनेक मुद्दे आहेत, ज्यावर सरकारने तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे.
 
ऋषी सुनक यांच्या भवितव्याबद्दल राघवेंद्र सांगतात, “येत्या काळात आपल्याला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात नवीन नेत्याचा उदय पाहायला मिळेल हे निश्चित आहे. मात्र, सुनक काय करतील हे सांगणं आता तरी कठीण आहे.”
 
“ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती होते, जे युकेचे पंतप्रधान बनले होते आणि याबद्दल त्यांनी अभिमानही व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांच्या नेतृत्वात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला याकडे नामुष्की म्हणून पाहिलं जात आहे. हे एखाद्या आरोपासारखं आहे, जो पुसून टाकणं अवघड आहे.”
 
दुसरीकडे ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलेल्या रुची घनश्याम यांनी बीबीसी प्रतिनिधी मोहम्मद शाहिद यांच्याशी बोलताना म्हटलं की, ऋषी सुनक जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा देश कठीण काळातून जात होता.
 
त्या सांगतात, “शुक्रवारी दुपारी 10 डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेरून दिलेल्या आपल्या अखेरच्या भाषणात त्यांनी म्हटलं की, मी अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिलं, महागाई कमी केली आणि विकासाची गती वाढवली. या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचं भाषण चांगलं होतं. त्यांनी नवीन पंतप्रधानांबद्दलही चांगल्याच गोष्टी म्हटल्या.”
 
त्यांनी पुढे म्हटलं, “ते तरुण आहेत. व्यक्ती म्हणून चांगले आहेत. जोपर्यंत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नवीन नेतृत्वाची निवड होत नाही, तोपर्यंत आपण पक्षाचं नेतृत्व करू असं त्यांनी म्हटलं आहे. पण पक्षाचे सदस्य असण्यासोबतच ते खासदारही आहेत. त्यामुळे त्यांचं भवितव्य काय असेल हे येणारा काळच ठरवेल.”
 
दुसरीकडे भारतीय वंशाचे ब्रिटीश अर्थतज्ज्ञ आणि लेबर पार्टीचे माजी सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांनी बीबीसी प्रतिनिधी सारिका सिंह यांच्याशी बोलताना म्हटलं, “ऋषी सुनक नेते नाहीत, तर बँकर आहेत. लोकांशी सहजपणे जोडून घेणं त्यांना शक्य होत नाही.”
 
“त्यांनी काम केलं, पण आश्वासनं पूर्ण करू शकले नाहीत. शिवाय त्यांना काम करण्यासाठी पूर्ण पाच वर्षं संधीही मिळाली नाही. ते पुढे काय करतील हे येणारा काळच सांगेल.”
 
अभिनंदनाचे संदेश आणि शुभेच्छा
लेबर पार्टीच्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय नेत्यांनी किएर स्टार्मर यांचं अभिनंदन केलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून किएर स्टार्मर यांचं अभिनंदन करताना म्हटलं की, “ ते भारत आणि ब्रिटन दरम्यानचे संबंध दृढ करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा करत आहेत.”
 
त्याचबरोबर मोदींनी ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
चीनचे परराष्ट्र मंत्री माओ निंग यांनी म्हटलं की, “स्थिर आणि परस्परांना पूरक असे लाभदायक द्विपक्षीय संबंध दोन्ही देशातील लोकांच्या हितसंबंधांना पूर्ण करतात. सोबतच वैश्विक शांतता, आव्हानं आणि विकासासाठी उत्तरदायी असणं आवश्यक आहे. आम्ही ब्रिटनसोबत सन्मान आणि सहकार्याच्या आधारावर काम करू. त्याचसोबत द्विपक्षीय संबंधांना योग्य मार्गावर आणू.”
 
जर्मनीचे चान्सलर ओलाफ शुल्त्झ, नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टेनबर्ग यांनी किएर स्टार्मर यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारसोबत मिळून काम करणं सुरू ठेवू.